योजना आली, यांत्रिक शेती वाढली

अजित माद्याळे 
बुधवार, 21 मार्च 2018

गडहिंग्लज - शासनाची एखादी योजना प्रभावीपणे राबवल्यास त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहचण्यास किती मदत होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून यांत्रिकीकरण योजनेचे देता येईल. कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे तालुक्‍यात यांत्रिक शेतीला बळ मिळत आहे.

गडहिंग्लज - शासनाची एखादी योजना प्रभावीपणे राबवल्यास त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहचण्यास किती मदत होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून यांत्रिकीकरण योजनेचे देता येईल. कृषी विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे तालुक्‍यात यांत्रिक शेतीला बळ मिळत आहे. अनुदानाच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने पारंपारिकतेच्या गर्तेत अडकलेले शेतकरी यांत्रिकी शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. यांत्रिकीकरण हा त्यातलाच एक भाग. सद्यस्थितीत शेतीकामासाठी मजुरांची टंचाई जाणवत आहे. यामुळे काही जण "शेती नको रे बाबा" म्हणत इतर उद्योगाकडे वळत आहेत. तसेच शहर परिसर आणि लगतच्या खेड्यांमधून शेतीचे भूखंड पाडून त्याची विक्रीही सुरू असते. तरीसुद्धा अनेक शेतकरी अजून पारंपारिकतेच्या गर्तेत अडकले आहेत. यांत्रिक शेती गरजेची असली तरी ती अल्प भुधारकाला न परवडणारी आहे. लाखोची गुंतवणूक करण्यास असा शेतकरी पुढे येत नाही.

कर्नाटक राज्यात मात्र अशा शेतीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदानाची योजना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही यांत्रिकी शेतीसाठी चालना देण्यासाठी अनुदान योजना गतवर्षीपासून कार्यान्वित केली आहे. ग्रामीण भागातून मिळणारा प्रतिसाद पाहून शासनाने या योजनेवर अधिक फोकस केला असून कृषी विभागाच्या एकूण योजनांपैकी सर्वाधिक प्रभावी योजना म्हणून ती पुढे आली आहे. 

योजनेच्या अंमलबजावणीतही पारदर्शकता ठेवली आहे. यांत्रिक औजारे मागणीसाठी आलेल्या अर्जांची सोडत काढण्यात येते. त्याचे व्हीडीओ रेकॉर्डींगही केले जाते. सोडतीद्वारे तयार होणाऱ्या प्राधान्यक्रम यादीतील सर्वांना निवडपत्रे दिली जातात. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून कागदपत्रांसह प्रस्ताव मागविण्यात येतो. निवड झालेल्या शेतकऱ्यांकडून पूर्वसंमत्ती घेतली जाते. त्यानंतर उपलब्ध निधीनुसार यांत्रिकी अवजारांचे वाटप केले जाते.

या पद्धतीमुळे गरजू व प्रत्येक घटकापर्यंत ही योजना पोहचण्यास मदत झाली आहे. तसेच थेट आर्थिकतेशी निगडीत ही योजना असल्याने शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेतंर्गत अनेक यांत्रिक औजारांचा समावेश असला तरी गडहिंग्लज तालुक्‍यातील शेतकऱ्याकडून ट्रॅक्‍टरसह पॉवर टीलर, मळणी मशीन, रोटा व्हेटर, पॉवर विडर, खत-बी टोकण यंत्र आदी यांत्रिक औजारांनाच सर्वाधिक मागणी आहे. आतापर्यंत गडहिंग्लज तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी दोन सोडती झाल्या असून त्यामधून 447 ट्रॅक्‍टरचे तर 639 इतर औजार मागणी अर्जांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्‍यातील 132 लाभार्थीं शेतकऱ्यांसाठी 88 लाखाचा खर्च पडला आहे. यामध्ये 53 ट्रॅक्‍टरसाठी 65 लाख तर इतर 79 औजारांसाठी 48 लाखांचा समावेश आहे. 

 दृष्टीक्षेपात यांत्रिकीकरण योजना...

  • पहिली सोडत : 371 अर्ज, त्यात 169 ट्रॅक्‍टर व 202 इतर औजारे

  • दुसरी सोडत : 715 अर्ज, त्यात 278 ट्रॅक्‍टर व 437 इतर औजारे

  • पूर्वसंमती दिलेले लाभार्थी : 208

  • लाभ घेतलेले लाभार्थी : 53 ट्रॅक्‍टर व 79 इतर औजारे

गडहिंग्लजमधील 132 लाभार्थींसाठी 1 कोटी 11 लाखाची मागणी केली होती. यापैकी 87 लाख प्राप्त झाले असून हा सर्व निधी खर्ची पडला आहे. उर्वरित निधी या मार्चअखेरीस येण्याची शक्‍यता आहे. त्यातून शिल्लक लाभार्थींना औजारांचे वाटप होईल. ही योजना थेट शेतकऱ्यांच्या आर्थिकतेशी निगडीत असल्याने प्रतिसाद चांगला आहे. वंचित शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे.
- पोपटराव पाटील,
तालुका कृषी अधिकारी.

 

Web Title: Kolhapur News Mechanical farming increased in Gadhinglaj Taluka