कोल्हापूरात घरफाळावाढीला विरोधच

कोल्हापूरात घरफाळावाढीला विरोधच

कोल्हापूर - महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या घरफाळावाढीच्या प्रस्तावावरून महापालिकेचे सभागृह आज दणाणून गेले. विरोधी आघाडीसह सत्तारूढ आघाडीच्या नगरसेवकांनी घोषणा देत घरफाळावाढीच्या विरोधात प्रशासनाला धारेवर धरले.

शिवसेनेचे नगरसेवक तर घरफाळावाढीच्या विरोधात घोषणा देत मोर्चानेच सभागृहात आले. घरफाळावाढ कदापि मान्य करणार नाही, असा इशारा दिल्यानंतर आजची सभा तहकूब करण्यात आली. सध्या आकारण्यात येत असलेल्या घरफाळ्यामध्येही कपात करण्यासाठी घरफाळावाढीचा सादर केलेला प्रस्ताव पुढील मीटिंगमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर स्वाती यवलुजे होत्या.

आजच्या बैठकीत घरफाळा विभागाच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवत घरफाळ्याच्या वसुलीऐवजी मलईसाठी तडजोडी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेपुढे घरफाळावाढीचा प्रस्ताव होता. घरफाळावाढीच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा सर्वच नगरसेवकांनी निर्णय घेतला होता. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभा सुरू होताच सत्यजित कदम यांनी, घरफाळावाढीच्या प्रस्तावाचा विषय काढला. 

ते म्हणाले, ‘‘महापालिकेत कररचनेत बदल करावयाचा झाल्यास प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावावर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा होत असे. सभागृहापुढे प्रस्ताव आणण्यापूर्वी त्याची प्रत नगरसेकांना दिली जायची. यावेळी मात्र प्रथमच प्रशासनाने थेट प्रस्ताव सभागृहापुढे आणला आहे. दरवर्षीच्या फेब्रुवारीमध्ये करनिश्‍चिती होत असते. असे असताना हा प्रस्ताव सादर करताना दिरंगाई का केली?’’ विजय सूर्यवंशी म्हणाले, ‘‘महापालिकेत यापूर्वी कधीही कररचनेचा विषय पुरवणी विषयपत्रिकेवर कधी आला नव्हता. यावेळी मात्र हा विषय पुरवणी पत्रिकेवर आहे. यावरून प्रशासनाचा कारभार दिसून येतो.’’

चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक नियाज खान, प्रतिज्ञा निल्ले हातात फलक, झेंडे घेऊन घरफाळावाढीच्या विरोधात घोषणा देतच सभागृहात आले. त्यामुळे सभागृह दणाणून गेले. ‘घरफाळावाढ रद्द झालीच पाहिजे’, ‘अन्यायी घरफाळावाढ मागे घ्या’, ’आवाज कुणाचा शिवसेनेचा’ असे फलक त्यांनी हातात धरले होते. शिवसेनेच्या नगरसेवकांकडे पाहत सत्यजित कदम यांनी, ‘सत्तेत आहात आणि मोर्चा कशाला काढता,’ असा चिमटा काढला.

आयुक्‍तांकडे पाहत ते म्हणाले, ‘‘प्रशासन अशा प्रकारे मनमानीपणाने वागणार असेल तर घरफाळावाढीच्या विरोधात आम्ही सर्व नगरसेवकपदांचे राजीनामे देऊ. तुम्हीच कारभार करा. २०११ मध्ये आमची दिशाभूल करून घरफाळ्याबाबत ठराव करून घेतला. महापालिका बेकायदेशीरपणे लोकांकडून घरफाळा रक्‍कम वसूल करत आहे. नागरिकांची ही रक्‍कम महापालिकेने व्याजासह देणे आवश्‍यक आहे.’’ अशोक जाधव यांनी लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता सादर केलेला प्रस्ताव नामंजूर करून प्रशासनाचा निषेध करण्यासाठी सभा तहकूब करावी, अशी मागणी केली.

शारंगधर देशमुख म्हणाले, ‘‘सर्वसाधारण सभा सुरू झाली, तरी करवाढीचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. प्रशासनाने अद्याप तो का दिला नाही? घरफाळावाढीचा प्रस्ताव आम्ही फेटाळणारच आहोत. त्यापूर्वी प्रस्तावात किती घरफाळावाढ सुचविण्यात आली आहे, त्याची माहिती द्यावी. त्याचप्रमाणे सध्या असलेला घरफाळा कमी करावयाचा आहे, त्यासाठी काय करावे लागेल. भाड्याच्या इमारतींना घरफाळा जवळपास सत्तर टक्‍क्‍यांवर जात असल्याने मिळकतधारक भाडेकराराची रक्‍कम कमी दाखवतात आणि मेंटेनन्सची रक्‍कम अधिक दाखवतात. बहुतांशी मिळकतधारक तर भाडेकरूची नोंदच करत नाहीत. त्याचा फटका महापालिकेलाच बसत असतो.’’

