सेंद्रिय काजूचे स्वतंत्र वर्गीकरण केल्यास चांगला दर शक्य

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

चंदगड - कोकण सीमेवरील चंदगड व आजरा तालुक्‍यांत माळरानावरील काजूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जागतिक बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनाला वाढती मागणी विचारात घेता अशा प्रकारे माळरानावरील नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या काजूचे स्वतंत्र वर्गीकरण करून प्रक्रिया केल्यास उत्पन्नात हमखास वाढ शक्‍य आहे.

चंदगड - कोकण सीमेवरील चंदगड व आजरा तालुक्‍यांत माळरानावरील काजूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जागतिक बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनाला वाढती मागणी विचारात घेता अशा प्रकारे माळरानावरील नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या काजूचे स्वतंत्र वर्गीकरण करून प्रक्रिया केल्यास उत्पन्नात हमखास वाढ शक्‍य आहे. त्यासाठी तालुका कृषी खाते, शेतकरी आणि काजू कारखानदारांनी एकत्र यायला हवे. प्रायोगिक तत्त्वावर यावर्षी ठराविक क्षेत्र निश्‍चित केल्यास पुढे त्याला वाव मिळणार आहे. 

चंदगड तालुक्‍यात सुमारे अकरा हजार हेक्‍टरवर काजूचे पीक आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक उत्पादन हे माळरानावरील काजू पिकातून होते. उर्वरित काजू शेतातील बांधावर उत्पादित होतो. पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांमुळे काही घटक या झाडांकडून शोषला जातो; मात्र माळरानावर केवळ गवत पीक, तेही नैसर्गिक पद्धतीने घेतले जाते. या जमिनीवर रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. त्यामुळे अशा काजूंमध्ये सेंद्रिय घटक मोठ्या प्रमाणात असतात; मात्र शेतकरी काजू बी गोळा करताना त्याचे वर्गीकरण करीत नाही.

चंदगड तालुक्‍यात उत्पादित होणारी काजू बी ही बहुतांश सेंद्रियच आहे. अशा बीवर प्रक्रिया केलेले काजूगर ‘सेंद्रिय’ म्हणून बाजारपेठेत आणल्यास त्याला चांगला दर मिळू शकतो; मात्र त्यासाठी सेंद्रिय प्रमाणीकरण आणि विश्‍वासार्हता महत्त्वाची आहे.
- भास्कर कामत,
काजू प्रक्रिया उद्योजक, चंदगड.

माळरानावरील आणि बांधावरील बिया तो एकत्र करतो आणि आठवडा बाजारात विकतो. काजू प्रक्रिया कारखानदारांनी पुढाकार घेतल्यास व्यापाऱ्यांकरवी शेतकऱ्यांकडून सेंद्रिय काजू स्वतंत्र खरेदी करणे शक्‍य आहे. या काजूला वेगळा दर दिल्यास शेतकरीही त्यासाठी उद्युक्त होऊ शकतो; मात्र या व्यवहारात शेतकऱ्यांनी प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जागतिक बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनाला चांगला दर देऊन खरेदी केली जाते; परंतु ते पूर्णतः सेंद्रिय प्रमाणित असणे गरजचे असते. तसे न झाल्यास तो माल नाकारला जातो. पर्यायाने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या बाबतीत नियोजन केल्यास सेंद्रिय काजू उत्पादनातून शेतकऱ्याला चांगला दर मिळवता येईल. या उत्पादनासाठी त्याला कोणताही त्रास नाही. नेहमीप्रमाणे नैसर्गिकरीत्या उत्पादन तो घेत असतो. 

केवळ ही बी बाजूला काढून ठेवणे एवढेच काम त्याला करावे लागणार आहे. तेवढ्याने त्यांना दर मात्र दुपटीपेक्षा अधिक मिळेल यात शंका नाही. तालुका कृषी विभागाने पुढाकार घेऊन या हंगामात असा प्रयोग करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

 

Web Title: Kolhapur News need of separation of Organic Cashew nut