नववर्षानिमित्त शेख चाच्यांकडून सामाजिक संदेश देणारे फलक लावून शुभेच्छा

नववर्षानिमित्त शेख चाच्यांकडून सामाजिक संदेश देणारे फलक लावून शुभेच्छा

कोल्हापूर - पैसा तर सगळेच मिळवतात; पण सामाजिक बांधिलकीही जपणारे काही जण असतात. यापैकीच एक म्हणजे मुबारक शेख आणि दिलावर शेख. शेख चाच्या म्हणून त्यांची ओळख उद्योगनगरीत आहे. नवीन वर्षानिमित्त त्यांनी सर्वांना समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत; पण ‘इतरांचे पाय ओढू नका’, ‘कायदे पाळा’, ‘आधी देश, नंतर मी’ ही भावना ठेवा, असेही संदेश देणारे फलक कारखान्याबाहेर उभे केले आहेत. सामाजिक काम करताना धर्माच्या भिंती आड येत नसल्याचे त्यांनी कर्तृत्वातून दाखवून दिले.

खरं तर कारखानदार गौसलाझम शेख ऊर्फ चाच्या हे मुबारक आणि दिलावर यांचे वडील. मात्र, त्यांच्या निधनानंतर सर्वजण या दोघांनाच ‘शेख चाच्या’ म्हणू लागले. आजही अनेक कामगार, उद्योगपती त्यांना शेख चाच्याच म्हणून बोलवतात. ते धर्माने मुस्लिम, तरीही धर्माची भिंत कधीही त्यांच्या सामाजिक कामात आड आली नाही. त्यामुळेच लाईन बाजारातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या देणगीत त्यांचे नाव अग्रभागी होते. लाईन बाजारात जन्म झालेल्या कुटुंबाने साधारण १९६१ पूर्वी वाय. पी. पोवारनगरात फौंड्री सुरू केली. कडाक्‍याच्या उन्हात कामगारांना गारवा मिळावा म्हणून ते दारात थंड पाण्यासाठी माठ भरून ठेवत होते.

दृष्टिक्षेपात...

  •  जोतिबा यात्रेत ताक वाटप, अन्नदान

  •  लाईन बाजारातील मारुती मंदिर जीर्णोद्धारात पुढाकार

  •  कामगारांना सणासुदीत, वाढदिवसाला भेटवस्तू

  •  उन्हाळ्यात कारखान्यासमोर पाणपोई

‘शेख चाच्या पाणपोई’ असे त्यावर लिहिलेले असायचे. आजसुद्धा ही परंपरा कायम आहे. व्याप वाढत गेला आणि त्यांनी कुशिरे जोतिबा डोंगराकडे जाताना नवीन युनिट उभे केले. तेथेही जोतिबा यात्रेच्या मार्गावर ताक वाटप सुरू केले. पुढे अन्नदानसुद्धा सुरू केले. जन्माने मुस्लिम असलो म्हणून काय झाले, हिंदूंच्या सणातही ताक आणि अन्नदान वाटप करण्यात आम्हाला आनंद असल्याचे दिलावर शेख आवर्जून सांगतात. चांगल्या कामात धर्माच्या भिंती कधीही आड येत नसतात, असेही त्यांचे म्हणणे आहे. चांगले काम करीत राहिले पाहिजे, असाही त्यांचा सल्ला नेहमी असतो. 

वाय. पी. पोवारनगरातून कोणीही जात असताना त्यांच्या कारखान्याकडे नजर जाते, ती म्हणजे तेथे उभारलेल्या फलकांमुळे. ‘इतरांचे पाय ओढू नका’, ‘आधी देश, नंतर मी’, ‘कायद्याचे पालन करा’, असे संदेश देणारे फलक त्यांनी उभारले आहेत, जे अनेकांच्या डोळ्यांत अंजन घालणारे ठरत आहेत. वाहनांना अडथळा होऊ नये याची दक्षता घेतली आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छाही त्यांनी त्यांच्या वार्ताफलकावर दिल्या आहेत. रोज काही ना काही वेगळे देऊन अनेकांचे प्रबोधन करत असतात.

अशीही सामाजिक बांधिलकी
सुमारे पाचशे कामगारांना त्यांनी हातभार दिला. कोणी शिक्षण घेत काम करत असेल तर त्याच्या पुस्तकांची व्यवस्था याच शेख कुटुंबीयांकडून होते. रक्तदान, आरोग्य, सणासुदीला भेटवस्तू, वाढदिवसाला भेट असे अनेक उपक्रम ते दैनंदिन जीवनात करीत आहेत. नक्कीच नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच शेख कुटुंबीयांचा आदर्श घेण्यासारखा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com