भाऊसिंगजी रोडवर होणार बहुमजली पार्किंग

विकास कांबळे
मंगळवार, 4 जुलै 2017

जिल्हा परिषद इमारतीच्या जागेत प्रकल्प - महापालिकेकडून परवाना कर माफीची अपेक्षा

जिल्हा परिषद इमारतीच्या जागेत प्रकल्प - महापालिकेकडून परवाना कर माफीची अपेक्षा
कोल्हापूर - महापालिकेच्या जागांवर खासगीकरणातून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांना होत असलेल्या विरोधामुळे बहुमजली पार्किंग उभारण्याचा महापालिकेचा प्रकल्प कागदावरच राहिला आहे; मात्र ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परिषदेने हा बहुमजली पार्किंगचा प्रकल्प आता हाती घेतला आहे. भाऊसिंगजी रोडवर मराठा बॅंकेसमोरच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे; मात्र त्यासाठी महापालिकेने परवान्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या पार्किंगची सोय असणार आहे.

साडेतीन शक्‍तीपीठापैकी एक असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. अजूनही शहरात चांगल्या दर्जाचे पार्किंग व्यवस्था नाहीत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्यांची वाहने रस्त्याकडेलाच उभी करावी लागतात. यासाठी महापालिकेच्या वतीने बहुमजली पार्किंग उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला, मात्र अलीकडील काळात नव्या प्रकल्पाला विरोध करण्याची फॅशनच झाली आहे. सुरवातीला मध्यवर्ती बस स्थानकाजवळची जागा बहुमजली पार्किंगसाठी जागा निश्‍चित करण्यात आली. त्याठिकाणी विरोध झाला. त्यामुळे तो प्रस्ताव बारगळला. त्यानंतर महालक्ष्मी मंदिराजवळ प्रकल्प उभा करण्याचा निर्णय झाला; पण याठिकाणाच्या जागेचा वापर करणाऱ्यांनी त्यालाही विरोध केला. तेव्हापासून बहुमजली पार्किंगची चर्चा थांबली होती. 

जिल्हा परिषदेने आता भाऊसिंगजी रोडवरील स्वत:च्या जागेत बहुमजली पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषदेलाही उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होणार आहे.

जिल्हा परिषदेची शहराच्या मध्यवस्तीत आणि अंबाबाई मंदिरापासून अगदी जवळ भाऊसिंगजी रोडवर अकरा हजार चौरस फूट इतकी प्रशस्त जागा आहे. याठिकाणी सध्या शॉपिंग सेंटर आहे. यापूर्वी या जागेवर बचत गटांसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याची योजना होती. इमारतीमधील काही गाळे त्यांना दिलेही, पण फार काळ हे चालले नाही. जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्ह्यातून येत असतात. चंदगडसारख्या लांबच्या सदस्यांना राहण्याची सोय व्हावी, म्हणून याठिकाणी जिल्हा परिषदेचे विश्रामधाम बांधावे, असेही सुचविण्यात आले होते, पण त्याचा खर्च पाहता पुढे त्यावर काही चर्चा झाली नाही. 

दरम्यानच्या काळात जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेजवळच बंगले बांधण्यात आले. त्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील जागा तशीच पडून आहे. जिल्हा परिषदांना पूर्वी शासनाकडून थेट निधी येत असे. शासनाच्या वतीने मिळणारा निधी आता थेट ग्रामपंचायतींना पाठविण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांना निधीची टंचाई जाणवू लागली. त्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर शॉपिंग सेंटर व बहुमजली पार्किंग उभारण्याची कल्पना बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांना सुचली. त्यांनी त्यावर आराखडा तयार केला.

सध्या इमारतीमध्ये काही गाळे भाड्याने दिले आहेत. त्यांना आहे तसे ठेवायचे. त्यासंदर्भात गाळेधारकांशी प्रशासनाने चर्चा सुरू केली आहे. साधारणपणे सहा कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यामध्ये महापालिका परवाना फीची रक्‍कमच अधिक आहे. ती माफ व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याशिवाय गाळेधारकांकडूक अनामत रक्‍कम घेण्यात येणार आहे. त्यातूनही काही निधी उपलब्ध होणार आहे. बेसमेंट, लोअर ग्राऊंड, अप्पर ग्राऊंड आणि पाच मजले अशी इमारत बांधण्यात येणार आहे. बेसमेंट, लोअर ग्राऊंड, अपर ग्राऊंड याठिकाणी शॉपिंग कॉम्लेक्‍स असणार आहे. पाच मजले पार्किंगसाठी असणार आहेत. याठिकाणी पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महालक्ष्मी मंदिराजवळच ही जागा असल्यामुळे पर्यटकांची चांगली सोय होणार आहे. पार्किंगची अडचणही दूर होणार आहे.

सर्वांच्या सहकार्याने प्रकल्प शक्‍य
जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंतापदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आराखडा तयार केला. सहा कोटींचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी शासनाकडूनही निधी मागण्याची आवश्‍यकता लागणार नाही. कारण यात सर्वात मोठी दीड ते पावणेदोन कोटी रक्कम महापालिका परवान्याची आहे. त्यामुळे ती महापालिकेने माफ केली, तर निश्‍चितच खर्च कमी होईल आणि महापालिका या प्रकल्पाला सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: kolhapur news multiple parking on bhausingaji road