मोरेवाडी परिसरात अनोळखीचा निघृण खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - मोरेवाडी जवळील चित्रनगरीच्या पिछाडीस अनोळखी व्यक्तीचा निघृण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मारेकऱ्यांनी खून करून मृतदेह सिमेंटच्या खांबाला बाधून शेजारील विहिरीत फेकून दिला होता.

कोल्हापूर - मोरेवाडी जवळील चित्रनगरीच्या पिछाडीस अनोळखी व्यक्तीचा निघृण खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मारेकऱ्यांनी खून करून मृतदेह सिमेंटच्या खांबाला बाधून शेजारील विहिरीत फेकून दिला होता. त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि मारेकऱ्यांच्या शोधाचे काम पोलिसांकडून सुरू झाले. याबाबतचा गुन्हा करवीर पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती, मोरेवाडी (ता. करवीर) येथील स्मशानभूमी आणि चित्रनगरीच्या पिछाडीस शिवाजी दत्तू मोरे (वय 57, रा. भैरवनाथ गल्ली) यांचे शेत आहे. त्या शेताजवळ एक पडकी विहीर आहे. आज सकाळी आठच्या सुमारास मोरे हे शेतात गेले होते.

काम करून ते झाडावरील चिंचा काढत होते. त्यावेळी त्यांना पडक्‍या विहीरीतून उग्र स्वरुपाचा वास आला. त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिले तर त्यात एक पुरूष जातीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे दादा बांगट यांना दिली. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांना दिली. तेथ फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह काढण्यासाठी जीवनज्योती संघटनेची मदत घेण्यात आली.

त्यावेळी तो मृतदेह सिमेंटच्या खांबाला तारेने व वायरने बांधल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हा खून असल्याची खात्री झाली. जाधव यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तसे घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे आणि करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली. 

विहीरीतून बाहेर काढलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थली फौरेन्सिक लॅबच्या पथकाला बोलवून घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आवश्‍यक पुराव्याच्या दृष्टीने आवश्‍यक त्या बाबींची पूर्तता पोलिसांनी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठविण्यात आला. दोन ते तीन दिवसापूर्वी मारेकऱ्याने हे कृत्य करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सिमेंटच्या खांबाला बांधून फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान मृतदेहाची ओळख पटविण्याचे आणि मारेकऱ्याला शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. 

Web Title: Kolhapur News Murder in Morewadi