कोल्हापूर शहर अजून किती बळींची वाट बघणार?

कोल्हापूर शहर अजून किती बळींची वाट बघणार?

अजून किती माणसांचा बळी गेल्यावर वाहतूक शिस्तीचे नियोजन होणार? मनपा, पोलिस, एस.टी. आणि आरटीओ अशा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वर्षात सात बळी गेले. आता तरी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी संयुक्त नियोजन करावे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविले पाहिजे. रिक्षा-बस थांब्यांची ठिकाणे बदलली पाहिजेत; अन्यथा आणखी बळी गेल्यास नवल वाटणार नाही. वाहतूक कोंडीबाबत शहरातील तज्ज्ञांनी उपाय सुचविले आहेत.

शहर उभं-आडवं वाढलं. वाहने वाढत आहेत. रस्त्यांचे पुरेसे रुंदीकरण नाही. पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न झाला; पण तो काही ठिकाणी अपयशी ठरला. रस्त्याकडेला असणाऱ्या रिक्षा, केएमटी, एस.टी. बसचे थांबे वाहनांना अडथळे ठरतात. सिग्नलजवळील अतिक्रमण आणि थांबे बदलले जात नाहीत, तोपर्यंत वाहतूक धोक्‍याचीच घंटाच ठरणार आहे. पापाची तिकटीवरील अपघातानंतर दोघांचा मृत्यू झाला. यानंतर प्रशासन जागे झाले; पण केवळ मृतांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत देऊन चालणार नाही, तर पुन्हा असे अपघात होणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 

७ ठार झाले... आता तरी जागे व्हा...
उमा टॉकीजजवळ एस.टी. अपघातात बापलेक ठार, राजहंस प्रिंटिंग प्रेसजवळील अपघातात सख्खे भाऊ ठार झाले. पापाची तिकटीजवळ झालेल्या अपघातात तीन ठार... वारंवार घटना घडूनही सुस्त प्रशासन जागे होत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच बळी जात आहेत. आता तरी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्राधान्य द्यावे.

गंगावेस परिसर
गंगावेस चौक, रंकाळा स्टॅंड, जावळाचा गणपती, पाडळकर मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. एस.टी. केएमटींचे थांबे तेथेच आहेत. यामध्ये रिक्षा चालक, फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. (उपाय ः गंगावेस ते जावळाचा गणपती रस्त्यावरील रिक्षा, केएमटी आणि एसटीचे अनधिकृत थांबे कमी करावेत. रंकाळा स्टॅंड तेथून हलवून केवळ थांबा करावा. यामुळे तेथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.)

खासबाग मैदान
येथील रस्त्यांवरून चार शाळांतील हजारो विद्यार्थी रोज ये-जा करतात. तेथे रस्त्यावरच बस थांबा आहे. मिरजकर तिकटीकडून येणाऱ्या वाहनांचा वेग फार असतो. गर्दीही मोठी असते. प्रवासी, विद्यार्थी, नागरिकांना जीव मुठीत धरूनच तेथून जावे लागते. (उपाय ः बहुचर्चित आणि प्रतीक्षित असलेला पादचाऱ्यांसाठीचा उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तातडीने होणे आवश्‍यक. बस थांब्यावरील प्रवाशांसाठी लोखंडी ग्रील आवश्‍यक. मिरजकर तिकटी ते बिंदू चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांचा वेग मर्यादित राहण्यासाठी गतिरोधक हवा.)
 
धोक्‍याची ठिकाणे; सीपीआर चौक
सिग्नलजवळच फेरीवाले उभे असतात. त्याच्या जवळच बस थांबा आहे. तेथेच रिक्षा थांबा आहे. येथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी असते. येथे केव्हाही अपघात होऊ शकतो.  (उपाय ः एसटी बस थांबा किमान दहा मीटर अंतर, सोन्या मारुती चौकाकडे असावा. कॉर्नरवरील सर्व अतिक्रमणे हटवावीत. सिग्नल परिसरात किमान पन्नास मीटर एकही थांबा अथवा अतिक्रमण ठेवू नये.)

स्टेशन रोड
रोज २४ तासांत ६० हजारांहून अधिक वाहने ये-जा करतात. मलबार चौकात मोठ्या प्रमाणात कोंडी होते. या रस्त्याला उतार आहे. पुढे असेंब्ली रोडवर वळणाऱ्यांची संख्या अधिक असते. येथेही ब्रेक फेल किंवा अन्य कारणामुळे अपघात झाल्यास इतर वाहनधारकांना त्याचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. (उपाय ः हॉटेल मलबारसमोरील सिग्नल सुरू करावा. मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला रुंदीकरण करून तेथे फूटपाथ करणे आवश्‍यक. असेंब्ली रोडकडे मुख्य रस्त्यावरून वळून जाणारी वाहतूक थेट सिग्नलवरूनच वळवावी.)

शिंगोशी मार्केट 
परिसरातील बाजाराचा परिसर रिकामा आणि भाजीवाले, फूलवाले रस्त्यावर अशी स्थिती आहे. त्यामुळेच तेथे वाहतूक कोंडी होते. छोट्या जागेतून २८ फुटी एसटी बस किंवा केएमटी बस चालविताना चालकाची कसरतच होते. (उपाय ः येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढावे. फेरीवाले, भाजीवाले यांना मार्केटच्या जागेतच बसणे सक्तीचे करावे. दोन्ही बाजूला फूटपाथ पाहिजे. त्यामुळे पादचारी, प्रवासी, विद्यार्थी यांचा धोका कमी होईल. रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल.)

शिवाजी चौक
रिक्षा आणि केएमटीचे बस थांबे आहेत. त्यामुळे तेथे गर्दी आणि वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. पारंपरिक मार्गाने सुरू असलेली केएमटी आजही गर्दीतूनच धावते आहे. तेथेही पापाची तिकटीसारखी दुर्घटना केव्हाही होऊ शकते, हे नाकारता येत नाही. (उपाय ः थांब्यावरील रिक्षा, बसफेऱ्या कमी केल्या पाहिजेत. पर्यायी मार्गांचा विचार झाला पाहिजे. थेट गंगावेसकडे जाणाऱ्या केएमटी बसेस चोपदार हॉटेल येथे न थांबता पुढे पूजा फूटवेअरजवळ रिकाम्या परिसरात थांबल्यास चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com