इचलकरंजीत बुधवारी मराठी बोली साहित्य संमेलन 

पंडित कोंडेकर 
शुक्रवार, 25 मे 2018

इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे.

इचलकरंजी - येथील शाहिरी व लोककला अकादमी व मराठी बोली साहित्य संघ (नागपूर) यांच्यावतीने येथे 30 मे रोजी सहावे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन आयोजीत केले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिध्द साहित्यिका डॉ. प्रतिमा इंगोले (दर्यापूर, अमरावती) संमेलनाध्यक्षा आहेत. याबाबतची माहिती आज स्वागताध्यक्ष प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

लायन्स ब्लड बॅंकेच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन भरणार असून "गोट्या"कार ना. धों. ताम्हणकर यांचे नाव व्यासपीठाला देण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता उद्‌घाटन होणार आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी संमेलनाध्यक्ष प्रभाकर मांडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 12 वाजता निमंत्रितांचे कथाकथन रंगणार आहे. कथाकथनमध्ये मा. तु. खिरटकर (वरोरा), डॉ. सई लळीत (कोल्हापूर), अ. भा. ठाकूर (जवळा), बाळ बाबर (जयसिंगपूर), डॉ. शंकर विभुते (नांदेड), प्रविण माळी (जळगांव) यांचा सहभाग असणार आहे. 

दुपारी 2 वाजता "माझ्या बोलीचे प्रमाण, मराठी भाषेतील योगदान या विषयावर डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगणार आहे. यामध्ये बंडोपंत बोढेकर (चंद्रपूर), डॉ. नामदेव गवळी (वैभववाडी), रावसाहेब काळे (अकोला), प्रा. सदाशिव सर्यवंशी (धुळे), डॉ. कुंदा फडणीस - सहस्त्रबुध्दे (पुणे) व नवनाथ गोरे (औरंगाबाद) विषयाची मांडणी करणार आहेत. डॉ. सयाजीराव गायकवाड (अकलूज) सूत्रसंचालन करणार आहेत. 

दुपारी साडेतीन वाजता वैशाली नायकवडे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रिकांचे काव्य वाचन होईल. यामध्ये सर्व प्रांतातील कवी सहभागी होणार आहेत. सांयकाळी 5 वाजता समारोप सोहळा होणार असून त्यामध्ये स्थानिक कलाकारांचा सत्कार केला जाणार आहे. या प्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे प्रमुख पाहुणे तर डॉ. रविंद्र ठाकूर (मराठा विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ) यांची उपस्थिती असेल, असे श्री. होगाडे यांनी सांगितले. 

दुर्मिळ कला पाहण्याची संधी 
संमलनादिवशी रात्री साडे आठ वाजता लोककला संघ (ंभंडारा) हे विदर्भातील खडी गंमत, डहाका, दंडार या लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. ही दुर्मिळ लोककला यानिमित्ताने पाहता येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Marathi Boli Sahitya Samhelan In Ichalkaraji