कुख्यात लाखे टोळीवर ‘मोका’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

इचलकरंजी - येथील कुख्यात ‘लाखे‘ टोळीच्या म्होरक्‍यासह चौघांवर मोकाअंतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. हा प्रस्ताव शहापूर पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला होता.

इचलकरंजी - येथील कुख्यात ‘लाखे‘ टोळीच्या म्होरक्‍यासह चौघांवर मोकाअंतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी मंजुरी दिली. हा प्रस्ताव शहापूर पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला होता. आतापर्यंत मोकाअंतर्गत शहरातील चौथ्या गुन्हेगारी टोळीवर कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे चारपैकी तीन प्रस्ताव शहापूर पोलिस ठाण्याचे आहेत.

दरम्यान, लाखे टोळीचा म्होरक्‍या शाम रंगा लाखे (रा. दत्तनगर, भाटले मळा) याने आज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये एका खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, टोळी प्रमुख शाम लाखेसह त्याचे साथीदार मुबारक महंमद शेख, पैगंबर कासीम मुजावर ऊर्फ पठाण (दोघे रा. प्रभाग ७, लालनगर), हरीकिशन नंदकिशोर पुरोहित (रा. राधाकृष्ण टॉकीज शेजारी) या चौघांवर मोकाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. लाखेसह साथीदार शेख, पठाण, पुरोहित यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. 

पोलिसांनी लाखेला कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतून हद्दपार देखील केले होते. तरी देखील तो हद्दपारीचा आदेश धुडकावून लावून शहरामध्ये वावरत असताना पोलिसांनी त्याला पकडून अटक केली होती. तो सध्या हद्दपारीचा कालावधी संपल्याने शहरात आहे. याचदरम्यान त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांची दखल घेऊन पेठवडगाव पोलिसांनी दुसऱ्यांदा हद्दपारी प्रस्ताव तयार केला. तो मंजुरीसाठी करवीरचे पोलिस उपाधीक्षक सूरज गुरव यांच्याकडे पाठविला आहे. 

या प्रस्तावाची सुनावणी सुरू असताना त्याने उद्योजक महिलेकडे पाच लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास तुमचा खून करू, तसेच कारखाना पेटवू, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी संबंधित उद्योजक महिलेने शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी लाखेचे साथीदार शेख, पठाण, पुरोहित या तिघांना अटक केली. तिघेही सध्या जामिनावर आहेत.

Web Title: Kolhapur News Mokka on Lakhe Gang