कोल्हापूरच्या आर्किटेक्‍टचा आशिया खंडात गौरव

कोल्हापूरच्या आर्किटेक्‍टचा आशिया खंडात गौरव

कोल्हापूर : घर बांधायचं किंवा एखादा प्रकल्प उभा करायचा म्हटलं की, पहिल्यांदा बांधकामामध्ये येणारे झाड तोडण्यावरच बहुतेकांचा भर असतो. कधी गुपचूप तर कधी परवानगी घेऊन युद्धपातळीवर झाड हटवण्यासाठी आटापिटा केला जातो. पण बांधकामाच्या जागेतच मध्ये एक मोठे वडाचे झाड असताना त्या झाडाला केंद्रस्थानी ठेवूनच बांधलेल्या एका घराला आशिया खंडातील सर्वोत्तम डिझाईनचा मान मिळाला आहे. या घराची रचना कोल्हापुरातील आर्किटेक्‍ट शिरीष बेरी यांनी केली आहे. त्यांना या घराच्या रचनेबद्दल आर्केशिया सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. 
शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रांबरोबर वास्तुरचनेतही कोल्हापूरची असलेली ओळख या पदकामुळे आशिया खंडात पोचली आहे. 

ज्या घरासाठी हा सन्मान मिळाला, ते घर नागपूरमध्ये आहे. पण त्याची रचना कोल्हापुरातील शिरीष बेरी यांनी केली व आर्किटेक्‍ट अनुजा कदम व इंटेरियर डिझायनर विनिता आगे यांचाही त्यात सहभाग राहिला. 

आशिया खंडातील 21 देशांतल्या आर्किटेक्‍टची आर्केशिया ही संघटना आहे. ही संघटना दरवर्षी वेगवेगळ्या डिझाईनना पुरस्कार देते. यावर्षी 21 देशांतील 700 आर्किटेक्‍टच्या डिझाईनचा (रचना) परीक्षणासाठी सहभाग होता. 

नागपूर येथील गांधी कुटुंबीयांनी त्यांच्या घरासाठी बेरी यांच्याशी संपर्क साधला होता. बेरी यांनी जागा पाहिली व जागेतील वड व बहावाचे झाड हेच घराइतके महत्त्वाचे मानून घराची रचना केली. अनेकांना घरासमोरील झाड हा अडथळा वाटतो तर अनेक जण बनावट वास्तू सल्लागाराच्या सल्ल्याने घरासमोरील झाडे तोडून टाकतात. बेरी यांनी वडाचे झाडच केंद्रस्थानी ठेवले व उतरत्या छपराच्या शैलीने घराची रचना केली.

त्यामुळे झाडाबरोबरच हे घर जमिनीतून उभारी घेत असल्यासारखे जाणवू लागते. या झाडाच्या सावलीतूनच घरात प्रवेशासाठी वाट मिळते. घराच्या बांधकामासाठी गेरू रंगाच्या अनघड दगडाचा वापर करण्यात आला. 

श्री. बेरी यांनी कोल्हापुरात रेव्हेन्यू कॉलनीत स्वतःचे घर अशाच पद्धतीने बांधले आहे. विशेष हे की, भौतिक संपत्तीचा पुनर्वापर या हेतूने त्यांनी इतर ठिकाणी बांधकामासाठी पाडलेल्या जुन्या घरांचे साहित्य, भंगारातले लोखंडी अँगल, पत्रे, फरशांचे तुकडे यांचा कलात्मक वापर केला आहे. 

गरजेनुसार बांधकाम 
घर बांधकामात संगमरवर, ग्रॅनाईट, काच, अँगल, खर्चिक प्रकाश योजना यावर अधिकाधिक भर देत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर भरपूर नैसर्गिक प्रकाश, घरभर खेळणारे नैसर्गिक वारे व इतरांनी बांधले म्हणून आपणही भव्य-दिव्य बांधायचे असे न करता तेथे राहणाऱ्यांच्या गरजेनुसार बांधकाम ही वैशिष्ट्ये जपली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com