पश्‍चिम घाटातील घरे जपण्यासाठी चळवळ

सुधाकर काशीद
शुक्रवार, 16 जून 2017

कोल्हापूर - उतरते कौलारू छप्पर, शेणा-मातीच्या भिंती, सारवलेले अंगण, अंगणात बसायला कट्टा, समोर तुळशी वृंदावन, हमखास फुललेली एखादी जास्वंदी असा निसर्गाचाच एक घटक वाटणारी पश्‍चिम घाटातील घरे जपण्यासाठी एक लोकचळवळ उभी राहणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सरहद्दीवर पश्‍चिम घाटात गर्द झाडीत छोट्या छोट्या गावांत आजही अशी घरे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडीचा दुर्गम भाग येथे अशाच घरात पिढ्यान्‌ पिढ्या एक जनजीवन नांदत आहे. असेच जनजीवन पुढच्या पिढीतही जपले जावे, यासाठी ही चळवळ आहे. 

कोल्हापूर - उतरते कौलारू छप्पर, शेणा-मातीच्या भिंती, सारवलेले अंगण, अंगणात बसायला कट्टा, समोर तुळशी वृंदावन, हमखास फुललेली एखादी जास्वंदी असा निसर्गाचाच एक घटक वाटणारी पश्‍चिम घाटातील घरे जपण्यासाठी एक लोकचळवळ उभी राहणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा सरहद्दीवर पश्‍चिम घाटात गर्द झाडीत छोट्या छोट्या गावांत आजही अशी घरे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडीचा दुर्गम भाग येथे अशाच घरात पिढ्यान्‌ पिढ्या एक जनजीवन नांदत आहे. असेच जनजीवन पुढच्या पिढीतही जपले जावे, यासाठी ही चळवळ आहे. 

एक अधिकारी, पण पर्यावरण चळवळीत अगदी तळापर्यंत जाऊन काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या मंजुनाथ सल्लोली यांनी यात पुढाकार घेतला आहे. अशा परिसरात राहणाऱ्या, स्वत: जगता जगता निसर्गालाही जपणाऱ्या साठ जणांची एक समिती त्यांनी स्थापन केली आहे. वनजीवनाबरोबरच वनाच्या साथीने असणारी शेती, जुनी मंदिरे, नैसर्गिक पाणवठे यांची परंपरा जपण्याचा हा एक प्रयत्न असणार आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांच्या साथीने हे लोक पिढ्यान्‌ पिढ्या राहत आहेत. अतिशय आदर्श अशी त्यांची जीवनपद्धती आहे. हा आदर्श बदलत्या जीवनशैलीतही पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याची त्यांची ही धडपड आहे. 

पश्‍चिम घाटातल्या दुर्गम भागातली ही घरे म्हणजे तिथल्या परिस्थितीत एकरूप झालेला हा खूप चांगला निवारा आहे. येथे घराच्या मागे-पुढे डोंगर, झाडी असते. घर माती-विटांचे किंवा कुडाचे असते. शेण, माती, गूळ यांच्या मिश्रणाने त्यावर गिलावा केलेला असतो. घरावर गवताचे किंवा कौलारू उतरते छप्पर असते. पावसाचे पाणी झटकन पुढे निघून जावे, हे त्यामागचे कारण असते. दारात शेणाने विशेषत: गायीच्या शेणाने सारवलेले अंगण असते. या अंगणाचे तेज कोणत्याही किमती फरशीपेक्षा अधिक असते. कितीही मोठा माणूस असू दे, त्याला या अंगणात निवांत पाय पसरून बसण्याचीच इच्छा होते. दारात एका कोपऱ्यात तुळस किंवा जास्वंदी फुललेली असते. या घरात उन्हाळ्यात गारवा व थंडीत दमटपणा असतो. शेणाने सतत सारवल्यामुळे किड्या-मुंग्यांचा वावर कमी असतो. या घरांना कोणी आर्किटेक्‍ट नसतो. स्थानिक गवंडी, सुताराच्या कौशल्यातून या घराला सुंदर आकार येतो. जो या परिसरातल्या निसर्ग वैभवाचाच एक घटक होतो. 

या घरात पाण्यासाठी रांजण असतो. घरातील सांडपाण्यावर घरासाठी पुरेल एवढी भाजी पिकवली जाते. बाजूला जनावरांचा गोठा असतो. कोंबड्याचा खुराडा असतो. शेळ्या-मेंढ्यांचा इकडून तिकडे सहज वावर असतो. माणूस आणि पाळीव प्राणी यांचा एक घरोबाच येथे निर्माण झालेला असतो. 
बदलत्या परिस्थितीतही आज ही घरे आहेत. पण लोक मिळवते झाल्याने घरात, घरासमोर फरशी, भिंतीला आईल पेंट, जनावरांसाठी पत्र्याचे शेड असा बदल होऊ लागला आहे. हा बदल अपरिहार्य आहे. तरीही या घरांचे मूळ रूपच जपले जावे, यासाठी मंजुनाथ सल्लोली व त्याचे सहकारी एक लोकचळवळ उभी करत आहेत. कारण या घरांना कृत्रिम सांधनांची जोड मिळाली तर त्यांचे देखणेपणच संपणार आहे.

आपल्यासारख्या उच्चशिक्षितांना माहीत नाहीत असे बारकावे या पश्‍चिम घाटातील पिढ्यान्‌ पिढ्या रहिवाशांना माहिती आहेत. त्यांची घरे, त्यांचा आहार, त्यांची पिके, त्यांचे सांस्कृतिक जीवन हा केवळ अभ्यासाचा नव्हे तर टिकवण्याचा विषय आहे. 
- मंजुनाथ सल्लोली

Web Title: kolhapur news movement for western vally home saving