डॉ. सा. रे. पाटील स्मृती मराठी कथा स्पर्धांचे पुरस्कार वितरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

शिरोळ - येथील साहित्य सहयोग दीपावली अंक व मासिक इंद्रधनुष्य यांच्यावतीने झालेल्या स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धांचे पुरस्कार वितरण झाले.

शिरोळ - येथील साहित्य सहयोग दीपावली अंक व मासिक इंद्रधनुष्य यांच्यावतीने झालेल्या स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील स्मृती राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धांचे पुरस्कार वितरण झाले. येथील महसूल भवनात कार्यक्रम झाला. पत्रकार आप्पालाल चिकोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर पत्रकार दिलीप भिसे प्रमुख पाहुणे होते.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व दत्त साखर कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गतवर्षीपासून राज्यस्तरीय मराठी कथा स्पर्धेचे आयोजन केले जाते. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा होते. यंदा राज्यभरातून ५४ कथाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातून दर्जेदार आठ कथांना पारितोषिक जाहीर झाले.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ ग्रामीण कथाकार डॉ. मोहन पाटील यांनी कथांचे परीक्षण केले. पुरस्कारप्राप्त कथांमध्ये कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील अनंत चंदनशिवे यांच्या ‘शाहिरी अभंग गाते’ या कथेस प्रथम पुरस्कार मिळाला. साहिल शेख (कुरुंदवाड) यांच्या ‘म्हातारी मेली काळ सोकावला’ व नीलेश माळवणकर (मुंबई) यांच्या ‘प्रत्येकाचे आरमान’ या कथांना द्वितीय पुरस्कार विभागून दिला. ‘सकाळ’चे उपसंपादक सर्जेराव नावले (वडणगे) यांच्या ‘बालिंग्याचं काळं’ व संतोष पाटील (मुमेवाडी-आजरा) यांच्या ‘मुलूख’ कथेला तृतीय पुरस्कार विभागून दिला. तर सुषमा जयसिंगराव माने-गावडे (शिरोळ) यांच्या ‘पोशिंदा’, विजया बन्ने (जयसिंगपूर) यांच्या ‘वाघीण’, आरती गावडे (मुंबई) यांच्या ‘माऊली’ कथेला उत्तेजनार्थ पुरस्कार विभागून दिला. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, १ हजार, ५०० रुपये रोख, मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. विविध कथांना पुरस्कारांचे वितरण श्री. चिकोडे, श्री. भिसे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमादरम्यान ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. स्मिता माने आदी मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. साहित्य सहयोगचे संपादक सुनील इनामदार यांनी स्वागत केले. विजय खातेदार यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Kolhapur News Marathi Story Competition Award