कल्याणकारी राज्यासाठी साथ द्या - नारायण राणे

कल्याणकारी राज्यासाठी साथ द्या - नारायण राणे

कोल्हापूर - ‘‘मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्‍नासह उपेक्षित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याची धमक फक्त महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातच आहे.

शिवछत्रपतींच्या स्वप्नातील लोककल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी या पक्षाला साथ द्या, आशीर्वाद द्या,’’ असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले. गर्दीने खचाखच भरलेल्या ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पहिल्या सभेत ते बोलत होते. सभेत त्यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठवताना ‘‘आता ना आपल्याला हायकमांडचा फोन येणार, ना ‘मातोश्री’वरून. यापुढे फक्त आपण एकमेकांना कनेक्‍ट राहू, आपल्या माणसांसाठीच काम करू, अशी ग्वाही श्री. राणे यांनी दिली.

नारायण राणे म्हणाले, ‘‘शिवसेनेचा कारभार पाहिला, काँग्रेसचा कारभार पाहिला. याठिकाणी चांगले काम करणाऱ्यांना संधी नाही. उलट चांगले काम करणाऱ्याला अडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आपण काँग्रेसमधूनही बाहेर पडलो. तेव्हापासून गेले दोन महिने नारायण राणे म्हणून माझी बदनामी सुरू आहे. राणेंनी काँग्रेस का सोडली, शिवसेना का सोडली, यावरून टीकास्त्र सुरू आहे; पण दोन्ही पक्षांत अपमान झाला, अवहेलना झाली. ती आणखी किती काळ सहन करायची? मुख्यमंत्री करतो म्हणून काँग्रेसने अनेकवेळा फसविले. शिवसेनेत एवढी वर्षे काम करूनही अपमान होऊ लागला. त्यामुळे या दोन्ही पक्षांना सोडून आता मी स्वतःचाच पक्ष काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरवात कोठून करावी, असा प्रश्‍न मनात आला. मला कोल्हापूर आवडते. कोल्हापूरची माणसं जशी प्रेमळ आहेत तशी ती आपल्या स्वभावाप्रमाणे आक्रमकदेखील आहेत. त्यामुळे मी कोल्हापूरची निवड केली. आपला पक्ष भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून काम करेल. देशातील धर्मनिरपेक्षता आणि एकता टिकविण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते काम करतील. सध्या समाजात अनेक प्रश्‍न आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही. कामगारांचे अनेक प्रश्‍न आहेत. बेरोजगारी वाढत आहे. उपेक्षितांना आरक्षण मिळत नाही. तरीदेखील शिवसेनेचे पक्षप्रमुख येतात आणि या प्रश्‍नावर चर्चा न करता सत्तेलाच लाथ मारू, अशी धमकी देतात. मात्र त्यांच्यात धमक नाही, त्यामुळे ते जाईल तेथे हेच बोलत आहेत. आजपर्यंत त्यांनी कोणाला साधी कानफटातही मारली नाही. त्यामुळे ते सत्तेला लाथ कशी घालणार?’’

ते म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्षता विचारधारा असणारी दोन्ही काँग्रेस, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना हे दोन विभिन्न विचारधारा असणारे पक्ष केवळ नारायण राणे मंत्री होऊ नये, आमदार होऊ नये, म्हणून एकत्र येणे हे कुठल्या प्रकारच्या राजकारणाचे लक्षण आहे?’’ असा सवाल करून, श्री. राणे म्हणाले, ‘‘माझ्या पराभवासाठी तीन पक्ष एकत्र येणार असतील तर तो माझा विजयच आहे. भविष्यात या तिन्ही पक्षांना पुरून उरेन, असे राजकारण करेन. शिवसेना सत्तेत आली तर सीमाभाग महाराष्ट्रात आणेन, असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सीमाभाग महाराष्ट्रात कसा आणायचा याची प्रक्रिया तरी माहीत आहे का? ही प्रक्रिया कोण करते, केंद्र सरकार की, राज्य सरकार याचेही ज्ञान नाही. केवळ सत्तेसाठी त्यांच्या उड्या आहेत. त्यामुळे शिवसेना आता केवळ टक्‍केवारीचा पक्ष राहिला आहे.’’

