रायगड प्राधिकरण अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर - किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा येथे करण्यात आली. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

नागपूर - किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा येथे करण्यात आली. प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

शिवछत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडच्या संवर्धनासाठी शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. रायगड संवर्धन जगातील दुर्ग अभ्यासकांसाठी आदर्श ठरावा व त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

भारताचा मानबिंदू व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगडाच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन केले आहे. त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविली आहे. सर्व शिवभक्तांतर्फे मी ही जबाबदारी स्वीकारत आहे. रायगड हा आपल्या सर्वांचा असून, रायगडाच्या संवर्धनकार्यात प्रत्येक शिवभक्तांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.
- संभाजीराजे छत्रपती, खासदार

खासदार संभाजीराजे यांनी ६ जूनला दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजरा करणे सुरू केले. हा सोहळा पुढे लोकोत्सव बनला. खासदार संभाजीराजे यांनी रायगडचे जतन व संवर्धन करण्याची मागणी सरकारकडे केली होती. रायगडावर २०१६ च्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी मुख्यमंत्र्यांनी रायगड संवर्धनासाठी ६०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती.

आजवर रायगडावर ६ जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, रिकाम्या मेघडंबरीत शिवछत्रपतींची शिवभक्तांच्या पाठिंब्यावर बसवलेली शिवमूर्ती, तसेच युनेस्को या जागतिक वारसा जतन व संवर्धन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापुरात आमंत्रित करून महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

खासदार संभाजीराजे यांनी आजवर गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धनासाठी सर्वसमावेशक गोष्टींचा विचार करून रायगडाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा व भुदरगड किल्ल्यांसाठी दहा कोटींचा विशेष निधी मंजूर करून आणला. गड-किल्ले संवर्धनाचे ब्रॅंड ॲम्बॅसिडर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवरायांच्या १०३ गडकोटांवर एकाच दिवशी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. रायगडाचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी, तसेच पर्यटनाच्या दॄष्टीने जगाच्या नकाशावर रायगड येण्यासाठी शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीत रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकणचे आयुक्त जगदीश पाटील, प्रधान सचिव (पर्यटन व सांस्कृतिक) नितीन गद्रे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, डॉ. एम. नंबीराजन, डॉ. उषा शर्मा, विजय वाघमारे, रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक भगवान चिले, रघुजी आंग्रे, राम यादव, सुधीर थोरात आदींचा समावेश आहे.

Web Title: Kolhapur News MP SambhajiRaje as president of Raigad Authority