कोल्हापूर पालिका महापाैर निवडणूकीत काँग्रेसला संधी; शिवसेना तटस्थ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

कोल्हापूर - सर्वांचे लक्ष लागलेली महापौर निवड आज (ता. २५) होत आहे. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. यासंदर्भात रात्री शिवसेनेची पुण्यात बैठक झाली. बैठकीत दोन्ही आघाड्यांना साथ न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

कोल्हापूर - सर्वांचे लक्ष लागलेली महापौर निवड आज (ता. २५) होत आहे. सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. यासंदर्भात रात्री शिवसेनेची पुण्यात बैठक झाली. बैठकीत दोन्ही आघाड्यांना साथ न देता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी सांगितले.

कदाचित महापौरनिवडीवेळी सदस्य सभागृहातही येणार नाहीत, असे संकेतही त्यांनी दिले. स्थायी निवडीवेळी ‘राष्ट्रवादी’चे सदस्य सोबत राहिले नाहीत, मग आम्ही दोन्ही काँग्रेसच्या मागे का राहावे, असा सवालही त्यांनी केला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह महापौरपदाचे उमेदवार व तीन सदस्य बैठकीस उपस्थित होते. या घडामोडींमुळे काँग्रेसचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.

उद्या सकाळी अकराला महापालिका सभागृहात निवड प्रक्रिया सुरू होईल. दोन्ही आघाड्यांचे सदस्य सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल होतील. दोन्ही काँग्रेसचे सदस्य रात्री गोव्याहून बेळगाव येथे दाखल झाले आहेत; तर विरोधी आघाडीचे सदस्य तिलारीतून येथे दाखल होतील. शिवसेनेकडून प्रतिज्ञा निल्ले यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे. आज सकाळपासून शिवसेनेचे चारही सदस्य कोणता निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले होते. सायंकाळी पुण्यात संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार क्षीरसागर आणि उमेदवारांची बैठक झाली.

काँग्रेसकडून शोभा बोंद्रे, भाजप-ताराराणी आघाडीच्या रूपाराणी निकम आणि शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले अशी लढत होत आहे. दोन्ही काँग्रेसकडे ४२ सदस्य आहेत. स्थायी सभापती निवडीवेळी अजिंक्‍य चव्हाण आणि अफजल पिरजादे फुटले होते. पिरजादे सध्या काँग्रेसबरोबर सहलीवर गेले. महापौर, उपमहापौर दोन्ही उमेदवार शिवाजी पेठेतील आहेत. तसेच, आमदार सतेज पाटील यांचा ‘शब्द’ यांमुळे चव्हाण हे काँग्रेसच्या बाजूने हात उंचावण्याची शक्‍यता आहे. तसे झाल्यास काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ४४ होते. बहुमतासाठी ४१ सदस्यांची गरज आहे. शिवसेनेने साथ दिली न दिली तर काँग्रेसला काही फरक पडत नाही.

भाजप-ताराराणी आघाडीकडे ३३ सदस्य आहेत. शिवसेनेला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची ३३ संख्या कायम राहील. गेल्या चार दिवसांत अनेक फॉर्म्युले पुढे आले. ‘कोटीची’ भाषा केली गेली. मात्र, नेत्यांचे वरच्या स्तरावर पॅचअप झाल्याने अनेकांची कोंडी झाली. कोल्हापूर उत्तरच्या राजकारणातून शिवसेनेचा उमेदवारी अर्ज भरला गेला. नंतर तडजोड होऊन अर्ज ठेवण्यावर एकमत झाले. त्याचा फटका विरोधी आघाडीला बसणार असून, त्यांचे ३३ सदस्य राहतील. काँग्रेस-राष्ट्रवादी ४४, विरोधी आघाडी ३३ आणि शिवसेना ४ असेच अंतिम चित्र राहण्याची चिन्हे आहेत.

बॅग पोचली... मन वळले!
कोल्हापूर - महापौर निवडीनिमित्त निर्माण झालेल्या इर्षेचा गैरफायदा घेताना एका सदस्याने आज बॅग पोचल्यानंतरच कोणाला मतदान करायचे हे निश्‍चित केले. पंधरा दिवसांपासून दोन्हीही आघाड्यांच्या नेत्यांनी आपण घोडेबाजार करणार नसल्याचे स्पष्ट केले होते; मात्र नेत्यांची अपरिहार्यता ध्यानात घेऊन त्यांना वेठीस धरण्यात आले. एक-दोन सदस्य जर इकडे-तिकडे झाले तर धोका निर्माण होऊ शकतो हे नेत्यांनाही ठाऊक आहे. त्याचा गैरफायदा आज एका सदस्याने घेतला. सायंकाळी बॅग घरपोच झाल्यानंतरच तो संबंधितांच्या बाजून मतदानास तयार झाला. काही कारभारी सदस्यांकडे अशा सदस्यांची जबाबदारी नेत्यांनी सोपवली होती. त्यानंतर हे कारभारी आज सायंकाळी संबंधिताच्या घरी पोचले. मात्र त्यांनाही वेठीस धरले गेले. अखेर बॅग पोचल्यानंतरच ते मतदानास राजी झाले.

...म्हणून आम्ही तटस्थ
कडेगावच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विश्‍वजित कदम यांना शिवसेनेने सहकार्य केले; पण काँग्रेसने पालघर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही. म्हणून आम्ही कोल्हापुरात महापौर निवडीवेळी तटस्थ राहणार असल्याचे शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
 

Web Title: Kolhapur News Mayor Election