काँग्रेसवर टीका करताना श्री. राणे म्हणाले, ‘‘काँग्रेसला दुसरे कोणी संपवत नाही तर काँग्रेसचे लोकच काँग्रेस संपवतात. प्रत्येक नेत्याचा वेगळा गट. त्यामुळे उमेदवार उभादेखील हेच करतात आणि पाडतातदेखील हेच. आपल्याला त्याचा अनुभव वांद्रे येथून निवडणूक लढविताना आला आहे. काँग्रेसमध्ये काम न करणाऱ्यांना संधी मिळते, हे आपणास पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरून दिसूनच आले असेल. त्यांच्या कृपेनेच महाराष्ट्रातील सत्ता गेली.’’

माजी खासदार नीलेश राणे म्हणाले, ‘‘साधी मुंबई सांभाळता येत नाही, ते उद्धव ठाकरे महाराष्ट्र काय सांभाळणार? त्यामुळे शिवसेनेला पर्याय आमच्याशिवाय दुसरे कोणी होऊ शकत नाही. त्यांना ठोकायची हिंमत केवळ स्वाभिमान पक्षाकडेच आहे. काँग्रेसच्या नेत्यांचा संपूर्ण वेळ एकमेकांच्या पायात पाय घालण्यात जातो, त्यामुळे त्यांना लोकांच्या प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. लोकांचे प्रश्‍न सोडविण्याचे व महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष करेल.’’ 

संदीप कुडतरकर म्हणाले, ‘‘स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेमुळे नारायण राणे आता महाराष्ट्राचे नेते झाले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या दिंडीत आपण सर्वांनी सहभागी व्हावे.’’ सम्राट महाडिक म्हणाले, ‘‘यापुढील काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविणारा स्वाभिमान पक्ष असेल. शिवसेनेमुळे सर्वात अधिक नुकसान मराठी माणसाचे झाले आहे. त्यामुळे शिवसेनामुक्‍त महाराष्ट्र करण्यासाठी स्वाभिमान पक्षाच्या पाठीशी सर्वांनी राहावे.’’ मिलिंद कुलकर्णी यांनी पक्षाची ध्येय, धोरणे सांगितली. प्रवक्‍ते जगदीश बाबर यांनी, महाराष्ट्रात परिवर्तन करण्याची ताकद आपण स्वाभिमान पक्षाला देण्याचे आवाहन केले. अशोक पाटील यांचेही भाषण झाले.

नारायण राणे म्हणाले...

  •  मुख्यमंत्री करतो म्हणून काँग्रेसने अनेकवेळा फसविले

  •  शिवसेना, काँग्रेसमध्ये चांगले काम करणाऱ्यांना फसवतात

  •  माझ्या पराभवासाठी तीन पक्ष एकत्र येणार असतील तर तो माझा विजयच

  •  शिवसेनेच्या केवळ सत्तेसाठी उड्या

या वेळी रणजित देसाई, जयेश कदम, संजय कदम, सचिन सावंत, चंदू राणे, सचिन तोडकर, संतोष कदम, रेश्‍मा सावंत आदी उपस्थित होते.

मोहन प्रकाश आयत्या बिळावरचा नागोबा 
‘‘काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश म्हणजे आयत्या बिळावरचा नागोबाच आहे. धड चालता येत नाही, बोलताही येत नाही. माईक दिसला की, बोलायचे एवढेच त्यांचे काम आहे,’’असे राणे म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.

उद्धव म्हणजे देवळातला पुजारी
नीलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख नव्हे तर बॅंकेचा मॅनेजर, अशी उपमा दिली होती. त्याचा संदर्भ देत राणे म्हणाले, ‘‘मी काय त्याला बॅंकेचा मॅनेजरही म्हणणार नाही. तो मंदिरातला पुजारी आहे. त्याचे लक्ष ना देवाकडे ना भक्ताकडे असते. त्याचे लक्ष फक्‍त टाकण्यात येणाऱ्या पैशाकडे असते.’’

...तर चौकशी करा - राणे
आरोप करण्यापेक्षा राणेंची कधीही चौकशी करा, आपण तयार आहे. आपण धुतल्या तांदळासारखे आहोत असे जर कोणी समजत असेल तर त्यांची कुंडलीदेखील आपल्याकडे आहे. कोणाकडून कसे आणि किती घेतले याची आपणास माहिती आहे. वेळ आल्यावर तीदेखील काढणार असल्याचे श्री. राणे म्हणाले.

बाळासाहेबांना छळणाऱ्याचे नाव जाहीर करेन 
राणे म्हणाले, ‘‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे आजही माझ्यासाठी दैवतच आहेत; पण त्यांचा छळ ते राहत असलेल्या ‘मातोश्री’मधूनच केला जात होता. आज नाही, पण एक ना एक दिवस बाळासाहेबांचा छळ करणारी ती व्यक्ती कोण होती, हे महाराष्ट्राला सांगेन.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com