दगडाने ठेचून मित्रांनीच केला निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

गांधीनगर - मोबाईल खरेदीच्या पैशावरून वाद होऊन बाटली आणि दगडाने ठेचून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना गडमुडशिंगी (ता. करवीर) हद्दीत सोमवारी मध्यरात्री घडली. अतुल शिवाजी अंबुरे (वय २१, मूळ गाव धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी, सध्या रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

गांधीनगर - मोबाईल खरेदीच्या पैशावरून वाद होऊन बाटली आणि दगडाने ठेचून मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना गडमुडशिंगी (ता. करवीर) हद्दीत सोमवारी मध्यरात्री घडली. अतुल शिवाजी अंबुरे (वय २१, मूळ गाव धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी, सध्या रा. कोयना कॉलनी, गांधीनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद दत्ता गोविंद कदम (रा. धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) यांनी गांधीनगर पोलिसांत दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी शिताफीने शिवाजी गणपतराव शिंदे या संशयितास पकडले.

संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे, शिवाजी गणपतराव शिंदे आणि अतुल शिवाजी अंबुरे गांधीनगर बाजारपेठेमधील एका दुकानात कामाला होते. १५ दिवसांपूर्वी मृत अतुल अंबुरे याने संजय बेलेकडून जुना मोबाईल साडेसात हजार रुपयांस विकत घेतला. यातील चार हजार रुपये संजय बेलेस दिले होते. उर्वरित साडेतीन हजार देण्याचा संजयने तगादा लावला होता. सोमवारी रात्री बेले, दळवे व शिंदे हे तिघेजण रेल्वे रुळाजवळील रिकाम्या जागेत मद्यप्राशन करीत होते. या वेळी संशयितांनी अतुल अंबुरे यास तेथे बोलावून घेतले. तेथे संजय आणि अतुल यांच्यात पैशावरून वादावादी झाली. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.

हाणामारीमध्ये अतुलच्या मानेवर आणि गळ्यावर काचेच्या बाटलीने घाव घातला. यामुळे रक्तस्राव होऊन अतुलचा जागीच मृत्यू झाला. संजय, दत्ता आणि शिवाजी यांनी निर्घृणपणे अतुलचा खून केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. करवीरचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. सुशांत चव्हाण यांनी तपासाची सूत्रे हालवित तिघा संशयितांपैकी शिवाजी शिंदे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिघांनी अतुलचा खून केल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये कबूल केल्याचे समजते. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.

Web Title: Kolhapur News Murder in Gandhinagar