गाळेधारकांचा करवाढीविरोधात मुरगूड नगरपालिकेवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

मुरगूड -  येथील पालिकेच्या खुल्या जागेतील गाळयांची भरमसाठ करवाढ केल्याच्या निषेधार्थ शहरातील गाळेधारकांनी आज सकाळी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. अन्यायी वाढ रद्द करावी, अशी आग्रही मागणी करत या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले.

मुरगूड -  येथील पालिकेच्या खुल्या जागेतील गाळयांची भरमसाठ करवाढ केल्याच्या निषेधार्थ शहरातील गाळेधारकांनी आज सकाळी पालिका कार्यालयावर मोर्चा काढला. अन्यायी वाढ रद्द करावी, अशी आग्रही मागणी करत या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना दिले.

रविवार (ता. 29) रोजी शहरातील गाळेधारकांनी तातडीची बैठक घेत पालिका कारभाराबाबत संताप व्यक्त केला होता. या भाडेवाढी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी 12 वाजता हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात गणेश मंदिरापासून झाली. बसस्थानक मार्गे हा मोर्चा पालिका कार्यालयावर आला. 'अन्यायी भाडे वाढ रद्द झालीच पाहिजे.' अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चातील शिष्टमंडळ दिलेले निवेदन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी स्वीकारले.

पालिकेच्या खुल्या जागेत स्वखर्चाने गाळे बांधून व्यावसायिक वर्षानुवर्षे व्यवसाय करत आहेत. गेल्या 50 वर्षात प्रतिवर्षी याची 20 ते 50 रुपये.वाढ होत होती. पण यावर्षी पालिका प्रशासनाने भरमसाठ वाढ केली. ही अन्यायी आहे. ती रद्द करावी. अशी आमची मागणी आहे.

- पी. व्ही. पाटील, मोर्चा प्रमुख 

मोर्चात अमर चौगले, विलास गुरव, राजू सोरप, भगवान लोकरे, तानाजी जाधव, विजय गोधडे, सुभाष बारदेस्कर, दिलीप सुतार, आनंदा मांगले, दिगंबर परीट, बाळू शेख, महादेव सुतार, विकेश किल्लेदार आदी गाळेधारक सहभागी झाले होते. राजू चव्हाण यांनी आभार मानले.

या मागणीचा आपण सकारात्मक विचार करू.व हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवू.वरिष्ठांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ.

- संजय गायकवाड, मुख्याधिकारी

आमच्या सर्व नगरसेवकांचा या मोर्चाला पाठींबा आहे. ही भाडे वाढ सर्वाना विश्वासात घेऊन होणे गरजेचे होती. मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलून निर्णय घेण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. सर्व नगरसेवकांनी एकत्रित बसून हा निर्णय घेणे गरजेचे आहे.

- नामदेवराव मेंडके, उपनगराध्यक्ष 

नगराध्यक्षांची अनुपस्थिती 
नगरपालिकेवर शहरातील सर्व गाळेधारकांचा भव्य मोर्चा निघालेला असताना नगराध्यक्ष राजेखान जमादार मात्र या मोर्चाकडे फिरकले नाहीत.त्यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवत होती.

Web Title: Kolhapur News march on Murgud nagarpalika due to hike in tax