धान्याचा काळाबाजार केल्यास ‘मोका‘ - मंत्री गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

कोल्हापूर - ‘गोरगरिबांचा घास काढून काळ्या बाजाराने धान्य विकणाऱ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, गिरीश बापट यांनी दिला. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना आयोजित राज्यस्तरीय सन्मान मेळावा व Ae- PDS प्रणाली कार्यशाळेत ते बोलत होते.

कोल्हापूर - ‘गोरगरिबांचा घास काढून काळ्या बाजाराने धान्य विकणाऱ्यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, गिरीश बापट यांनी दिला. कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना आयोजित राज्यस्तरीय सन्मान मेळावा व Ae- PDS प्रणाली कार्यशाळेत ते बोलत होते.

मंत्री बापट म्हणाले, ‘‘गोरगरीब माणसाला केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे. धान्याच्या काळ्या बाजाराला आळा बसावा यासाठी पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणप्रणाली विकसित केली. त्यामुळे सुमारे ११ लाख बोगस रेशनकार्ड आढळले. ते रद्द केल्याने ३ लाख ८० हजार टन धान्य काळ्या बाजारापासून सरकारच्या गोदामात शिल्लक राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ३०० टन धान्याचा पुरवठा बायोमेट्रिक पद्धतीने वितरित केला आहे.’’

श्री. बापट म्हणाले, ‘‘रेशन धान्य दुकानदारांचे कमिशन ७५ रुपयांवरून १५० रुपये असे दुप्पट केले आहे. त्यांच्या संघटनाच्या अन्य मागण्यांबाबतही शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न सोडविले जातील. स्वस्त धान्य दुकानदारांनीही दर्जेदार व चांगल्या पद्धतीची सेवा देऊन महाराष्ट्राची धान्य वितरण प्रणाली ही देशासाठी आदर्शवत करावी.’’

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, ‘‘जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना धान्य पुरवठा केला जातो. वितरणात पहिल्या पाच तालुक्‍यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्‍यांचा समावेश असणे ही बाब प्रशासनासाठी गौरवास्पद आहे.’’

पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, ‘‘जिल्ह्याने बायोमॅट्रिक धान्य वितरण प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, यामध्ये रेशनदुकानदारांचे बहुमोल सहकार्य लाभले.’’
देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पुणे विभाग पुरवठा उपायुक्त नीलिमा धायगुडे, राष्ट्रीय सचिव विश्वंभर बसू, स्वस्त धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष डी. एम. पाटील, सचिव चंद्रकांत यादव उपस्थित होते.

यादव मंत्री, आगवणे आमदार
भविष्यात माझ्यानंतर अन्न व पुरवठामंत्री म्हणून अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान संघटनेचे सचिव चंद्रकांत यादव असतील असे वाटते. सर्वांना एकत्रित घेऊन सक्षमपणे काम करणारा आमदार कोण असेल, तर ते जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे असतील अशी प्रशंसा श्री. बापट यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

वृद्धाश्रम, वसतिगृहात धान्य
पॉस मशीनमुळे काळ्या बाजारातील धान्यविक्रीला आळा बसला आहे. यातून शिल्लक राहिलेले धान्य शैक्षणिक वसतिगृहे, वृद्धाश्रम, सेवाभावी संस्थांनाही वितरित केले जाणार असल्याचेही बापट यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Minister Girish Bapat comment