पक्षापेक्षा उमेदवार मोठा यामुळेच कोल्हापूर महापालिकेत अस्थिरता

सुधाकर काशीद
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - पक्षाच्यावतीने उभे राहणाऱ्याला निवडून आणण्यापेक्षा जे निवडणुकीत कोणत्याही पक्षातर्फे उभे राहिले तरी निवडून येऊ शकतील, अशांनाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्याचे परिणाम आता महापालिका राजकारणात उमटू लागले आहेत.

निवडून आलेल्यांत पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलेले थोडे; पण उमेदवारी घ्या म्हणून पक्षच अनेकांकडे गेल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांवरील नेत्यांची पकड ढिली झाली आहे. किंबहुना, केवळ पक्षामुळे आम्ही निवडून आलेलो नाही, आमची ताकद स्वतंत्र आहे, अशीच काही नगरसेवकांची आजही उघड भावना आहे.

कोल्हापूर - पक्षाच्यावतीने उभे राहणाऱ्याला निवडून आणण्यापेक्षा जे निवडणुकीत कोणत्याही पक्षातर्फे उभे राहिले तरी निवडून येऊ शकतील, अशांनाच महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्याचे परिणाम आता महापालिका राजकारणात उमटू लागले आहेत.

निवडून आलेल्यांत पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गेलेले थोडे; पण उमेदवारी घ्या म्हणून पक्षच अनेकांकडे गेल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांवरील नेत्यांची पकड ढिली झाली आहे. किंबहुना, केवळ पक्षामुळे आम्ही निवडून आलेलो नाही, आमची ताकद स्वतंत्र आहे, अशीच काही नगरसेवकांची आजही उघड भावना आहे.

महापालिका निवडणुकीत यामुळेच ऐनवेळी निवडून येणारे हुकमाचे पान ओळखून उमेदवारी दिली होती. पक्षाचे प्रत्यक्षात कार्य करणारे निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेले.

राष्ट्रवादीचे अफझल पिरजादे, अजिंक्‍य चव्हाण व मुरलीधर जाधव या तिन्ही उमेदवारांना अक्षरशः गळ घालून उमेदवारी दिली होती. किंबहुना हे निवडून येणार म्हणून अन्य पक्षांनीही त्यांच्याकडे गळ घातली. आता याच पद्धतीने अन्य तीन नगरसेवकांच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे काहीतरी गोंधळ उडणार याचा अंदाज आघाडीप्रमुखांना आला आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक या सर्व घडामोडीत कळीचा मुद्दा बनणार आहेत. गेली तीन वर्षे स्थायीचे एक सदस्य पद आणि गॅसवर असलेल्या केएमटीचे सभापतिपद शिवसेनेला दिले. शिवसेनेचे चार नगरसेवक किंबहुना शिवसेनेने महापालिकेच्या राजकारणात भाजपला पाठिंबा देण्याऐवजी तटस्थतेची भूमिका घेतली तरी महापालिकेच्या राजकारणाची दिशा बदलू शकणार आहे आणि शिवसेनेचे नियाज खान यांनी शिवसेना सदस्यांच्या मनातील खदखद प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.

अपक्ष नगरसेवकांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे महापालिकेच्या राजकारणावर खूप टीका होत होती. घोडेबाजाराने कळस गाठला होता. कोणाचेच कोणावर नियंत्रण नसल्याने अस्थिरता हा घटक प्रामुख्याने होता. तो संपवण्यासाठी राजकीय पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढली जाईल अशा तयारीने राजकीय पक्षांनी जरूर चांगला पवित्रा घेतला. जेणेकरून पक्षाची ध्येयधोरणे किंवा शहर विकासाच्या योजना एकमताने राबवता येतील हा हेतू होता; पण वस्तुस्थिती अशी की, पक्षांनी उमेदवारी देताना कार्यकर्त्यांऐवजी जे निवडून येऊ शकतील अशांना शोधून किंवा अशांनाच गळ घालून उमेदवारी दिली. त्यामुळे आपण पक्षामुळे निवडून आलो, ही भावनाच काही नगरसेवकांत राहिली नाही. कोणत्याही पक्षातून उभे राहिलो असतो तरी आपण निवडून आलो असतो, तीच नगरसेवकांची भाषा कायम राहिली. त्याचेच परिणाम आता दिसू लागले आहेत आणि या अस्वस्थतेचा फायदा सत्ता बदलासाठी घेण्यासाठी मोठ्या उलाढाली झाल्या तर ते आश्‍चर्य नसणार आहे.

शिवसेनेच्या चारही नगरसेवकांनी कायम काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडी म्हणून अडचणीच्या काळातही मदत केली. उलट आघाडीत काही घटना घडल्या, त्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचीच नाराजी व्यक्त झाली.आम्ही फक्त अस्तित्व दाखवण्यासाठी राहुल चव्हाण यांचा अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली. पुढील पदाधिकारी निवडीच्या वेळी शिवसेनेच्या नगरसेवकाला मोठे मानाचे पद मिळावे, अशी आमची भूमिका नेत्यांकडे मांडणार आहोत आणि आम्ही मोठे पद मागण्यात वावगे काहीच नाही.
-नियाज खान,
नगरसेवक, शिवसेना आघाडी.

काँग्रेसचे नगरसेवक २९ आहेत. राष्ट्रवादीचे १५ नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या नगरसेवकांना तुलनेने पदे कमी मिळाली. तरीही काँग्रेसच्या नगरसेवकांत चलबिचलता नाही. आघाडी म्हणून राष्ट्रवादीत जे घडते आहे, तो समन्वयाचा कोठेतरी अभाव आहे असे वाटते. तेही चित्र बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आघाडीला धोका होणार नाही.
- शारंगधर देशमुख, 

नगरसेवक, काँग्रेस आघाडी.

काही सदस्यांची नाराजी असेल तर त्या संदर्भात पक्षाचे नेते जरूर निर्णय घेतील. माझ्या बाबतीत बोलायचे तर मी राष्ट्रवादीशीच निष्ठा ठेवून आहे. अन्य काही सदस्यांच्या नाराजीबाबत नेत्यांना कल्पना दिली आहे. ते नक्की मार्ग काढतील.
- सुनील पाटील,
उपमहापौर, 
राष्ट्रवादी आघाडी.

Web Title: Kolhapur News Municipal political issue special