महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात होणार फिरते पोलिस ठाणे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

कोल्हापूर - जिल्ह्यातील वाड्या-वस्तीतील नागरिकांना तक्रारी-फिर्यादी दाखल करण्यासाठी मोबाइल (फिरते) पोलिस ठाणे सुरू होणार आहे. यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्या-दीड महिन्यात ठाणे सुरू होईल. 

कोल्हापूर - जिल्ह्यातील वाड्या-वस्तीतील नागरिकांना तक्रारी-फिर्यादी दाखल करण्यासाठी मोबाइल (फिरते) पोलिस ठाणे सुरू होणार आहे. यासाठी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पुढाकार घेतला आहे. पुढील महिन्या-दीड महिन्यात ठाणे सुरू होईल. 

जिल्ह्यात १०३० गावे आहेत. प्रत्येक गावात पोलिसांना पोचणे शक्‍य होतेच, असे नाही. काही वेळा पोलिसपाटलांची मदत घ्यावी लागते. गावातील प्रत्येकाला ठाण्यात जाता येतेच असे नाही. परिणामी पोलिस त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. यासाठी पोलिसांकडून मोबाईल (फिरते) पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कल्पना जिल्ह्यात नवीन असली तरीही राज्यात इतरत्र यापूर्वीच राबविली आहे. 

‘पोलिस प्रत्येकाच्या दारी’ अशा पद्धतीच्या मोबाईल पोलिस ठाण्याचे प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू आहे. जयंत्या-यात्रांमुळे पोलिस व्यस्त आहेत. साधारण महिना-दीडमहिन्यांनी मोबाईल पोलिस ठाणे सुरू होईल.
- संजय मोहिते,
जिल्हा पोलिस अधीक्षक
 

कामकाज कसे चालेल ?
हे ठाणे उद्या कोणत्या गावात आहे, याची माहिती पूर्वीच दिली जाईल. त्यामुळे तक्रारी असतील ते या ठाण्यात देऊ शकतात. तक्रारीबाबत मार्गदर्शन पाहिजे असणारे नागरिक येथे अधिकाऱ्यांना भेटू शकतात. येथे दाखल झालेली फिर्याद-तक्रार पोलिस ठाण्यात झालेल्या तक्रार-फिर्यादीप्रमाणेच ग्राह्य असेल.

कसे असेल ठाणे?
एक सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी येथे असेल. त्यांच्याबरोबर किमान चार-पाच पोलिस कर्मचाऱ्यांची टीम असेल. यामध्ये महिला कर्मचारीही असेल. एकाच मोटारीतून हे पोलिस मोबाईल पोलिस ठाणे म्हणून फिरत राहील.

Web Title: Kolhapur News mobile police Station in District