मुरलीधर जाधव यांनीही सभागृहापुढे प्रस्ताव सादर करण्यापुर्वी गटनेत्यांची बैठक होणे अपेक्षित असते; मात्र तीही झालेली नाही. हे योग्य नाही, असे सांगितले. करनिर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे प्रस्तावाची माहिती देऊ लागले. श्री. कारंडे माहिती देत असतानाच नागरिकांनी वाढीव घरफाळ्याच्या विरोधात घोषणा देण्यास सुरवात झाली. प्रस्ताव नामंजूर केला तर आठ कोटींचा महापालिकेला आर्थिक भुर्दंड बसेल असे सांगितले.

त्यानंतर श्री. कारंडे यांना धारेवर धरण्यास सुरवात केली. श्री. देशमुख यांनी म्हटले, की प्रस्ताव आम्ही नामंजूर करणारच; पण घरफाळा कमी करण्याबाबत काय करता येईल, ते सांगा. मेहजबीन सुभेदार यांनी घरफाळा भरण्यासाठी आलेल्या लोकांकडून तो भरून घेतला जात नसल्याचा आरोप केला. विलास वास्कर यांनीही घरफाळा भरून घेण्याची व्यवस्था करावी. महापालिका शहरवासीयांना सुविधा पुरवत नाही, मग त्यांना घरफाळा का द्यायचा, असा सवाल केला.

घरफाळा अधिक असल्यामुळे शहराचा विकास होत नाही, असे अर्जुन माने यांनी सांगितले. किरण नकाते यांनी, भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीची पद्धत स्वीकारण्याची चूक झाली असेल; पण आता ती चूक सुधारण्यासाठी काय केले पाहिजे, ते सांगा अशी मागणी केली. भूपाल शेटे यांनी, घरफाळा विभागाने सुरू केलेला सर्व्हे बोगस आहे. केवळ पैसे खाण्यासाठी घराफाळा विभागाने ही टूम काढली आहे. मुदत संपली तरी अद्याप सर्व्हे पूर्ण झालेला नाही; तरीदेखील त्याला पैसे पोहोच झाले आहेत; त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी.
तीस कोटी थकबाकी

अजित ठाणेकर म्हणाले, ‘‘घरफाळा विभागाची वसुली व्यवस्थित होत नाही. १३ हजार मिळकतींना अद्याप घरफाळा लागू झालेला नाही. याला जबाबदार कोण? सर्व्हे करणाऱ्या कंपनीने अद्याप सर्व्हे पूर्ण केला नाही, याला जबाबदार कोण? त्याच्यावर काय कारवाई केली. मोठ्या मिळकतधारकांसह थकबाकीचा आकडा ३० कोटी आहे. त्याच्या वसुलीसाठी काय प्रयत्न केले? ती थकबाकी का वसूल होत नाही? घरफाळा भरावयास आलेल्या लोकांना परत पाठविले जाते. घरफाळा भरून घेतला जात नाही. अशी परिस्थिती असताना महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी  केवळ घरफाळा वाढविणे कितपत योग्य आहे, याचा अधिकाऱ्यांनीही विचार करावा.’’

सूरमंजिरी लाटकर, राहूल चव्हाण, उमा बनछोडे, मुरली जाधव, आदींनीही चर्चेत भाग घेतला. घरफाळ्याची चर्चा वाढत असतानाच सर्वच नगरसेवकांनी घरफाळावाढीच्या विरोधातील फलक हातात धरत सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. ‘दोन महिनेच वसुली न करता वर्षभर वसुली करावी’, ‘घरफाळावाढ रद्द करावी’ आदी फलक हातात धरले होते.

अधिकारी पैसे खातात
घरफाळावाढीच्या विरोधात नगरसेवक आक्रमक असताना घरफाळा विभागाचे प्रमुख दिवाकर कारंडे प्रस्ताव नामंजूर केला तर महापालिकेचे कसे नुकसान होईल, असे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर मुरली जाधव यांनी त्यांना ‘बोलबच्चन बास आता,’ असे म्हणत खाली बसविण्याचा प्रयत्न केला. सत्यजित पाटील यांनी घरफाळा वसुलीऐवजी या विभागाच्या अधिकाऱ्यांचे पैसे खाण्याकडेच अधिक लक्ष असल्याचा आरोप केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com