खून, आत्महत्या प्रकरणी घरमालक, मध्यस्थावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - देवकर पाणंद येथे निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घरमालकासह मध्यस्थावर (दलाल) गुन्हा दाखल झाला. घरमालक-मनीषा मुकुंद घोटगे (तुळसीनगर हाउसिंग सोसायटी, पुणे) आणि मध्यस्थ संजय विलास बोडके (रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) अशी संशयितांची नावे आहेत.

कोल्हापूर - देवकर पाणंद येथे निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घरमालकासह मध्यस्थावर (दलाल) गुन्हा दाखल झाला. घरमालक-मनीषा मुकुंद घोटगे (तुळसीनगर हाउसिंग सोसायटी, पुणे) आणि मध्यस्थ संजय विलास बोडके (रा. राजलक्ष्मीनगर, देवकर पाणंद) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की देवकर पाणंद परिसरातील राजलक्ष्मीनगर येथील विश्‍वकर्मा कॉम्प्लेक्‍समध्ये के विंग इमारतीत पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी बबन पांडुरंग बोबडे (वय ६५), पत्नी रेखा (वय ६०) हे दोघे भाडेकरू म्हणून राहत होते. बोबडे यांनी रिव्हॉल्व्हरने पत्नीच्या डोक्‍यात गोळी झाडून खून केला, त्यानंतर स्वतःच्या डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या केली.

घटनास्थळी बोबडे यांनी लिहून ठेवलेली पाचपानी चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात घर रिकामे करण्याची धमकी दिल्याने पत्नीचा मधुमेह व माझा रक्तदाब वाढला असा मजकूर होता. घटनेची माहिती मिळताच बोबडे यांचा वायुदलात कर्तव्य बजावणारा मुलगा संतोष आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या व्यवसायात असणारा दुसरा मुलगा सचिन हे दोघे नातेवाइकांसह घरी आले. पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यात त्यांना एक कीटकनाशकाची पुडीही सापडली.

त्यानंतर घटनास्थळाचा इन-कॅमेरा पंचनामा केला. घरात सापडलेल्या सर्व चिठ्ठ्या ताब्यात घेतल्या. तसेच बोबडे यांच्या अंगावरील रक्ताळलेले कपडेही जप्त केले. त्याचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले. काल रात्री शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी डॉक्‍टरांकडे बोबडे दांपत्याच्या मृत्यूबाबतचा सर्व अहवाल मागवला आहे. तो येत्या दोन दिवसांत त्यांना प्राप्त होण्याची शक्‍यता आहे. काल रात्री दांपत्यावर पंचगंगा स्मशानभूतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पोलिसांनी आज सकाळी नातेवाइकांसह शेजाऱ्यांचे जवाब नोंदवून घेतले. याबाबत मुलगा सचिन बोबडे यांनी आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात मनीषा मुकुंद घोटगे यांच्या मालकीचा देवकर पाणंद येथील विश्‍वकर्मा कॉम्प्लेक्‍समधील फ्लॅट क्रमांक ५०३ आहे. हा फ्लॅट बबन बोबडे यांनी मार्च २०१७ ला संजय विलास बोडके (रा. राजलक्ष्मीनगर) याच्या मध्यस्थीने ११ महिन्यांच्या करारावर घेतला. या फ्लॅटमध्ये घोटगे यांचे साहित्य त्यात होते. ते त्यांनी त्यांना घेऊन जाण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी हे साहित्य संजय बोडकेला घेऊन जाण्यास सांगितले; पण तो ते साहित्य घेऊन गेला नाही. त्याच महिन्यात घोटगे व बोडके त्यांच्या घरी गेले. त्या दोघांनी आई, वडिलांना करारातील शर्ती व अटीचा भंग केला आहे.

एक महिन्याच्या आत घर खाली करण्यासाठी धमकावले. हा सर्व प्रकार अपार्टमेंटमधील इतर फ्लॅटधारकांसमोर घडल्याने आई, वडिलांचा अपमान झाला. तशी त्यांची प्रकृती खालावली. त्यातूनच वडिलांनी हे कृत्य केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार फ्लॅटमालक मनीषा घोटगे आणि मध्यस्थ संजय बोडके या दोघांवर आत्मह्त्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी कलम ३०६ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. चौकशीसाठी बोडके याला ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kolhapur news Murder and Suicide incidence