सोशल मीडियाचा अतिरेक नको..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कोणत्याही विषयाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह छटा असतात. यातील काय घ्यायचे हे तर आपल्या हातात आहे ना? आज (ता. १२) राष्ट्रीय युवा दिन आहे, हे औचित्य साधून ‘सकाळ’ने ‘सिटिझन एडिटर’च्या माध्यमातून या विषयावर सांगोपांग चर्चा घडवून आणली.

काळ बदलतोय. माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने होतोय. अनेकांना वाटते की, सोशल मीडिया हा आजच्या जीवनाचा जणू अविभाज्य भाग झालाय. विशेषतः युवा पिढी मोबाईल, मेसेजिंग, चॅटिंग याशिवाय जगूच शकत नाही असे वातावरण तयार झाले आहे. व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर,यू ट्यूब या आणि अशाच प्रकारच्या इतर समाजमाध्यमांचा व्याप आणि विस्तार वेगाने होतोय. त्यातून काही प्रमाणात चांगलेही घडत असले तरी बऱ्याच प्रमाणात विपरीत परिणाम घडू लागल्याची चर्चा होते. त्यात तथ्यही दिसते. पण आताची परिस्थितीच अशी आहे की, या सर्व बाबींना टाळणेही शक्‍य नाही. मग करायचे काय? कोणत्याही विषयाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह छटा असतात. यातील काय घ्यायचे हे तर आपल्या हातात आहे ना? आज (ता. १२) राष्ट्रीय युवा दिन आहे, हे औचित्य साधून ‘सकाळ’ने ‘सिटिझन एडिटर’च्या माध्यमातून या विषयावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. अभिव्यक्ती हा घटनात्मक हक्क असला तरी हक्काबरोबच नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून त्याचा वापर करणेही महत्त्वाचे आहे, हे मान्यवरांनी तरुणाईच्या निदर्शनास आणून दिले.  

स्फोटक यंत्र; जपून वापरा
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात घरोघरी मोबाईल आला आहे. मात्र आजच्या पिढीकडून त्याचा नको त्या कारणासाठीच वापर वाढला आहे. तरुणाई झपाट्याने सोशल मीडियावर भावना व्यक्‍त करते. पण या भावना व्यक्त करताना कोणाचे मन दुखावले जात आहे का? याचा विचार मात्र केला जात नाही. काही अपप्रवृतींकडून भडकावू भावना व्यक्त केल्या जातात. त्यातून दंगलीसारख्या आणि कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना घडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. शालेय महाविद्यालयात शिकणारी मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह थोर व्यक्तींबाबतही कॉमेंट करू लागली आहेत. अशा कॉमेंट करताना समोरच्या व्यक्तीची पात्रता, त्याचा अभ्यास याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्काची भाषा नव्या पिढीकडून केली जाते. मात्र कर्तव्याचे भान त्यांना राहिलेले नाही. सोशल मीडिया हे एक स्फोटक यंत्र आहे. त्यातून व्हायरल केलेले चुकीचे संदेश सामाजिक प्रश्‍न निर्माण करू शकतात. असे चुकीचे संदेश तरुणांचे भविष्य अंधकारमय करून टाकत आहेत. असे संदेश पाठविण्यावर पोलिसांची सायबर सेलद्वारे नजर असते. संदेशाचा उगम जेथून झाला, त्यातून तो ज्या ज्या ठिकाणी व्हायरल झाला, त्यातील प्रत्येक घटक हा कारवाईच्या कक्षात येतो. याचे गांभीर्य तरुणाईबरोबर त्यांच्या पालकांनाही असायला हवे. सोशल मीडियावरील महितीच्या भांडाराचा उपयोग करिअर बनविण्यासाठी करावा. केवळ व्हॉटस्‌ ॲप्‌, फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग करण्यात किती वेळ वाया जातो, याचा विचार तरुणाईने आवर्जून केला पाहिजे. मुलींना सुरक्षिततेच्या दृष्टीने मोबाईल गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमात कायद्याचा विषय घेतला आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर कसा करावा, त्याचे फायदे आणि तोटे याची माहिती मुलांना शालेय वयातच होणे गरजेचे आहे. त्यासाठी हा विषय अभ्यासक्रमातच अंतर्भूत केला गेला पाहिजे. 
- सूरज गुरव (पोलिस उपअधीक्षक, करवीर) 

पॉझिटिव्ह घटकांवर लक्ष केंद्रित हवे
सोशल मीडिया सर्वांसाठी खुला आहे. निगेटिव्ह घटक टाळून त्यातील पॉझिटिव्ह घटकांवर लक्ष केंद्रित व्हायला हवे. सोशल मीडियावर घुटमळत राहणे, हे एक प्रकारचे व्यसन आहे. या व्यसनाधीनतेत अडकलेल्या मुला-मुलींचा आकडा मोठा आहे. सोशल मीडियाकडे पॉझिटिव्ह रोल म्हणून पाहण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा तो मोकळा व फावल्या वेळेतला निरर्थक उद्योग आहे. आपण स्वत:ला शिक्षण व नोकरीत गुंतवून घेतले, तर सोशल मीडियावर अधिक घुटमळण्याची वेळच येणार नाही. सायबरमध्ये लेक्‍चरवेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मोबाईल स्वीच ऑफ असतात. त्यांचे लक्ष अभ्यासात असते. कॉलेज सुटल्यावर विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर काय पाहायचे, काय शेअर करायचे हे ठरवायला हवे. स्वत:वर त्यांनी निर्बंध लावून सोशल मीडियाचा केवळ सकारात्मक वापर केला तर सोशल मीडिया त्यांच्या ज्ञानात भर घालणारे माध्यम ठरेल. व्हॉटस्‌ॲप, फेसबुक ही माहिती मिळविण्याची नवी माध्यमे आहेत. त्यावर ज्ञानार्जनाची संधीही उपलब्ध झाली आहे. 

