निवेदिता माने भाजपच्या वाटेवर 

निवास चौगले
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या संभाव्य यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच याबाबत दबाव वाढत असून, येत्या तीन-चार दिवसांत आपल्या गटाची भूमिका त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्याकडून जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

कार्यकर्त्यांचा वाढता दबाव - चार-पाच दिवसांत गटाची भूमिका होणार जाहीर 

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या संभाव्य यादीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनच याबाबत दबाव वाढत असून, येत्या तीन-चार दिवसांत आपल्या गटाची भूमिका त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्याकडून जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

श्रीमती माने यांच्यासह चंदगडच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, खासदार धनंजय महाडिक हे जिल्ह्यातील पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. श्री. महाडिक यांच्या नाराजीमागे बरीच कारणे आहेत; पण श्रीमती माने व कुपेकर यांना पक्षातूनच बेदखल केल्यासारखी स्थिती आहे. लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी श्रीमती माने यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत श्रीमती माने यांना उमेदवारी डावलून ही जागा पक्षाने कॉंग्रेसला सोडली व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचाराचे आदेश श्रीमती माने यांना देण्यात आले. ही तडजोड करताना श्रीमती माने किंवा त्यांच्या कुटुंबातील एकाला विधान परिषदेत आमदार करण्याचा शब्द दिला होता. हा शब्द तर दूरच; उलट श्री. शेट्टी यांच्याच कामाचे गोडवे राष्ट्रवादीच्या जिल्हा व राज्य पातळीवरील नेत्यांकडून गायले जात आहेत. 

अलीकडे झालेल्या नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत माने-कुपेकर यांनी स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केली. माने गटाला यात फारसे यश आले नाही; पण कुपेकर गटाच्या दोन जागा विजयी झाल्या. या दोन्हीही सदस्यांनी सत्ता स्थापनेत भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षात असूनही पक्षाकडून बेदखल करत असल्याचा राग श्रीमती माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यातूनच पक्ष सोडून गटाच्या अस्तित्वासाठी भाजपमध्ये जाऊ, असा तगादा कार्यकर्त्यांनी लावला आहे. त्यातूनच त्यांचे नाव भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या संभाव्य यादीत पुढे आले आहे. 

कर्जमाफीसाठी दोन्ही कॉंग्रेसने मोर्चे काढले; पण त्यात राष्ट्रवादीचे नेते दिसले नाहीत. याउलट याच मागणीसाठी श्री. शेट्टी यांनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. अलीकडेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही श्री. शेट्टी यांच्या संसदेतील कामाचे कौतुक केले. ज्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला, त्यांचाच नेतृत्वाकडून सुरू असलेला उदो उदो माने गटाला खटकणारा आहे. त्यातूनच भाजपमध्ये प्रवेश करण्याची मानसिकता या गटाची आहे. पंधरा दिवसांपूर्वी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत श्रीमती माने यांनी आपल्या मूळ गावी रूकडी येथे भव्य मेळावा घेऊन शेट्टी विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कार्यक्रमाला आमदार सुरेश हाळवणकर, उल्हास पाटील हेही उपस्थित होते. हा कार्यक्रम म्हणजे माने गटाच्या भाजप प्रवेशाची नांदी असल्याचे बोलले जाते. 

धैर्यशील माने लोकसभेला 
राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय माने गटाचा निश्‍चित आहे; पण निर्णय झाला नाही तरी लोकसभेला माने गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने हे रिंगणात उतरण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यावेळी पक्ष आणि झेंडा कोणाचा घ्यायचा, याचा निर्णय होणार आहे. याच मतदारसंघातील कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा संभाव्य भाजप प्रवेश लांबल्याची चर्चा आहे, त्यामुळे माने गटाचा भाजप प्रवेश झाल्यास धैर्यशील किंवा श्रीमती माने भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार असतील. 

Web Title: kolhapur news nivedita mane in bjp