...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली

...अन्‌ ‘मीरा’ कार सोशल मीडियावर धावू लागली

इचलकरंजी - ५० वर्षांपूर्वी इचलकरंजीच्या रस्त्यावर इचलकरंजीतच तयार झालेली ‘मीरा’ नावाची कार सोशल मीडियावर धावू लागली आहे. कारच्या निर्मितीपासून येथील शंकरराव कुलकर्णी यांनी केलेल्या धडपडीची सविस्तर माहिती आता फेसबुक आणि व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून जोरदार चर्चेत आहे. यानिमित्ताने इचलकरंजीतील तत्कालीन कल्पकतेची व संशोधनाची धडपडही पुढे आली आहे.

उद्योजकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजीची ख्याती त्याही काळात कशी राज्यभर गाजली होती, हे यानिमित्ताने पुढे आले आहे. शंकरराव कुलकर्णी या उद्योजकाने तयार केलेली ही कार इचलकरंजी आणि मुंबईच्या रस्त्यावर धावली. मात्र ती पुन्हा कधी रस्त्यावरच आली नाही. याची सविस्तर माहिती या सोशल मीडियाच्या पोस्टवर आहे.
सोशल मीडियावर सध्या अभिमानाने प्रत्येकजण ही पोस्ट पुढे टाकत आहे. ‘

सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची नॅनो माहितेय; पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की, अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः ५० वर्षांपूर्वीच झाला होता. अगदी नॅनो पेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार १९७५ साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. ही कार ‘मीरा’ या नावाने ओळखली जात असे आणि ती कार बनवली होती एका मराठी माणसाने. शंकरराव कुलकर्णी त्यांचे नाव. विशेष म्हणजे शंकररावांचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेले. इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वांत छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती.

कारची किंमत होती १२००० रुपये. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० कि.मी. प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्त्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्त्वाचे पार्टस्‌ देशी होते. कारचे इंजिन देखील भारतीय बनावटीचे होते.

त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यासारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या १५ जणांच्या टीमसोबत १९४५ मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरू केले. १९४९ मध्ये शंकररावांनी या कारचे पहिले मॉडेल तयार केले. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसे बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून ५ मॉडेल त्यांनी बनवले.

शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती, तिचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक होता एम. एच. के. १९०६. इचलकरंजीच्या रस्त्यावर तर शंकरराव कार केव्हापासूनच चालवत होते; परंतु व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ इथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती.

१९७५ साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली होती. परंतु, लाल फितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यामुळे या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. मीरा कारचे मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्‍यकता होती. तसेच अनेक शासकीय परवानग्या देखील गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.

शिवाय त्याच काळात सुझुकी सुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरू करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. अनेक आर्थिक अडचणींना देखील शंकररावांना सामोरे जावे लागले. ही कार त्यावेळी रस्त्यावर कायमपणे धावली असती तर आज इचलकरंजीची आणखी एक नवी ओळख कायमपणे राहिली असती, हेही या निमित्ताने पुढे आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com