कोल्हापूरात बंपर आवक झाल्याने समुद्री मासे स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - गेल्या १५ दिवसांपासून कोकणातून विविध प्रजातींच्या माशांची बंपर आवक झाल्यामुळे माशांचे दर प्रतिकिलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले.

कोल्हापूर - गेल्या १५ दिवसांपासून कोकणातून विविध प्रजातींच्या माशांची बंपर आवक झाल्यामुळे माशांचे दर प्रतिकिलोमागे १०० ते १५० रुपयांनी उतरल्याचे मासे विक्रेत्यांनी सांगितले.

‘‘गेल्या आठवड्यात अखंड सुरमईचा दर हा ६०० रुपये होता. हाच दर आता ५०० रुपये झाला. मांदेली, तारली, बांगड्याची आवकही भरपूर प्रमाणात आहे. मासे खवय्यांसाठी ही पर्वणी असून चवदार सुरमई घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढत आहे. समुद्री खेकड्यांनाही भरपूर मागणी आहे. सुरमईबरोबरच खास पापलेट विकत घेऊन खाणारे लोकही खूप आहेत.’’ 

- शैलेश घोटणे

याशिवाय स्थानिक मासे विक्रेत्यांकडून टिलापची ७० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. नदीतील खेकडा हा ३०० रुपयांना सहा नग याप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. खेकड्यांनाही खूप मागणी आहे. नदीतील मासळीची आवकही चांगली आहे. 

सुरमई आरोग्यासाठी चांगली 

ब्लॅक, पॅसिफिक, यलोटेल किंगफिश असे सुरमईचे प्रकार आहेत; मात्र साधा सुरमई माशाशी या प्रकारांचा काही संबंध नाही. साध्या सुरमईला किंग मॅकेरल असे म्हणतात. अटलांटिक महासागरातील अमेरिकेच्या समुद्री तटालगत सुरमई मासा भरपूर प्रमाणात सापडतो. यामध्ये चरबी कमी असते. ओमेगा फॅटी-३ ॲसिड, प्रथिने, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियमचा भरपूर साठा सुरमईत असतो, म्हणूनच सुरमई हा आरोग्यास अतिशय उपयुक्त असतो. मात्र संशोधक म्हणतात, त्याप्रमाणे सुरमईत पाऱ्याचे प्रमाणही खूप असते. सुरमईच्या तीन औंस मांसात ११४ उष्मांक, २२ ग्रॅम प्रथिने, ४४ टक्के दररोज लागणारी प्रथिने, दररोज लागणारा दोन हजार उष्मांक असतो. दोन ग्रॅम चरबी, ५८ मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल असते. म्हणजे, सुरमई तीन औंस पोटात गेली तर वर उल्लेख केलेले सर्व घटक शरीराला मिळतात.

संशोधकांचा इशारा
सुरमई ही आरोग्यासाठी चांगली असली तरी यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सुरमईत पाऱ्याचे प्रमाण खूप असल्यामुळे गरोदर स्त्रिया, उपचार सुरू असलेले रुग्ण, लहान मुलांनी सुरमई खाऊ नये.

ओमेगा फॅटी-३ ॲसिड हे मेंदू, हृदय, पेशींसाठी अत्यंत उपयुक्त असून ते दररोज स्त्रियांसाठी १.१ ग्रॅम तर पुरुषांसाठी १.६ ग्रॅम लागते. लाल रक्तपेशी अन्‌ डीएनएसाठी व्हिटॅमिन बी-१२ तर सेलेनियम हे चयापचय, थायरॉईड ग्रंथी, रोगप्रतिकारक शक्ती, पेशींची सुरक्षेसाठी लागते. याशिवाय सुरमईतून १० टक्के लोह, पोटॅशियम मिळते. 

माशांचे दर असे (प्रतिकिलो रुपये) 

 • सुरमई अखंड : ५०० 
 • सुरमई कटपीस : ६०० ते ७००
 • लहान सुरमई : ३५० ते ४००
 • ताजा झिंगा : २०० ते ४००
 • वांब : २३० 
 • बांगडा : १२० ते १४० 
 • रावस : २२० ते २८०
 • तारली : ८०
 • पापलेट : ६०० ते १२००
 • हलवा : ५००
 • करली : २८०
 • समुद्री खेकडा : १४०
 • मांदेली : १२०
 • ताजा बोंबील : १६० 
 • सौंदळी : २४०
 • नदीचा टिलाप मासा : ७० 
 • नदीचा खेकडा : ३०० रुपयांना सहा नग (आकारमानानुसार) 
 • तळ्यातील पानगा : १२० 
Web Title: Kolhapur News Marine fish cheap due to the bumper arrival