चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्धचा वाद निष्कारण - एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अत्यंत चांगली भूमिका सर्वोच्च न्यायालयात निभावत आहेत, असे मत सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर - महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अत्यंत चांगली भूमिका सर्वोच्च न्यायालयात निभावत आहेत. गोकाक तालुक्‍यातील तवग या गावी त्यांनी गायलेले कन्नड गीत म्हणजे केवळ सहज भाव असून, त्यांच्याविरुद्ध सध्या निष्कारण वाद उत्पन्न केला जात आहे. हा वाद म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळ असून, ते लवकरच थंड होईल, असे मत सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील काही दिवसांपूर्वी तवग गावी गेले होते. तेथे त्यांनी कन्नड गाणे म्हटल्यावरून टीका सुरू आहे. याविषयी सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनीच ‘हा वाद तात्पुरता व निष्कारण’ असल्याचे स्पष्ट केले आहे.

श्री. पाटील म्हणाले, ‘‘दोन मिनिटे कन्नड भाषेतून बोलून तवग गावातील नागरिकांवर परिणाम होईल, असा लेचापेचा सीमा लढा नाही. निष्कारण हा वाद तयार केला जात आहे. हा सारा गैरसमजुतीचा भाग आहे. चंद्रकांत पाटील यांची भूमिका अशी असूच शकत नाही. त्या गाण्याचा एवढा बाऊ करण्याची काहीच आवश्‍यकता नाही. सीमालढा एवढा लेचापेचा नाही. सीमालढ्यात सर्वोच्च न्यायालयात साक्षीपुरावे सुरू असून, नऊ साक्षीदारांची यादी देण्यात यावी.’’

सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहज जाणीवेतून घडलेल्या या प्रकाराबद्दल मत व्यक्त करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

Web Title: Kolhapur News N D Patil comment