दुधाच्या मापात पाप नको - संभाजी ब्रिगेड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कोल्हापूर - इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यातील अचूकतेचे पालन न करणाऱ्यांवर वैध मापनशास्त्र अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. संबंधितांवर वेळेत कारवाई न झाल्यास वैध मापनशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्याचा इशारा संस्थेचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी दिला. 

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि वैध मापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांची संयुक्त बैठक बोलवली होती. 

बैठकीत इलेक्‍ट्रॉनिक्‍स्‌ वजनकाट्यावर दुधाचे मोजमाप नियमाला धरून होत नसल्याच्या मुद्यावर चर्चा झाली. यात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनकाट्यात अचुकतेचा अभाव आहे. त्यामुळे उत्पादकांच्या सुमारे ५० ते ६० मिली दुधाचे मोजमापच होत नाही, असा दावा संभाजी ब्रिगेडच्या रूपेश पाटील यांनी केला. यातून जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख दूध उत्पादकांचे दिवसाला ५० हजार लिटर दूध हे संस्थेकडून अलगत उचलले जाते. त्यातून जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दररोज २० लाखांचे नुकसान होत असल्याचा दावा अध्यक्ष रूपेश पाटील यांनी केला. 

यापूर्वी दुधाचे माप इलेक्‍ट्रॉनिक वजनकाट्यावर न करता प्रमाणित मापाने करावे, असे आदेश मोहनसिंह यांनी काढले होते. पण त्याची कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. त्यांनी वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून कारवाई करतो, असे सांगून वेळ मारून नेल्यादा दावा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केला.

ॲड. सुनील धुमाळ, विनायक पाटील यांनी कारवाई वेळेत न झाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला. अखेरीस इलेक्‍ट्रॉनिक वजनकाट्यातील अचूकतेबाबत काटेकोर पालन व्हावे, यासाठी वरिष्ठांशी चर्चा करून दोषींवर कारवाई करतो, असे आश्‍वासन मोहनसिंग यांनी दिले. त्यानंतर ही बैठक स्थगित करण्यात आली.

Web Title: Kolhapur News Milk Measurement issue