म्हातारी झालेय, तरी मुलाला उभं करणारच

राजेश मोरे
रविवार, 13 मे 2018

कोल्हापूर - पिकलं पान कधी गळून पडेल याचा नेम नाही. जन्मल्यापासून पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. त्याचं लंग्न करून दिलं आणि संसार सुरू झाला. वाटलं आता आराम करावा, पण विपरीत घडलं. मुलाला अचानक लकवा मारला.

कोल्हापूर - पिकलं पान कधी गळून पडेल याचा नेम नाही. जन्मल्यापासून पोराला तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलं. त्याचं लंग्न करून दिलं आणि संसार सुरू झाला. वाटलं आता आराम करावा, पण विपरीत घडलं. मुलाला अचानक लकवा मारला. नात्यागोत्यांनी साथ सोडली. मी तर त्याची आई, म्हातारी झालोय म्हणून काय झालं? मुलगा हाय तो माझा. बाबांनो आम्हाला कुठबी न्या, मात्र ताटातूट करू नका आमची...अशी कळकळी भावना थकलेली आई अनुसया शिंदे यांनी व्यक्त केली आणि सीपीआरचा परिसर सुन्न झाला.

गडहिंग्लजमधील छोट्या कुटुंबात रामचंद्र जन्मला. वडील धोंडिबा शेती करायचे. आई अनुसया गृहिणी. रामचंद्र आठ वर्षांचा असताना वडील निवर्तले; पण आई खचली नाही. तिनं रामचंद्रला मोठा करायचं ठरवलं. धुणी-भांड्यांचे काम करून 
त्याला वाढवले. शिक्षणापेक्षा चित्रपटात काम करण्याचे रामचंद्रला भारी वेड. गावात ‘देवघर’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होते. तेथे अभिनेते राजशेखर आले होते. त्यांनी त्याला चित्रपटात स्पॉटबॉय म्हणून संधी दिली.

चित्रपटात भूमिका नसेना, काम तरी करायला मिळते, याचेच रामचंद्रला समाधान होते. कामानिमित्त तो आईला घेऊन कोल्हापुरात आला. तब्बल दहा चित्रपटांसाठी त्याने स्पॉटबॉयचे काम केले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सदस्यही झाला. नंतर त्याचा विवाह झाला, मुले झाली. सगळ ठीक चालले होते; मात्र अचानक विपरीत घडलेच. रामचंद्र यांना २०१४ मध्ये अर्धांग वायूचा झटका आला. त्यांची उजवी बाजू गेली. नात्यागोत्यातील माणसेही एक एकही सोडून गेली. जुना स्पॉट बॉय मित्र उत्तम हेगडे याने गवंडी काम करत त्यांना मदतीचा हात दिला; पण त्यावरही मर्यादा आल्या. चित्रपट महामंडळातील सहकाऱ्यांनीही नुसते ‘काही तरी करतो’ येवढीच आश्‍वासने दिली.

संभाजीनगरातील भाड्याचे घरही शिंदेंना सोडावे लागले. दोन वेळच्या पोटाचा, निवाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला; मात्र नव्वदीतील आईने (अनुसया) मात्र त्यांची साथ सोडली नाही. ‘बाळा माझी काळजी करू नकोस, मी काय आज आहे उद्या नाही, पण ती उभा राहा पुन्हा’ असा धीर ती द्यायची. त्या दोघांना महिन्याभरापूर्वी एकाने सीपीआरमध्ये आणून सोडले. काठी टेकत जाताना लागणारी धाप मुलाच्या पोटात चहाचा घोट पडला की ती विसरून जायची. दोन-चार पैसे जमले की मुलाला औषध आणण्याची तिची घाई असायची. दिवसभर सीपीआरमधील अपघात विभागाच्या समोरील कठड्यावर बसायचे आणि समोरील शेडमध्ये ते माय-लेक रात्र काढायचे. 

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीच्या ते लक्षात आले. त्यांनी याची माहिती ‘एकटी’ संस्थेला दिली. संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर आपल्या सहकाऱ्यांसमवेत आले. त्यांनी त्या दोघांना निवारा घरात नेण्याची तयारी सुरू केली. त्या वेळी मात्र थकलेल्या आईने बाबांनो माझ्या मुलाला तुम्ही उभ करणार, याचा आनंद आहे बाबांनो मला. येते मी तुमच्या बरोबर मात्र या वयात माझी आणि मुलाची ताटातूट तेवढी करू नका... अशा भावना व्यक्त केल्या. मुलाला उभ करण्यासाठी वृद्ध आईची जिद्द पाहून उपस्थितांचीही मनेही हेलावली. 

देविका व हेमांगी या भगिनींनी सामाजिकतेचे दर्शन घडवत, अनुसया शिंदे व त्यांचा मुलगा रामचंद्र यांच्याविषयी माहिती आमच्या संस्थेला दिली. त्यामुळे माय-लेकांचे पुनर्वसन करता आले. या दोन्ही बहिणी कौतुकास प्राप्त आहेत. 
- जैनुद्दीन पन्हाळकर,
एकटी संस्था

Web Title: Kolhapur News Mothers day special story