नाणं खणखणीत तर काम मागावे लागत नाही - नाना पाटेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कोल्हापूर -  ‘तुमचं नाणं खणखणीत असेल, तर काम मागावे लागत नाही,’ असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. ‘केआयटी’मधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये श्री. पाटेकर यांनी ‘केआयटी’च्या ओपन एअर थिएटरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कोल्हापूर -  ‘तुमचं नाणं खणखणीत असेल, तर काम मागावे लागत नाही,’ असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले. ‘केआयटी’मधील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये श्री. पाटेकर यांनी ‘केआयटी’च्या ओपन एअर थिएटरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभिनेत्री इरावती हर्षे, दिग्दर्शक सतीश राजवाडे, निखिल साने उपस्थित होते. 

श्री. पाटेकर यांनी देशसेवा, नाती-गोती, आई-वडिलांच्या कष्टाची परतफेड, संयम या मुद्द्यांना स्पर्श करत विद्यार्थ्यांना साद घातली. ते म्हणाले, ‘‘मी इथे चित्रपट प्रमोशनला आलेलो नाही; तर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलो आहे. राजकारण्यांच्या धूर्त खेळीला बळी पडू नका. स्वत:ची जात घरात ठेवून भारताचा नागरिक म्हणून रस्त्यावर उतरा. राजकारण्यांची मुले परदेशात शिकतात. दंगलीवेळी गोरगरिबांची पोरं तुरुंगात जातात. त्यामुळे स्वत:चा वापर कुणाला स्वार्थासाठी करू देऊ नका. स्वत:चा मेंदू, स्वत:चा विचार याचाच उपयोग करून आयुष्य सुंदर बनवा.’’

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची त्यांनी उत्तरे दिली. काही संवादही सादर केले. यामध्ये नटसम्राट, यशवंत, रुमानी अशा प्रसिद्ध स्वगतांनी विद्यार्थ्यांना तल्लीन केले. टाळ्या, शिट्यांनी ‘केआयटी’चे वातावरण ‘नानामय’ झाले. नानांनी त्यांच्या पन्नास वर्षांच्या नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अनुभवांना उजाळा देत जीवनप्रवास उलगडला. जुन्या कलाकारांचे किस्से, नाटकांच्या तालमीबद्दलची माहिती दिली. अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणाईला त्यांनी प्रचंड कष्ट, अनुभव गाठीशी बांधण्याचा सल्ला दिला.

अध्यक्ष सचिन मेनन, सचिव साजिद हुदली, विश्‍वस्त सुनील कुलकर्णी, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांनी मान्यवरांना कोल्हापुरी गूळ, रोप, ‘केआयटी’चे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमर टिकोळे, सुनील माने, अमोल वाघमारे यांनी संयोजन केले.

Web Title: Kolhapur News Nana Patekar comment