कोण म्हणतो महापालिकेच्या शाळा बाद... 

सुधाकर काशीद
गुरुवार, 29 जून 2017

दृष्टीक्षेपात शाळां 
महापालिका शाळा 69 
सेमी इंग्लिश शाळा 7 
इ लर्निंग सोय असलेल्या शाळा 7 
पटसंख्या - 9850 

कोल्हापूर - महापालिकेच्या शाळा म्हणजे गावठी, असा गवगवा करणाऱ्या एका टोळीला जबरदस्त चपराक लावत महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत आपला ठसा उमटवला आहे. केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्यभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष या निमित्ताने आपल्याकडे वेधून घेतले आहे. 

टेंबलाईवाडीसारख्या गरीब, मध्यमवर्गीय परिसरातील शाळेतील विद्यार्थ्याने राज्यात प्रथम येऊन दबदबा निर्माण केला आहे. 

मात्र आमची पोरं अभ्यासात हुशारच आहेत. पण उठसूठ त्यांना त्यांच्या शाळांना कमी लेखणाऱ्या टोळीलाही त्यांनी धडा शिकवला आहे. 

महापालिका शाळांच्या इमारतीची दुरावस्था, मैदानाची अवस्था, कमी पटसंख्या, मुलांचा पारंपारिक गणवेश किंवा एखाद्या शिक्षकाने छोटी चूक केली, त्याचा मुद्दाम केला जाणारा मोठा गवगवा, यामुळे शिक्षक अस्वस्थ होते. 

महापालिकेच्या शाळेत शिकतो, म्हणजे त्या मुलांकडेही "जनरल' म्हणून पाहिले जात होते. हे करणारी एक टोळी आहे. महापालिकेच्या शाळा बंद पाडायच्या व त्याच्या इमारतीत आपल्या खाजगी शाळा सुरू करायच्या या हेतूने हे चालले आहे. 

हेदेखील सर्वांना माहित होते. त्यातून या शाळा कधीतरी बंद पडणार, असे वातावरण निर्माण केले जात होते. पण या सर्वाला या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी छेद तर दिलाच आहे. पण एक दिवस महापालिकेच्या शाळात प्रवेश घ्यायलाही वशिला लागेल, अशी आशा निर्माण केली आहे. 

ज्या शाळेची इमारत चांगली, ज्या शाळेचा गणवेश "किमती', ज्या शाळेची फी जास्त, ज्या शाळेसमोर पालकांच्या वहानांची रांग अशा शाळा चांगल्या म्हणून ओळखण्याचा एक ट्रेंड आहे. पालकही या ट्रेंडला भुलले आहेत. 

लखलखीत, चकचकीत शाळेला जाणारी मुले व साध्या शाळेत जाणारी मुले, अशी नवी वर्गवारी तयार झाली आहे. 

याशिवाय पालकांना प्रवेशासाठी देणगी, फी, गणवेश, विद्यार्थी वाहतूक, इमारत बांधकाम देणगी, स्नेहसंमेलन फी हा वेगळा भुर्दंड आहे. 

महापालिकेच्या एकूण 69 शाळा आहेत. बहुतेक शाळांना स्वतःची इमारत व मैदान आहे. पण वास्तव हे आहे की बदलत्या शिक्षण प्रवाहात महापालिकेच्या शाळा भौतिक पातळीवर मागे राहिल्या आहेत. काही शाळा तर पटसंख्येअभावी एकमेकांत मर्ज केल्या गेल्या आहेत. या परिस्थितीला आणखी एक मोठे कारण म्हणजे महापालिका शाळांच्या या अवस्थेचा गवगवा करणारी एक टोळी आहे. केवळ महापालिका शाळाच नव्हे तर सरकारी दवाखाना, के.एम.टी., एस.टी., जिल्हा परिषद शाळा यात उणिवाच कशा आहेत हे पसरवणारी एक यंत्रणा आहे. महापालिकेच्या शाळा इमारती आपल्या खाजगी संस्थांना मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणारी काही मंडळी यात पुढे आहेत. 

मात्र या परिस्थितीला प्राथमिक शाळेतील शिक्षक आरोप प्रत्यारोपाच्या स्वरुपात उत्तर देण्याच्या फंदात पडले नाहीत. 

उलट त्यांनी या शाळांना उर्जितावस्थेत आणण्याची जिद्द ठेवली. त्याहून विशेष हे की शाळा अकरा वाजता असली तरी सकाळी साडे सातला खास वर्ग काही शिक्षकांनी सुरू केले. पालक व विद्यार्थ्यांनीही त्यास साथ दिली व टिका टिपणीला तोंड देत महापालिका प्राथमिक शाळांनी आपली वाटचाल चालू ठेवली. ज्या टेंबलाईवाडी विद्यामंदिर या शाळेतील वर्धन माळी हा विद्यार्थी यावर्षी राज्यात प्रथम आला आहे त्या शाळेतील पुष्पा गायकवाड या शिक्षिकेने तर आपले प्रमोशन नाकारून मुलाची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करून घेतली. 

या वर्षीच्या परीक्षेच्या निकालाने मुलांनी, पालकांनी आपली बौद्धिक क्षमता जरूर सिद्ध केली आहे. 

आता प्राथमिक शिक्षण समितीची जबाबदारी वाढली आहे. शाळा इमारतीची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. शाळांचे बाह्यस्वरुप बदलून टाकले तर या यशाला आणखी झळाळी येऊ शकणार आहे. 

Web Title: kolhapur news municipal school