चिकोत्रातील 8 गुंडांना मोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

मुरगूड - चिकोत्रा खोऱ्यातील लहान-मोठे गुन्हे करत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कापशी परिसरातील पाच आणि त्यांना मदत करणाऱ्या निपाणीतील तीन अशा आठ गुंडांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन (मोका) खाली कारवाई केली.

मुरगूड - चिकोत्रा खोऱ्यातील लहान-मोठे गुन्हे करत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या कापशी परिसरातील पाच आणि त्यांना मदत करणाऱ्या निपाणीतील तीन अशा आठ गुंडांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमन (मोका) खाली कारवाई केली. संशयितांच्या चौकशीसाठी इचलकरंजी व मुरगूड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. कारवाईमुळे चिकोत्रा खोऱ्यातील नागरिकांनी सुटकारा सोडला. संशयित येरवडा कारागृहात आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेनापती कापशी येथील अमोल ऊर्फ आर्या भाई संभाजी मोहिते याने तरुणांना हाताशी धरून अपहरण, खून, खंडणी, मारामारी असे अनेक गुन्हे केले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. कापशी बाजारपेठेत तर त्याने व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्यास सुरुवात केली होती. 

अमोलसोबत सागर हिंदूराव नाईक (कासारी), नेताजी संभाजी मोहिते (सेनापती कापशी), अवधूत संजय लुगडे, प्रदीप ऊर्फ बिल्डर काकासो सातवेकर (दोघेही अर्जुनवाडा), मिलिंद सुरेश सोकासणे, आकाश संजय मोरे, प्रवीण बाबासो जाधव (निपाणी) यांचा समावेश होता. या टोळीने गोवा येथील फिरायला आलेल्या काही तरुणांचे गडहिंग्लज येथून अपहरण केले. त्यांना कासारी येथे डांबून ठेवले होते. त्यांच्याकडून मोटार, काढून घेतली. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत टोळीला मोका लावला. टोळीप्रमुख अमोल मोहिते याला बीड येथे अटक केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक नरळे, सहायक पोलिस निरीक्षक राकेश हांडे, उपनिरीक्षक अमोल तांबे, अल्ताफ सय्यद, नितीन सावंत आदी कर्मचाऱ्यांनी चिकोत्रा खोऱ्यात विशेष मोहीम राबवली. यामध्ये मोहिते नव्याने बांधत असलेल्या घराची माहिती पोलिसांनी घेतली असून सेनापती कापशीत ग्रामस्थांना भेटून माहिती घेतल्याचे हांडे यांनी सांगितले.

चिकोत्रा खोऱ्यातील आठ गुंडांवर पोलिसांनी मोका लावण्याची केलेली कारवाई कायद्याचा धाक दाखवणारी आहे. गोरगरिबांची लुबाडणूक करणाऱ्यांवर अशा कारवाया झाल्या पाहिजेत. अनेक लोकांना त्यांनी त्रास दिला आहे. गुंडगिरीचे लोण ग्रामीण भागात येत आहे. ते रोखण्याची गरज आहे.
- संभाजी भोकरे 

(उपजिल्हा प्रमुख, शिवसेना)

टोळीचे कारनामे

  •  कापशीतील व्यापाऱ्यांना खंडणीसाठी धमकी
  •  गोव्यातील तरुणांचे अपहरण 
  •  तरुणांना डांबून ठेवून मारहाण
  •  सर्व संशयित कारागृहात
  •  टोळीप्रमुख मोहिते कापशीचा
  •  संशयितांच्या मालमत्तेची चौकशी
     
Web Title: Kolhapur News Moka to 8 people in Chikotra