राजकीय भूमिका ज्या त्या वेळी - खासदार शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची झालेली आर्थिक दुरवस्था, यासंदर्भात काँग्रेसला जी चिंता वाटते, याच मुद्द्यांवर २९ मार्चला अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे; यासाठीच त्यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीचा अर्थ एवढाच असून, राजकीय भूमिका ज्या त्या वेळी ठरवू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

कोल्हापूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांची झालेली आर्थिक दुरवस्था, यासंदर्भात काँग्रेसला जी चिंता वाटते, याच मुद्द्यांवर २९ मार्चला अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित राहावे; यासाठीच त्यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीचा अर्थ एवढाच असून, राजकीय भूमिका ज्या त्या वेळी ठरवू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

श्री. शेट्टी यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते. या भेटीनंतर श्री. शेट्टी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेससोबत जाणार अशा बातम्या फिरू लागल्या. या पार्श्‍वभूमीवर श्री. शेट्टी यांच्याकडूनच यासंदर्भातील खुलासा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात काँग्रेसच्या भूमिकेचे स्वागत करताना आगामी निवडणुकीबाबतची भूमिका योग्य वेळी ठरवू, असे म्हटले आहे.

श्री. शेट्टी म्हणतात, ‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न घटून कर्ज वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी व उत्पादनखर्चाच्या दीडपट भाव या ज्या मागण्या आहेत, त्याचे काँग्रेस पक्ष समर्थन करतो. त्याचबरोबर शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग, बाजारव्यवस्था, तंत्रज्ञान यांची जोड देण्याची गरज आहे. याबाबत करावयाच्या उपाययोजनांवर मला शेतकरी नेत्यांशी गांभीर्याने चर्चा करायची आहे, 

त्यासाठी वेळ मिळावा, अशा प्रकारची भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मांडली. आम्हीही त्यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली, कोण जर शेतकऱ्यांसाठी चांगले करत असेल तर आम्ही त्याचे समर्थनच करू अशी आमची भूमिकाच आहे.’’

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आम्ही जी दोन विधेयके किसान संसंदेत पारित केली आहेत, त्याच्या समर्थनासाठी २९ मार्चला समितीची बैठक बोलावली आहे. बैठकीला यावे यासाठी आम्ही वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना निमंत्रित केले आहे. लोकसभा व राज्यसभेत लवकरच ही विधेयके मांडली जाणार आहेत, संपूर्ण कर्जमाफी व उत्पादनखर्चावर दीडपट हमी भाव मिळावा ही ती विधेयके आहेत,

आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांनी बैठकीला यावे यासाठी त्यांची भेट घेतली. ‘मी स्वतः येईन किंवा पक्षाची जबाबदार व्यक्ती पाठवू,’ असे आश्‍वासन श्री. गांधी यांनी दिले आहे. अशाच निमंत्रणासाठी वेगवेगल्या पक्षांच्या प्रमुखांना भेटणार आहोत, सातबारा कोरा व्हावा यासाठी वाटेल ते करायची भूमिका अखिल भारतीय किसान सभेने घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही त्यातील एक घटक आहे, एवढाच आजच्या बैठकीचा अर्थ आहे. राजकीय भूमिका ज्या त्या वेळी ठरतील, असे श्री. शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News MP Raju Shetty comment