शेतकऱ्यांचा शेट्टींवरील विश्‍वास दृढ

सदानंद पाटील
रविवार, 22 जुलै 2018

कोल्हापूर - ना वैयक्‍तिक निरोप, ना वाहनांचा पुरवठा, ना पेट्रोलचे पैसे, ना हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था. वेळ पडली तर पोलिसांचा मार आणि अंगावर गुन्हे. तरीही परिणामांची तमा न बाळगता स्वाभिमानी शेतकऱ्यांनी दूध दर आंदोलन यशस्वी करीत खासदार राजू शेट्टींवरील विश्‍वास तसूभरही ढळू दिला नाही, हेच आंदोलनाने फलित आहे.

कोल्हापूर - ना वैयक्‍तिक निरोप, ना वाहनांचा पुरवठा, ना पेट्रोलचे पैसे, ना हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था. वेळ पडली तर पोलिसांचा मार आणि अंगावर गुन्हे. तरीही परिणामांची तमा न बाळगता स्वाभिमानी शेतकऱ्यांनी दूध दर आंदोलन यशस्वी करीत खासदार राजू शेट्टींवरील विश्‍वास तसूभरही ढळू दिला नाही, हेच आंदोलनाने फलित आहे. सरकार, दूध संघ, प्रशासकीय व्यवस्था आदी मंडळींविरोधात असतानाही हे आंदोलन यशस्वी केले.

आंदोलनात विशेषतः किणी येथील चक्काजामवेळी कार्यकर्त्यांनी दिलेले हे बळ शेट्टींसाठी संजीवनी देणारे ठरल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. संघटनेला आंदोलन नवीन नाही. मात्र, भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्याने आंदोलनाची धार कमी झाली होती.

दडपशाही झुगारली
एखाद्‌दुसरा कार्यकर्ता आला तर लगेच पोलिस ताब्यात घेत होते. पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांनी किणी गावात प्रवेश केला. अनेक कार्यकर्ते शेतातून, उसातून वाट काढत आंदोलनस्थळी दाखल झाले. कोसळणारा पाऊस, खाली खंदक अशा अवस्थेत हजारो कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी चक्‍काजाम आंदोलनात सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी केले.

सरकारमध्ये जाऊनही शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटत नसल्याने संघटनेत नाराजी होती. यातच संघटनेची मुलूखमैदानी तोफ सदाभाऊ खोत मंत्रिमंडळात गेले आणि ते भाजपवासी झाल्याची सल होती. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या संघटनेने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे कारण देत भाजपला रामराम केला. राज्यात दूध दरावरून शेतकऱ्यांत अस्वस्थता होती. दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि पडलेला दर यांमुळे गेले वर्षभर दूध उत्पादक चिंतेत होते. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली जनावरे दर पडला म्हणून विकायची तरी कशी, या प्रश्‍नाने त्यांना भेडसावले होते आणि बरोबर हाच मुद्दा पकडत खासदार राजू शेट्टी यांनी दूध बंद आंदोलनाची हाक दिली.

दूध बंद आंदोलनात अनेक अडथळे आले, तरी शेतकऱ्यांनी आंदोलनात मनापासून पाठिंबा दिला. सरकारने तीन-चार दिवस या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे चक्‍काजाम 
आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे आंदोलन होऊच नये, यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत होती. आंदोलनाच्या आदल्यादिवशीच प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. गुन्हे दाखल करण्यात आले. रात्रीच पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्‍याचा ताबा घेण्यात आला. टोल नाक्‍यावर छावणीच उभी करण्यात आली होती.
 

Web Title: Kolhapur News Milk agitation and Raju Shetty