हातकणंगलेच्या ‘जिंदाल’ टोळीला मोक्का

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्‍यात चोरी, लूटमार, धमकावणे, खंडणी, हाणामारी असे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या किशोर सुरेश जैद ऊर्फ जिंदाल याच्या टोळीवर पोलिसांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली.

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्‍यात चोरी, लूटमार, धमकावणे, खंडणी, हाणामारी असे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या किशोर सुरेश जैद ऊर्फ जिंदाल याच्या टोळीवर पोलिसांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांनी तपास करून तयार केलेला अहवाल पुणे येथील मोक्का न्यायालयात सादर केला आहे. 

जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांची संख्या वाढली होती. टोळीप्रमुख पाच ते आठ तरुणांचे संघटन करून त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करतात. व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करण्याबरोबर हाणामारी, दहशत आणि हप्तेखोरीमुळे लोक वैतागले आहेत. अशा टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करून प्रस्ताव पाठवण्याचे आदेश सर्वच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हातकणंगले परिसरात खोतवाडी येथील विनायक राजेंद्र माने यांचा संघटित गुन्हेगारीतून खून करणारा जिंदाल टोळीचा म्होरक्‍या किशोर सुरेश जैद ऊर्फ जिंदाल याने अनेक गुन्हे केले आहेत. याबाबत तक्रारी वाढत होत्या. हातकणंगले तसेच इचलकरंजी परिसरात या टोळीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ प्रमाणे ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवण्याची जबाबदारी पोलिस उपाधीक्षक आर. आर. पाटील यांच्यावर सोपवली होती.

गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी तपास करून जिंदाल टोळीचा म्होरक्‍या किशोर सुरेश जैद (वय ४०), शाहरुख आरिफ सुतार (वय ३८), सूरज अब्दुल शेख (वय ३५ ), केशव संजय कदम (वय ३२, रा. सर्व हातकणंगले) यांच्या गुन्हेगारी कृत्यांची यादी तयार करून हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षक संजय मोहिते, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला. त्यांच्या मंजुरीनंतर तो प्रस्ताव कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक बिपिन बिहारी यांच्याकडे पाठवला. तेथून पुण्याच्या मोक्का न्यायालयात हा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार जिंदाल टोळीच्या चौघांही गुंडांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली आहे.

Web Title: Kolhapur News Mokka to Jindal group of Hatkanangle