प्रतीकात्मक तिरडीसह सभेत घुसण्याचा प्रयत्न रोखला

प्रतीकात्मक तिरडीसह सभेत घुसण्याचा प्रयत्न रोखला

कोल्हापूर - पंचगंगा स्मशानभूमीच्या विकासासाठी शासन निधी देत नसल्याच्या निषेधार्थ आज प्रतीकात्मक तिरडीसह सभागृहात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकांना रोखण्यात आले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळी हा प्रकार घडला. 

स्टंटबाजी नको, अशी शेरेबाजी विरोधी आघाडीच्या वतीने होऊ लागल्यानंतर शारंगधर देशमुख यांनी ही स्टंटबाजी नाही, शासन निधी देत नसल्यामुळे लक्ष वेधण्यासाठी ही वेळ आली. नेत्यांना महापालिकेला निधी देण्यास लाज वाटते काय, असा सवाल केला. शहराचा विकास करणे जमत नसेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही श्री. देशमुख यांनी केली. त्यावर भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. उपमहापौर अर्जुन माने सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

अभिनंदन, दुखवट्याचे ठराव झाल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन झाले. प्रश्‍नोत्तराच्या तासाला सुरुवात करण्यात आली. डेंगीसंदर्भात भूपाल शेटे प्रश्‍न उपस्थित करत असतानाच सभागृहाबाहेरून घोषणा ऐकू येऊ लागल्या. अफजल पिरजादे खांद्यावर टॉवेल टाकून हातात मडके घेऊन सभागृहात प्रवेश करत होते. त्यांच्यामागे राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, संदीप कवाळे, मुरली जाधव, अजिंक्‍य चव्हाण आदी तिरडीसह प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सभागृहात श्री. पिरजादे यांना प्रवेश दिला. तिरडी सभागृहात आणण्यास भाजप ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला. सभागृहाचे पावित्र्य राखण्यासाठी सभागृहात तिरडी आणू नये, असे आवाहन विरोधी आघाडीने केले. त्यामुळे तिरडी बाहेर ठेवण्यात आली. त्यानंतर सर्व सदस्य सभागृहात आले. 

सदस्य आत येत असतानाच किरण नकातेंसह काही नगरसेवकांनी स्टंटबाजी नको, अशी शेरेबाजी केली. त्यामुळे शारंगधर देशमुख उठले आणि म्हणाले, ‘‘स्टंटबाजी म्हणत प्रश्‍नाचे गांभीर्य घालवू नका. पंचगंगा स्मशानभूमीसाठी निधी देण्यास जिल्ह्यातील नेत्यांना लाज वाटते काय? पालकमंत्र्यांनी आजपर्यंत किती निधी महापालिकेला दिला. एक रुपयाही निधी दिला नाही, हे कबूल करावे.’’

याला सत्यजित कदम, किरण शिराळे, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, अजित ठाणेकर आदींनी आक्षेप घेतला. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. सत्यजित कदम यांनी गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसच्या नेत्यांनी काय केले, असा सवाल केला. यावर श्री. देशमुख यांनी शहराचा विकास करावयास जमत नसेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर तर या गोंधळात अधिकच भर पडली. दोन्ही आघाडीचे नगरसेवक एकाचवेळी बोलत होते.

गोंधळ सुरू असतानाच श्री. पिरजादे यांनी सोबत आणलेले शितोंडे आयुक्तांच्या समोर टेबलावर ठेवले आणि ते म्हणाले, ‘‘पंचगंगा स्मशानभूमीची अवस्था अतिशय वाईट आहे. कृपया यामध्ये सत्तारूढ, विरोधी आघाडी असे राजकारण आणण्याचा कोणी प्रयत्न करू नये. स्मशानभूमीत बेडची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे. पार्किंगला जागा नाही. यासंदर्भात वारंवार प्रश्‍न उपस्थित केला आहे; मात्र प्रशासनाने आजपर्यंत त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनाची वेळ आली. मला काही स्टंटबाजी करायची नव्हती. या निमित्ताने स्मशानभूमीच्या विकासावर चर्चा व्हावी आणि ठोस उपाय व्हावेत, अशी अपेक्षा आहे.’’ सत्यजित कदम यांनीही या कामाच्या दिरंगाईबाबत प्रशासनावर ठपका ठेवला.

ते म्हणाले, ‘‘या स्मशानभूमीप्रमाणेच शहरातील अन्य स्मशानभूमींची दुरवस्था आहे. पंचगंगा स्मशानभूमीच्या विकासासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे काय? शासनाकडून त्यावर काही उत्तर आले आहे काय?’’ यावर प्रशासनाने खुलासा करावा. महापालिका पातळीवर हा प्रश्‍न प्रलंबित असेल तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दोष देऊ नये. यावर श्री. देशमुख यांनी पालकमंत्री महापालिकेला विकासकामांसाठी निधी देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पंचगंगा स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाने निधी द्यावा.

खुलासा करताना शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, ‘‘पंचगंगा स्मशानभूमीत सहा बेड वाढविण्याचा प्रस्तावावर उर्वरित विकास वैधानिक महामंडळाने १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. वाढीव जागा ताब्यात घेऊन एकत्रित आराखडा तयार करण्यात आला आहे. तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.’’ यावर श्री. देशमुख यांनी, प्रोजेक्‍ट विभागाला काम वेळेवर होत नसेल तर हा विभाग बंद करावा, अशी सूचना केली.

विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘‘लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पर्याय म्हणून निवडण्यात आलेली गॅस दाहिनी बसविण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करावा.’’ यावर डॉ. विजय पाटील यांनी, दोन दिवसांत गॅस दाहिनीचे साहित्य येईल, असे सांगितले. मुरलीधर जाधव यांनी, ‘‘स्मशानभूमीत कर्मचाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. ती वाढवावी, अशी मागणी केली.’’

सत्यजित कदम यांनी नोंद करून घेणारी व्यक्‍ती चांगली असावी, अन्यथा या ठिकाणी चूक झाली तर त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतात आणि विनाकारण त्रास सहना करावा लागतो’’, असे सांगितले. श्री. देशमुख यांनी, रक्षा विसर्जनाबाबत लोकप्रबोधन करण्यासाठी महापालिकेने त्या ठिकाणी एखादा फलक लावावा. त्यामुळे रक्षाविसर्जन करण्यासाठी एकाचवेळी होणारी गर्दी कमी करता येईल, अशी सूचना केली. 

भूपाल शेटे यांनी सर्वधर्मीयांची एक स्मशानभूमी करावी, अशी मगणी केली. उमा बनछोडे यांनी लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी निधी द्यावा, कर्मचारी नेमावेत, अशी मागणी केली. तौफिक मुलाणी यांनी मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठीही निधी द्यावा, अशी मागणी केली. शववाहिका वाढविण्याची मागणी अभिजित चव्हाण, किरण नकाते यांनी केली. चर्चेत शमा मुल्ला, महेश सावंत, संतोष गायकवाड आदींनी भाग घेतला. 

यावर आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ‘‘पंचगंगा स्मशानभूमीच्या विकासासंदर्भात वाढीव जागेसह आराखडा तयार करून त्यावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. स्मशानभूमीच्या विकासासाठी प्रशासनही प्रयत्न करत आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com