हद्दपार गाैरव भालकरचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

कोल्हापूर - जिल्ह्यातून हद्दपार असलेला संशयित गौरव अशोक भालकरने (वय २८, रा. सम्राटनगर, सध्या रा. आर. के. नगर) मोक्‍काची कारवाई टाळावी, यासाठी पोलिसांना चकवा देत फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आर. के. नगर येथे काल मध्यरात्री हा प्रकार घडला. 

कोल्हापूर - जिल्ह्यातून हद्दपार असलेला संशयित गौरव अशोक भालकरने (वय २८, रा. सम्राटनगर, सध्या रा. आर. के. नगर) मोक्‍काची कारवाई टाळावी, यासाठी पोलिसांना चकवा देत फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आर. के. नगर येथे काल मध्यरात्री हा प्रकार घडला. 

त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर लवकरच जिल्हा बंदी आदेशाच्या भंगासह पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांनी सांगितले. 
राजारामपुरी पोलिस ठाण्यात भालकरवर विविध गुन्हे दाखल आहेत. एनसीसी भवनजवळ जयश्री संजय पाटील यांची वडापावची गाडी आहे. गौरव साथीदारांसोबत तलवार घेऊन १ मेस सायंकाळी तेथे गेला होता. ‘तुमच्या मुलानेच माझे नाव गुन्ह्यात घेतले,’ असा आरोप करत गाडीची तोडफोड केली. माफी मागून ५० हजार द्या, अशी मागणी केली. गल्ल्यातील १५७० रुपये त्याने जबरदस्तीने काढून मुलाला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिली. त्याच रात्री साथीदारांना घेऊन दौलतनगर येथे मोटार, रिक्षा आणि मोटारसायकलची तोडफोड करून दहशत माजवली होती.

याप्रकरणी संशयित गौरव भालकरसह नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर) व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून दोघे पसार झाले होते. भालकरवर मोक्‍का अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 

दरम्यान, कागल पोलिसांनी चेन स्नॅचिंग गुन्ह्याच्या चौकशीत ताब्यात घेतलेल्या शुभम तेलीचा दौलतनगरातील दहशत माजवल्याच्या गुन्ह्यात समावेश असल्याचे पुढे आले. राजारामपुरी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस कोठडी दरम्यान चौकशीत त्याने साथीदार गौरव, ओंकार इंदूलकर आणि नितीन लोखंडे सध्या आर. के. नगर येथील भारतमाता कॉलनीत भाडेकरू म्हणून राहत असल्याचे सांगितले. त्या तिघांना पकडण्यासाठी काल मध्यरात्री एकच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार गुन्हे शोध पथकातील चार कर्मचाऱ्यांसोबत तेथे गेले. येथील एका प्राध्यापकाच्या घरात ते तिघे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी निकम यांना तेथे बोलावून घेतले. त्यांनी भालकर व त्याच्या साथीदारांना दरवाजा उघडण्यास सांगितले; मात्र ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. निकम यांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी तिघांनी पोलिसांच्या अंगावर धावून निसटण्याचा प्रयत्न केला. यात भालकर व ओंकार यशस्वी झाले. नितीन सापडला. 

पोलिसांनाच धमक्‍या 
राजारामपुरी पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर पाच गुंडांना हद्दपार केले. तिघांना मोक्‍का लावला. भालकरवरही मोक्‍क्‍का अंतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू होती. ती थांबावी, यासाठी तो पोलिसांनाच अडकविण्याच्या धमक्‍या देत होता. त्याने आत्महत्येचा प्रयत्न करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 
-  शहाजी निकम,
सहायक पोलिस निरीक्षक

पोलिसांनीच विष पाजले - भालकरचा जवाब

राजारामपुरी पोलिसांनी मारहाण करत विष पाजवून मला मारण्याचा प्रयत्न केला आहे, असा धक्कादायक जवाब हद्दपार गौरव भालकरने दिला आहे. यात सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, गजेंद्र लोहारसह त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख केल्याचे करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी सांगितले.

संशयित भालकर सीपीआरमध्ये दाखल झाल्याची वर्दी पहाटे साडेचारच्या सुमारास करवीर पोलिस ठाण्यात आली. त्यानुसार हेड कॉन्स्टेबल मनुगडे जवाब घेण्यासाठी सीपीआरमध्ये गेले; मात्र तेथे तो मिळाला नाही. ते पुन्हा ठाण्यात आले. 

त्यानंतर साडेपाचच्या सुमारास एका खासगी रुग्णालयातून वर्दी आली. भालकर उपचारासाठी दाखल झाला असून, तो पोलिसांनी विष पाजवून मारल्याचे सांगत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार मनुगडे खासगी रुग्णालयात गेले. तेथे भालकरचा जवाब घेतला. त्यात त्याने म्हटले आहे, की आर. के. नगर येथील भारतमाता कॉलनीत मित्रासोबत होतो.

तेथे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, गजेंद्र लोहार आणि त्याचे सहकारी पकडायला आले होते. त्यांनी मला मारहाण केली. त्यावेळी त्यांना मी मरतो, असे म्हणालो. त्यावेळी तुला आम्हीच मारतो, असे म्हणत लोहार यांनी मला धरले. त्यानंतर निकम यांनी मला फिनेल पाजले. त्यावेळी त्यांच्या हातातून श्री. अवघडे यांनी ती बाटली काढून घेतली, असा जवाब दिला. 

अहवाल ४८ तासांत देणार 
भालकरच्या जवाबाची निःपक्षपणे चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल येत्या ४८ तासांत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना देऊ. चौकशी अंती पुढे संबंधितांवर कारवाई होईल, अशी माहिती करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी दिली.

Web Title: Kolhapur News Mokka to Gourav Bhalkar