ग्रामपंचायती गतिमान करणार - डॉ. खेमणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

ग्रामपंचायतींतर्फे १३ विविध प्रकारचे दाखले देण्यात येतात. ते नागरिकांना तत्काळ मिळावेत, यासाठी त्यातील अडचणी दूर करून ग्रामपंचायत प्रशासन नवीन वर्षात अधिक गतिमान करण्याचा संकल्प असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

कोल्हापूर - ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. विकासकामांचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. याशिवाय ग्रामपंचायतींतर्फे १३ विविध प्रकारचे दाखले देण्यात येतात. ते नागरिकांना तत्काळ मिळावेत, यासाठी त्यातील अडचणी दूर करून ग्रामपंचायत प्रशासन नवीन वर्षात अधिक गतिमान करण्याचा संकल्प असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

याशिवाय सीएसआर निधी वाढविण्याबरोबरच आरोग्य, प्राथमिक शिक्षण, पाणी स्वच्छता विभाग, घरकुल योजना व महिला बचत गटांची कामे प्राधान्याने करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘काही वर्षांपासून ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांना जादा अधिकार देण्याचे धोरणही शासनाचे आहे. अनेक योजना थेट ग्रामपंचायतींकडे वर्ग केल्या. मात्र त्या ठिकाणी ज्या सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे, त्यात अडचणी आहेत. प्रमुख अडचण असते ती ग्रामसेवकांची गावातील उपस्थिती. ग्रामपंचायतीतर्फे जन्म नोंद दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, रहिवासी दाखला, दारिद्र्यरेषेखालील असल्याचा दाखला, हयातीचा दाखला, विभक्‍त कुटुंबाचा दाखला असे विविध तेरा प्रकराचे दाखले देण्यात येतात. त्यासाठी ग्रामसेवक गावात असणे आवश्‍यक आहे.

सीएसआर निधी वाढविण्याचा प्रयत्न
सीएसआर निधी वाढविण्याचा प्रयत्न नवीन वर्षात करण्यात येईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी त्यासंदर्भात बैठक घेतली. त्याला उद्योजकांनी प्रतिसाद दिला. प्राथमिक शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. सर्व शाळा डिजिटल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी काही शाळांना आपण सॉफ्टवेअर दिले. काही शाळा अजूनही राहिल्या आहेत. दोन, तीन वर्षात सर्व शाळांना सॉफ्टवेअर देऊ. 
 

काही वेळा ग्रामसेवकांकडे दोन गावांचा कार्यभार असतो. तो दोन गावात एकाच वेळी तो उपस्थित राहू शकत नसल्याने अडचण होते. म्हणून ग्रामसेवकांचे प्रश्‍न प्रथम सोडविले जातील. त्यांना पंचायत समिती किंवा मुख्यालयात कमीत कमी वेळेत बोलाविण्याचा प्रयत्न राहील.  

ग्रामपंचायतीमध्ये अभिलेख वर्गीकरण राबविण्यात येत आहे. एक हजार ग्रामपंचायतींपैकी जवळपास निम्म्या ग्रामपंचायींतींचे अभिलेग वर्गीकरणाचे काम पूर्ण केले. अभिलेखाचे वर्गीकरण करण्याच्या सूचना दिल्या. गैरसोय टाळण्यासाठी ग्रामसेवकांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा विचार आहे. या संदर्भात सर्व घटकांशी बोलून ग्रामसेवकांची कार्यालयात येण्याची वेळ सकाळी नऊची करण्यात येईल. त्यांना एक तास अगोदर जाण्याची मुभा देण्यात येईल. ग्रामसेवकांना मुख्यालयात किंवा पंचायत समितीत फार काळ थांबावे लागणार नाही, याची दक्षता देखील घेतली जाईल.

वैयक्‍तिक लाभ योजनांचा निधी वेळेवर खर्च 
ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजना, बचत गट, शिक्षण, आरोग्य, पाणी स्वच्छता या विभागांना प्राधान्य राहील. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्याच्या दिवशी त्याचे सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यात येतील. एखाद्या कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी सुरू असेल, तर ती चौकशी लवकर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील. विकासकामांसाठी आलेला निधी खर्च करण्याचा प्रयत्न केले जाईल. विशेषत: बांधकाम विभाग आणि वैयक्‍तिक लाभाच्या ज्या योजना आहेत. त्यांचा निधी वेळेवर खर्च केला जाईल, असेही डॉ. खेमनार यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News New Year New Resolution special