‘राष्ट्रवादी’चा २ एप्रिलपासून हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पश्‍चिम महाराष्ट्रात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेचा प्रारंभ २ एप्रिलपासून कोल्हापुरातून होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात २ व ३ एप्रिलला सहा ठिकाणी जाहीर सभा होतील.

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पश्‍चिम महाराष्ट्रात काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल यात्रेचा प्रारंभ २ एप्रिलपासून कोल्हापुरातून होणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात २ व ३ एप्रिलला सहा ठिकाणी जाहीर सभा होतील. यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपासातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन ‘राष्ट्रवादी’चे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. 

भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आणि चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास जनतेसमोर मांडण्यासाठी ‘राष्ट्रवादी’तर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे. मराठावाडा, विदर्भानंतर आता पश्‍चिम महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रा काढण्यात येणार आहे.

आमदार मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘टार्गेट’ केले. ते म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळात एवढे महत्त्वाचे स्थान मिळाले असतानाही त्याचा उपयोग पालकमंत्री पाटील जिल्ह्यातील विकासकामांसाठी करीत नाहीत. हे पद आपल्याकडे असते, तर कोल्हापुरातील रस्ते आरशासारखे केले असते. सरकार चालविण्यासाठी धमक लागते. ती धमक या सरकारमध्ये आणि त्यांच्या मंत्र्यांत नाही. त्यामुळेच पालकमंत्री पाटील यांच्या काळात एकही प्रकल्प राबविला गेला नाही.

जिल्ह्याचा एकही प्रश्‍न त्यांना सोडविता आला नाही. उलट आम्हालाच जिल्हा बॅंकेत त्रास देण्याचा प्रयत्न केला. सरकारने घेतलेले निर्णय आता त्यांच्याच अंगलट येऊ लागले आहेत. या धमक नसलेल्या सरकारला घालविण्यासाठी त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पाढा लोकांसमोर मांडण्यासाठी हल्लाबोल करण्यात येत आहे.’’

दोन दिवस हल्लाबोल यात्रा संपूर्ण जिल्ह्यात जाईल. २ व ३ एप्रिलला जिल्ह्यात मुरगूड, नेसरी, गडहिंग्लज, गारगोटी, शिरोळ याठिकाणी सभा होतील. शहरातील सभा दसरा चौकात होईल. यासाठी ‘राष्ट्रवादी’चे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री जयंत पाटील आदी उपस्थित राहतील. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, अशोक जांभळे, आदिल फरास, अनिल साळोखे, रोहित पाटील, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर, संगीता खाडे आदी उपस्थित होते.

पदाधिकारी निवडी लांबणीवर
आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार होती. मात्र, प्रदेश समितीने या निवडी पंधरा दिवसांनी कराव्यात, असे कळविले असल्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी पंधरा दिवसांनी घेण्यात येतील, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

के. पी. मेहुण्यांमागून या...
आमदार मुश्रीफ यांचे भाषण सुरू असतानाच माजी आमदार के. पी. पाटील बैठकीच्या ठिकाणी आले. गर्दीतून ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. हे पाहिल्यानंतर आमदार मुश्रीफ म्हणाले, के. पी. इकडून फिरून मेहुण्यांच्या मागून या, असे म्हणताच बैठकीत हशा पिकला.

गेलेले परत येत आहेत
हल्लाबोल यात्रेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला सोडून गेलेले परत येत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांची संख्या ४० आहे. पण, यापैकी एकालाही त्यांनी मंत्रिपद दिले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत, असे मुश्रीफ म्हणताच कार्यकर्त्यांनी त्यांना परत घेऊ नका, असे सांगितले.

Web Title: Kolhapur News NCP Hallabol form Two April