कल्पकता हाच जाहिरात कलेचा आत्मा - शशिकांत सावंत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर जाहिरातींचा मोठा प्रभाव पडतो. नावीन्य आणि कल्पकता हाच जाहिरात कलेचा आत्मा आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत सावंत यांनी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर - ‘सर्वसामान्यांच्या जीवनशैलीवर जाहिरातींचा मोठा प्रभाव पडतो. नावीन्य आणि कल्पकता हाच जाहिरात कलेचा आत्मा आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक शशिकांत सावंत यांनी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आंत्रप्रिनर्स (फेम), ॲड एजन्सीज ॲण्ड मीडिया असोसिएशन (आसमा), कोल्हापूर प्रेस क्‍लब, जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन झाले.

दरम्यान, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप झंवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले गेले. हॉटेल पॅव्हेलियन येथे पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा झाला. ‘सकाळ’चे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके यांना या वेळी पुरस्काराने गौरवण्यात आले.   
‘जाहिरातीतून तणावमुक्ती’ या विषयावर बोलताना श्री. सावंत म्हणाले, ‘‘जाहिरात कलेचा इतिहास फार मोठा असला, तरी अठराव्या शतकात वृत्तपत्रे सुरू झाल्यानंतर हे क्षेत्र अधिक विस्तारत गेले. 

लोकांच्या अपेक्षा आणि त्याच्याही पलीकडचा विचार करून विविध संकल्पना पुढे आल्या आणि त्या अधिक विस्तारत गेल्या. चांगल्या निरीक्षणातूनच चांगली व प्रभावी जाहिरात साकारता येते.’’ चित्रफितीच्या माध्यमातून श्री. सावंत यांनी आजवरच्या काही प्रभावी जाहिरातींची माहितीही दिली. 

‘फेम’चे अध्यक्ष अमरदीप पाटील यांनी जाहिरात दिनाच्या कार्यक्रमाची संकल्पना सांगितली. ‘आसमा’चे अध्यक्ष संजय रणदिवे यांचेही मनोगत झाले. पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे, जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त जोशी, ‘क्‍लायमॅक्‍स’चे उदय जोशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कौस्तुभ नाबर, सविता नाबर, राजाराम शिंदे आदींसह ‘फेम’ व ‘आसमा’च्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले.

गौरवमूर्ती असे...
श्री. शेळके यांच्यासह पत्रकार चंद्रशेखर माताडे, चारुदत्त जोशी, मंगेश जाधव, महेश पन्हाळकर, अशोक राऊत, दिलीप चौगुले, चंद्रकांत मिठारी, बाळासाहेब काळे, जाहिरातकार भरत दैनी, औद्योगिक छायाचित्रकार संजय चौगुले यांचा कार्यक्रमात गौरव झाला.

Web Title: Kolhapur News National Advertise day program