डॉल्बी लावण्याचे धाडस करू नका - संजय मोहिते

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - गणेशोत्सवात कोणीही डॉल्बी लावण्याचे धाडस करू नका. यंदाही संबंधित मंडळ, डॉल्बी, ट्रॅक्‍टर चालक, मालकांवर ध्वनी प्रदूषण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. उत्सवातून मंडळांनी विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही केले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. 

कोल्हापूर - गणेशोत्सवात कोणीही डॉल्बी लावण्याचे धाडस करू नका. यंदाही संबंधित मंडळ, डॉल्बी, ट्रॅक्‍टर चालक, मालकांवर ध्वनी प्रदूषण कायद्याखाली कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिला. उत्सवातून मंडळांनी विधायक उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही केले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रातून डॉल्बी हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात डॉल्बी वाजणार नाही, याबाबत त्यांनी पोलिस अधीक्षक मोहिते यांना दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत. आता तालीम मंडळांचे प्रबोधन नको तर त्यांना थेट कारवाईचे स्वरूप समजून सांगा, अशा कडक सूचनाही दिल्या आहेत. त्याच अनुषंगाने मोहिते यांनी आज शहरातील सर्व पोलिस ठाण्यात जाऊन गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. 

पोलिस अधीक्षक मोहिते, गतवर्षी गणेशोत्सवात डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या १६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. सध्या हे खटले न्यायप्रविष्ट आहेत. डॉल्बी लावण्याचे धोके काय असतात, याची जाणीव संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांना झाली आहे. यंदा डॉल्बी लावण्याचे कुणी धाडस करू नका. कारण पोलिस प्रशासन संबंधित मंडळांवरच नव्हे तर डॉल्बीसुद्धा जागेवरच जप्त केला जाईल. त्याचबरोबर डॉल्बी, ट्रॅक्‍टर मालक, चालकांवरही कारवाई केली जाईल. डॉल्बीमुक्त मिरवणूक २४ तासांपेक्षा अधिक काळ चालली तरी त्याला पोलिसांचा विरोध राहणार नाही. पारंपरिक वाद्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करा. त्यात महिलांचा सहभाग वाढवा. सुरक्षित वाहतूक, व्यसनमुक्‍ती, हेल्मेटचा वापर, महिलांची छेडछाड रोखा... असे विविध प्रबोधनात्मक उपक्रम मंडळांनी हाती घ्यावेत. त्यातून एक चांगली पिढी घडू शकेल. तालीम मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस दलातर्फे दिला जाणारा गणराया ॲवॉर्ड आता तीन स्तरावर दिला जाईल. एक पोलिस ठाणे, दुसरा पोलिस उपअधीक्षक आणि तिसरा सर्वसाधारण गणराया ॲवॉर्ड अशी तीन बक्षिसे देण्यात येतील, असेही मोहिते यांनी सांगितले. 

याप्रसंगी तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या. यात प्रामुख्याने लहान मंडळांना मिरवणुकीत जास्तीत जास्त पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या, मिरजकर तिकटी ते पापाची तिकटी येथील गर्दीचे नियोजन एकेरी मार्गाने करा, पोलिसांना दोन सत्रात बंदोबस्त द्या, घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी चौकाचौकात कुंडाची व्यवस्था करा, अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. यावर जरूर विचार करू, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिले. या वेळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह तालीम मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

विधायक उपक्रम हाती घ्या
गणेशोत्सवात तालीम मंडळांनी परिसरात सीसीटीव्ही बसवावेत. गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी. महागड्या उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय मदत देणारे सेंटर सुरू करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक मोहिते यांनी बैठकीत केले.

Web Title: kolhapur news no dolby sanjay mohite warning to ganeshotsav mandal