भांडण सोडविणाऱ्या भावजयीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

गडहिंग्लज - चुलत्यांना खुरप्याने मारण्यास जाणाऱ्या दिराला भांडण करू नको, असे समजावून सांगत असताना दिराने भावजयीचाच खून केला. खुरप्याचा वार मानेवर वर्मी बसल्याने ती मृत्युमुखी पडली. वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.

गडहिंग्लज - चुलत्यांना खुरप्याने मारण्यास जाणाऱ्या दिराला भांडण करू नको, असे समजावून सांगत असताना दिराने भावजयीचाच खून केला. खुरप्याचा वार मानेवर वर्मी बसल्याने ती मृत्युमुखी पडली. वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. सौ. मंगल मधुकर पोटे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिचा दीर श्रावण चनाप्पा पोटे (३६) याला पोलिसांनी अटक केली आहे.

गोसावीनाथ मंदिरामागील गल्लीत पोटेंचे कुटुंब राहते. आज दुपारी एकच्या सुमारास चुलते आप्पा पोटे हे घरामागे असलेल्या गोठ्यात झोपण्यास जात होते. त्या वेळी पुतण्या श्रावणने घरगुती कारणावरून आप्पा यांच्याशी भांडण काढले. रागाच्या भरात तो खुरपे घेऊन आप्पांना मारण्यास धावून गेला. त्या वेळी भावजय सौ. मंगल, सौ. सरिता पोटे व श्रावणची पत्नी सौ. मीनाक्षी भांडण सोडविण्यासाठी गेल्या. भांडण करू नकोस, असे समजावून सांगत असताना श्रावणने खुरप्याने रागाच्या भरात मंगल यांच्या मानेवर घाव घातला. यामुळे रक्ताच्या थारोळ्यातच त्या जागेवर कोसळल्या.

बेशुद्धावस्थेत असतानाच त्यांना शेजारचे नागरिक व घरातील मंडळींनी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

घरगुती भांडणातून गेला जीव

चुलत्याला खुरप्याने मारण्यास जाणाऱ्या दिराला भांडण करू नको, असे समजावून सांगत असताना दिराने भावजयीचाच खून केला. खून केल्यानंतर दीर चालत रुग्णालयात गेला. घरगुती भांडणातून हकनाक मंगल यांना जीव गमवावा लागला.

या वेळी झालेल्या झटापटीत श्रावणच्या डोक्‍यालाही मार लागला. मंगल यांना रुग्णालयात आणल्यानंतर मागून श्रावणही वडरगेतून चालत गडहिंग्लजला उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आप्पा पोटे यांनी श्रावणविरुद्ध पोलिसांत फिर्याद दिली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, निरीक्षक विपीन हसबनीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

मृत मंगल यांचे पती मधुकर, सदाशिव व श्रावण अशा तीन भावांसह आई, वडील, चुलते आप्पा यांचे एकत्र कुटुंब आहे. तीन खोल्यांचे राहते घर असून, त्यामागेच जनावरांसाठी स्वतंत्र गोठा आहे. 

मधुकर मुंबईत भांडूप सिक्‍युरिटी बोर्डात नोकरीला आहेत. त्यांचे भाऊ सदाशिवही नोकरीनिमित्त बाहेरच असतात. मृत मंगल यांचे माहेर तालुक्‍यातीलच शिप्पूर तर्फ आजरा होय. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. श्रावण हा मिळेल ते काम करीत शेती करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. घराच्या वाटणीसह इतर किरकोळ कारणावरून तो नेहमी घरातील सर्वांशीच भांडण काढत असे. 

घटनेच्या वेळी सर्वजण घरीच होते. त्याचवेळी श्रावणने भांडण काढले. त्यातच मंगल यांना खुरप्याने मारल्यानंतर कुटुंबातील सर्वजण घाबरले. त्यांचा रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सुरूच होता. घाव वर्मी लागल्याने त्यांचा रक्तस्राव थांबत नव्हता. अधिक रक्तस्रावामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

...अन्‌ गावकरी धावले
गावात वादातून एकाचा खून झाल्याची बातमी काही मुलांनी नागरिकांना दिली. सुरवातीला त्याकडे कोणी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, मंगल पोटे यांचा खून झाल्याची माहिती समजताच सर्वजण घटनास्थळी धावून गेले. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंभीर जखमी मंगल यांना रुग्णालयात नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. परंतु, उपजिल्हा रुग्णालयात येईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Kolhapur News murder in family quarrel matter