सरकारवर बहुराष्ट्रीय कंपन्यांची हुकुमत - डॉ. माणिकराव साळुंखे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - सध्याचे सरकार मुख्यमंत्री चालवत नसून ते बहुराष्ट्रीय कंपन्या चालवत असल्याचे भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सांगितले. महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते.

कोल्हापूर - सध्याचे सरकार मुख्यमंत्री चालवत नसून ते बहुराष्ट्रीय कंपन्या चालवत असल्याचे भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी सांगितले. महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते.

प्राचार्य सुनीलकुमार लवटे, प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी परिसंवादात सहभाग घेतला. "शैक्षणिक धोरण 2016ः' या विषयावर परिसंवाद झाला. 

डॉ. साळुंखे म्हणाले, ""सेवा क्षेत्रातून पैशाची निमिर्ती होणार हे चुकीचे आहे. पैशाची निर्मिती ही सेवा क्षेत्राच्या माध्यमातून नव्हेतर ज्ञानाच्या माध्यमातून होणार आहे. पुढील पिढीला काय द्यायचे याचा विचार करून शिक्षण देणे काळाची गरज आहे. नव्या शैक्षणिक धोरणासंबंधी समितीची नुकतीच नियुक्ती झाली आहे. समितीने तीन महिन्यात अहवाल सरकारला द्यायचा आहे. त्यामुळे धोरणात गोंधळ होणार हे निश्‍चित आहे. हे काम अचाट आहे आणि ते अचाट माणसेच करू शकतात. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील विद्यार्थी 21 व्या शतकातील अडचणी दूर करणारा असणार नाही. सार्वत्रिकीकरणामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळली आहे. ती सुधारण्यासाठी सरकारने ताकद देण्याची गरज आहे. आगामी काळात ज्ञान हे जगात शस्त्र म्हणून वापरले जाणार आहे. जगातील युद्ध ज्ञानाच्या आघारेच होईल.'' 

सुनीलकुमार लवटे म्हणाले, ""माध्यमिक शिक्षक हा शिक्षणाचा गाभा आहे. देशातील शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणे गरजेचे आहे. वरिष्ठ शिक्षण व्यावसायिक झाल्यास बेरोजगारांची संख्या कमी होईल. बदलत्या काळात शाळा तसेच मुख्याध्यापकांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी, त्यास जोड म्हणून सरकारने भौतिक सुविध्या द्याव्यात.'' 

आनंद मेणसे म्हणाले, ""राजकीय इच्छाशक्ती असेल तर नव्या शैक्षणिक धोरणात बदल पाहावयास मिळेल. सरकारने शिक्षणावर सहा टक्के निधी खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्षात 3.5 टक्केच खर्च होत आहे. त्यामुळे माध्यमिकसह वरिष्ठ शिक्षणाचा दर्जा ढासळत आहे.'' वि. दा. आवटी यांनी स्वागत केले. ए. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. 

दरम्यान, सायंकाळी यजुर्वेद महाजन यांनी सध्याच्या काळात माणूस स्वतःच्या कुटुंबापलीकडे पाहण्यास तयार नाही. संवेदना नाहीशा झाल्या आहेत की काय अशी स्थितीत मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली असून शिक्षकांना त्या दृष्टीने तयार करावे असे आवाहन केले. 

डॉ. साळुंखे म्हणाले... 
- पैशाची निर्मिती ज्ञानाच्या माध्यमातून व्हावी 
- पुढील पिढीला काय द्यायचे यानुसार शिक्षणाची गरज 
- नवे शैक्षणिक धोरण अचाट 
- सार्वत्रिकीकरणामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळली 

Web Title: Kolhapur News Manikrao Salunkhe comment