अवघा रंग एकचि झाला ! 

संभाजी गंडमाळे
सोमवार, 23 जुलै 2018

कोल्हापूर - टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि देहभान विसरून भजनात तल्लीन झालेले वारकरी...अशा सळसळत्या माहौलात आज कोल्हापूर ते नंदवाळ प्रतिपंढरपूरवारी पायी दिंडी सोहळा झाला. पावसाने उघडीप दिल्याने सकाळच्या कोवळ्या उन्हात दिंडीला वेगळाच साज चढला. पण, खंडोबा तालीम परिसरात उभे रिंगण झाल्यानंतर काही काळ पावसाने हजेरी लावली.

कोल्हापूर - टाळ-मृदंगाचा गजर, भगव्या पताका, तुळशी वृंदावन आणि देहभान विसरून भजनात तल्लीन झालेले वारकरी...अशा सळसळत्या माहौलात आज कोल्हापूर ते नंदवाळ प्रतिपंढरपूरवारी पायी दिंडी सोहळा झाला. पावसाने उघडीप दिल्याने सकाळच्या कोवळ्या उन्हात दिंडीला वेगळाच साज चढला. पण, खंडोबा तालीम परिसरात उभे रिंगण झाल्यानंतर काही काळ पावसाने हजेरी लावली.

मात्र, तरीही तितक्‍याच सळसळत्या उत्साहात सोहळा पुढे गेला. दरम्यान, पुईखडी ते नंदवाळ हा दोन्ही बाजूंनी हिरवळीने नटलेला मार्ग वारकऱ्यांच्या उदंड सहभागामुळे विठूमय झाला. धर्म, जात-पात, वय, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद मनी न ठेवता निघालेल्या या दिंडी सोहळ्याने जणु "अवघा रंग एकचि' झाला. श्री ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ, जय शिवराज फुटबॉल प्लेअर्स मंडळाच्या विद्यमाने सलग पंधराव्या वर्षी हा सोहळा सजला. 

सकाळी साडेआठ वाजता मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात आमदार राजेश क्षीरसागर, सदाभाऊ शिर्के, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत दिंडीला प्रारंभ झाला. बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारूती चौकमार्गे खंडोबा तालिम परिसरात दिंडी आल्यानंतर साडेनऊच्या सुमारास उभे रिंगण सजले. त्यानंतर दिंडी सानेगुरूजी वसाहतमार्गे पुईखडी येथील संकल्पसिध्दी कार्यालयासमोर आली.

आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर महेश सावंत, शारंगधर देशमुख, रविकिरण इंगवले, राहूल पाटील, राहूल माने आदींच्या प्रमुख उपस्थितीत माऊली अश्‍व व पालखीचे पूजन केले. त्यानंतर येथे गोल रिंगणाला प्रारंभ झाला. रिंगणाभोवती माऊली अश्‍वाने फेरे पूर्ण करताच त्याला नमस्कार करण्यासाठी आणि त्याच्या पायाखालची माती भाळी लावण्यासाठी गर्दी उसळली. आरतीनंतर रिंगण सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर पालखी नंदवाळकडे मार्गस्थ झाली. दरम्यान, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, सचिन चव्हाण आदींसह भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेटके संयोजन केले. 

स्वयंसेवक तरूण 
पंधरा वर्षे या उपक्रमाला शहर आणि परिसरातील विठ्ठलभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. वारकरी संप्रदायाबरोबरच शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवक-युवती आणि महिलांचा दिंडीतील सहभाग लक्षणीय होता.केवळ दिंडीत सहभागी न होता दिंडी मार्गावर कुठेही कचरा होणार नाही, यासाठी तरूणाईचा पुढाकार होता. 

फराळाचे वाटप 
दिंडी मार्गावर विविध संस्था, मंडळांच्या वतीने फुलांच्या पायघड्या आणि रांगोळीने दिंडीचे स्वागत झाले. फराळाचे वाटप करताना कचरा होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. दिंडी मार्गावर पन्नास ते साठ तरूण मंडळे आणि विविध संस्थांनी फराळाचे वाटप केले. 

 

Web Title: Kolhapur News Nandwad Ashadi Ekadashi wari festival