महिन्याचे बजेट पेलता पेलेना

अमोल सावंत
बुधवार, 23 मे 2018

प्रत्येक कुटुंबाचे महिन्याचे बजेट ठरलेले असते. त्यासाठी नोकरी व्यवसायातून आलेल्या पैशाचे व्यवस्थापन ते कुटुंब करते; मात्र सातत्याने होत असलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ, लावलेला जीएसटी आणि इतर काही कारणांमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढतच आहेत. महागाईचा दणका सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळे बजेट सांभाळताना कुटुंबांना कसरत करावी लागत आहे. संसाराचा गाडा हाकताना गृहिणी मेटाकुटीस येत आहेत. उत्पन्नाचे स्रोत मर्यादित, पगारवाढ तुटपुंजी, वाढत चाललेले पेट्रोलचे दर यांमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. काहींनी बचतीला फाटा दिला आहे, तर काहीजण आजारपणासाठी राखून ठेवलेली पुंजी वापरात आणत आहेत. महागाईच्या झळा किचनपर्यंत पोचल्या आहेत.

पेट्रोल-डिझेल दर वाढल्याने महिन्याला किमान १५०० ते २००० रुपये खर्च वाढला. याचा परिणाम इतर मनोरंजन आणि बचत करण्यावर झाला आहे. महागाईमुळे बचतीवरच कुऱ्हाड पडली आहे. किमान तीस हजारांहून अधिक महिन्याचे उत्पन्न आवश्‍यक झाले आहे. परिणामी वीस हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना संसार करणे म्हणजे तारेवरील कसरत करावी लागत आहे. उधारी वाढत असून बचत बंद करावी लागत आहे.

दर महिन्याच्या खरेदीत खाद्यतेल, गहू, डाळ, ज्वारीचा समावेश करावा लागतो. मात्र महागाईमुळे ठरलेल्या बजेटपेक्षा जास्त खर्च येतो. भाजीपाला स्वस्त मिळतो; पण किराणा दुकानातून जास्त दराने घ्यायला लागतो.’’
- धनश्री सचिन माळी, मंगळवार पेठ

महागाईमुळे ग्राहक आवश्‍यक तेवढीच खरेदी करतो. दर महिन्याच्या बजेटमध्ये ग्राहकांचे नुकसान होते. आमचा तेलाचा व्यवसाय असल्याने येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण घटले आहे.
- नीलेश विभूते, होलसेल व्‍यापारी

असंघटित क्षेत्रातील कामगार, अल्पभूधारक शेतकरी हे महागाईमुळे भरडले जातात. ग्रामीण, शहरी भागातील ग्राहक हा आवश्‍यक तेवढाच माल विकत घेत आहे. महागाईमुळे अनेकदा आर्थिक तुटवड्याला सामोरे जावे लागते. घर खर्च चालविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
- बबन महाजन, 
किराणा माल व्यापारी

महिन्याचा खर्च हा दहा हजार असून आमचे कुटुंब पाच जणांचे आहे. तांदळाचा दर ३६ रु. किलोवरून ४० रुपये झाला आहे. तसेच खाद्यतेलाचेही आहे. गॅसही घ्यावाच लागतो. अनावश्‍यक खर्च टाळतो. अनेकदा पाणीही विकत घ्यावे लागते.
- सौ. रूपाली सचिन घोरपडे, प्रगतीनगर, पाचगाव

घरात लागणाऱ्या आवश्‍यक वस्तू घ्याव्याच लागतात. महागाईमुळे महिन्याचे बजेट वाढले आहे. डाळी, कडधान्यांचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहेत. ज्याची गरज नाही, अशा गोष्टींवर खर्च न केलेला बरा. 
- श्रीनिवास मिठारी, 
माजी अध्यक्ष, ग्रेन मर्चंट असोसिएशन

Web Title: Kolhapur News Monthly budget issue