- प्रा. डॉ. दीपक भोसले, 
समाजकार्य विभाग, सायबर

‘मोबाईल उपवास’ उपक्रम
 सायबरमधील समाजकार्य विभागात ‘मोबाईल उपवास’ हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. ज्या दिवशी उपक्रम राबवायचा, त्याच्या आधी दोन दिवस आम्ही विद्यार्थ्यांना त्याची माहिती देतो. लेक्‍चरला वर्गात जाण्यापूर्वी विद्यार्थी त्यांचे मोबाईल आमच्याकडे जमा करतात. सर्व लेक्‍चर संपले की, आम्ही विद्यार्थ्यांना मोबाईल परत करतो. त्या दिवशी कोणीही व्हॉटस्‌ॲप, फेसबुक ओपन करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेतो. संपूर्ण सायबरमध्ये हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत, अशी माहिती डॉ. भोसले यांनी दिली. 

प्रत्येकाने तारतम्य बाळगावे
सोशल मीडियाद्वारे अनेकजण मैत्री जोडतात. काही वेळा आपसुकपणे मैत्री जोडली जाते. कधीही पाहिलेले नाही; पण केवळ सोशल मीडियातून संपर्क साधला, पुढे मैत्री वाढत गेली, असेही दिसते. मात्र यात ज्या व्यक्ती परिचित आहेत, त्या व्यक्तींचा अंदाज आहे, त्यांच्याकडून फसवणूक होण्याची शक्‍यता कमी आहे. अनोळखी व्यक्तीकडून फसविण्याची शक्‍यता अधिक आहे. अशा स्थितीत सरसकट दोन्ही प्रकारातील मैत्रीला आपली माहिती देणे धोकादायक ठरते. त्यामुळे सोशल मीडियावरून झालेली मैत्रीत माहितीची देवाण-घेवाण कितपत असावी या विषयी प्रत्येकाने तारतम्य बाळगण्याची गरज आहे.  सोशल मीडियाचा वापर जगण्याशी निगडित माहिती देण्या-घेण्यासाठी होणे गरजेचे आहे. अनावश्‍यक टीकाटिप्पणी समाजाला विघातक ठरतील, असे संदेश प्रसारित करणे गुन्ह्याच्या कक्षेत येते. संदेश पाठवताना परिणामांचा विचार व कायद्याचे उल्लंघन होऊ नये याची दक्षता घयावी.     
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सतत नवे बदल होतात. त्या बदलांचा आधार घेऊन माहिती तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. काही जण बदलांचा वापर करून गैरकृत्ये करू शकतात. त्यासाठीचा कायदा कडक आहे. तो दिवसाला बदलता येत नाही. कायद्याच्या कचट्यात सापडल्यानंतर मात्र शिक्षा जबर आहे, हेही विसरता कामा नये. कलम ६६ अ अन्वये शिक्षेची तरतूद आहे. यात पाठविलेला मजकूर किती दाहक आहे, त्यातून काय नुकसान होते, तक्रार कोणत्या आशयाची आहे, संदेश पाठविणाऱ्यांचे हेतू काय आहेत, अशा अनेक कायदेशीर बाबी तपासल्या जातात. सर्व बाबी विचारात घेत सोशल मीडियाचा वापर प्रत्येक क्षणी तारतम्य व सामाजिक, व्यक्तिगत भान ठेवून करावा.
- ॲड. रवींद्र जानकर,
 माजी सचिव, बार असोसिएशन

तरुणाईने सकारात्मक दृष्टीने पाहावे
सोशल मीडियाचे फायदे खूप आहे. लोकांनी आणि विशेषत: तरुणाईने सकारात्मक दृष्टीने याकडे पाहायला हवे. जागतिकीकरणाच्या या काळात सोशल मीडियाच आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते. त्यामुळे यातील गैरवापर टाळून खऱ्या अर्थाने या मीडियाचा चांगला वापर करायला हवा. पण समाजात सध्या चित्र वेगळे आहे. एक टक्के लोकच चांगला वापर करतात. इतर लोक या माध्यमाकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
- शीतल संकपाळ
(विद्यार्थी)  

 वापर कसा हवा हे ठरवा, 
एसटीत वाय-फाय सुविधा केल्यानंतर प्रवासी वाढले होते. पण नंतर त्यातील मर्यादा पाहिल्यानंतर पुन्हा प्रवासी कमी झाले. सोशल मीडिया हा चांगलाच आहे. ते वापरणाऱ्यांनी कशा प्रकारे ते वापरायचे हे ठरवायला हवे.
- केतकी देशपांडे
(विद्यार्थिनी)
 

Web Title: Kolhapur News National Youth Day Citizen Editor special