किमान साडेसहा हजार पेन्शन द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कोल्हापूर - इपीएस पेन्शनधारकांना दरमहा ६ हजार ५०० रुपयांची पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघातर्फे ताराबाई पार्कतील भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ सुमनप्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो पेन्शनधारक मोर्चात सहभागी झाले होते.  

कोल्हापूर - इपीएस पेन्शनधारकांना दरमहा ६ हजार ५०० रुपयांची पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघातर्फे ताराबाई पार्कतील भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ सुमनप्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील हजारो पेन्शनधारक मोर्चात सहभागी झाले होते.  

इपीएस पेन्शनधारक विविध निमशासकीय, खासगी कंपन्यांमध्ये (आस्थापना) दीर्घकाळ सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे इपीएस पेन्शन लागू केली जाते. सध्या मिळणारी पेन्शन अत्यल्प असल्याने त्यांचा उदनिर्वाह होत नाही. त्यामुळे पेन्शन वाढ द्यावी, अशी मागणी अनेक वर्षे होत आहे. तरीही पेन्शन वाढीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी आहे. या मोर्चास कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून नाराजी व्यक्त केली. 
शिवाजी पार्कातून दुपारी साडेबाराला या मोर्चाला सुरवात झाली.

पेन्शनधारकांनी ‘पेन्शन वाढीव लाभ मिळालाच पाहिजे, महागाई भत्ता, आरोग्य सुविधा सक्षम दिल्या पाहिजेत’ अशा घोषणा दिल्या. मोर्चा मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर, सासने मैदान, किरण बंगला ते भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर आला. यावेळी अतुल दिघे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.  

कोशियारी समितीने केलेल्या शिफारशीनुसार कमीत कमी ३ हजार रुपये पेन्शनचा लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांच्या पेन्शन फंडात कर्मचाऱ्यांच्या रकमेएवढीच रक्कम सरकारने भरावी, त्यासाठी जादा निधीची तरतूद करावी, त्यातून महागाई भत्ता देण्यात यावा, सर्व पेन्शनधारकांना दोन वर्षांच्या बोनस फरकाची रक्कम द्यावी, जे कर्मचारी ५८ व्या वर्षी सेवानिवृत्ती झाले, त्यांच्यासारखाच लाभ ज्यांनी यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, कंपनी बंद पडल्यामुळे नोकरी गेली आहे किंवा आरोग्याच्या गंभीर तक्रारीमुळे नोकरी करता येत नाही, त्यांना देण्यात यावा, कामगार हिताच्या उच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करावी, आदी मागण्या यावेळी श्री. दिघे यांच्या शिष्टमंडळाने केल्या. श्रमिक संघातर्फे झालेल्या चर्चेत गोपाळ पाटील, शंकर पाटील, आप्पा कुलकर्णी, बाळकृष्ण शिराळकर, प्रकाश जाधव, मारुती कोतमिरे, वसंत माने आदी सहभागी झाले होते.

वारणा पेन्शनधारकांनी काढले शर्ट
या मोर्चात वारणा पेन्शनधारक संघानेही सहभाग घेतला. संघाच्या सभासदांनी ‘वाढीव पेन्शनचा लाभ महागाई भत्त्यासह मिळालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत भविष्य निर्वाह कार्यालयासमोर अंगावरील शर्ट काढून प्रतीकात्मक आंदोलन केले. यात बाळासाहेब पाटील, पांडुरंग कांबळे, विठ्ठल सुतार, शंकर मोरे, सदा मोहिते, राजाराम पाटील, काशीनाथ पाटील, धोंडिराम पाटील आदी सहभागी झाले.

निवेदनातील मागण्या अशा - 
बॅंकेतील पेन्शन खात्याला ‘झिरो बॅलन्स’ सुविधा असावी.
पेन्शनरांना मोफत औषधोपाचार व प्रवासात सवलत व अन्न सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा. 
पेन्शन विक्री केलेल्यांची १०० महिन्यांनंतर पेन्शन पूर्ववत करावी.  
मृत कामगारांच्या पत्नीला फरकांची रक्कम द्यावी. 
ट्रस्ट कामगारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लाभ द्यावा.

Web Title: kolhapur news minimum 6500 pension