कोल्हापूर: पोलिसांच्या कणखर भूमिकेने, राजारामपुरीत डॉल्बी बंदच! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

आमदार राजेश क्षीरसागर व सतेज पाटील, उपमहापौर अर्जुन माने यांच्यासह काही नेते माझ्याकडे आले होते त्यांनीही न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांत तरी वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला; मात्र आम्ही डॉल्बी लावण्यास परवानगी दिली नाही. 
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक 

कोल्हापूर : राजारामपुरीतील गणेश आगमनाच्या मिरवणुकीत आज पोलिसांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे डॉल्बी यंत्रणा सुरू होण्यापूर्वीच रोखली. त्यामुळे मिरवणूक सुमारे दोन तासांहून अधिक काळ ती बंदच राहिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; पण मंडळांनी त्यांची भूमिका कायम ठेवली. अखेर दोन्ही आमदारांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक पुढे न नेण्याचा इशारा दिल्याचे सांगितले; मात्र पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने डॉल्बी बंदच राहिला. दरम्यान रात्री बाराच्या सुमारास रस्त्यात थांबलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून पांगविले. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. 

यंदा गणेशोत्सवाच्या अगोदरच पोलिसांनी डॉल्बी लावू देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. गेली काही वर्षे राजारामपुरीत गणेश आगमनाच्या दिवशीच डॉल्बी वाजवला जात होता. आज दुपारी चारच्या सुमारास राजारामपुरी जनता बझार चौकात पोलिसांनी स्ट्राइकींग फोर्ससह बंदोबस्त नेमला. शहर पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह सुमारे शंभरहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, ऋतुराज पाटील यांनी काही मंडळांसमोर नारळ वाढवून मिरवणुकांना प्रारंभ केला. साडेसहाच्या सुमारास इंद्रप्रस्थ तरुण मंडळाने आणलेल्या ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर हनुमान तालीम मंडळानेही बॅंड वाजवून मिरवणुकीत उत्साह वाढवला; मात्र त्यानंतर जमलेल्या काही मंडळांनी मुख्य मिरवणूक मार्गात प्रवेश करण्यापूर्वीच डॉल्बी वाजविण्याचा प्रयत्न केला; मात्र अमृतकर यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह मंडळात घुसून डॉल्बीचे मिक्‍सर जप्त केले. तेथे संभ्रम निर्माण झाला. याचवेळी आमदार क्षीरसागर यांच्यासह ऋतुराज पाटील यांनी अमृतकर यांच्याशी तेथेच एका हॉटेलमध्ये चर्चा केली.

तेव्हा न्यायालयाच्या आदेशानुसार कमी डेसिबलमध्ये मंडळांनी यंत्रणा लावण्यास काय हरकत आहे, अशी भूमिका मांडली. त्यावर अमृतकर म्हणाले, ""आवाज ठरलेल्या क्षमतेच्या बाहेर जातो. त्यामुळे डॉल्बी लावायचा नाहीच, अशी भूमिका कायम ठेवली. मला वरिष्ठांचे आदेश आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मी वागणार.'' त्यानंतर काही वेळाने दोन मंडळांनी डॉल्बी वाजविण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमृतकर आणि पोलिसांनी मिक्‍सर काढून घेतला. त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. सर्वच मंडळांनी यंत्रणा बंद ठेवली आणि सर्व कार्यकर्ते "जैसे थे' राहिले. याच दरम्यान अपर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा हे घटनास्थळी आले. त्यांनी मिरवणूक मार्गावर पाहणी केली. 

आणि चौकात झाली आरती... 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते महेश उरसाल, बंडा साळोखे, सुजित चव्हाण, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस जनता बझार चौकात आले. उपअधीक्षक अमृतकर यांना चर्चेसाठी बोलावले. मात्र ते अपर पोलिस अधीक्षक शर्मा यांच्यासोबत मिरवणूक मार्गात असल्यामुळे येण्यास विलंब झाला. दरम्यानच्याकाळात पवार व देवणे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी जनता बझार चौकात आरती सुरू केली. त्यामुळे वातावरण शांत राहिले. थोड्याच वेळात उपअधीक्षक अमृतकर तेथे आले. त्यांनी पवार व देवणेंशी चर्चा केली. "काहीच वाद्य नाही' ही पोलिसांची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "दोन टॉप दोन बेस लावण्यास परवानगी द्या,'' अशी भूमिका त्यांनी घेतली; मात्र तेथेही अमृतकर यांनी न्यायालयाचे आणि वरिष्ठांचे आदेश आहेत त्यामुळे डॉल्बी वाजवू देणार नसल्याचे स्पष्ट केले. "गुन्हे दाखल करा,' अशी भूमिका देवणे यांनी घेतली; मात्र "हे सर्व माझे बंधू आहेत. दोन तासांसाठी गुन्हे दाखल करणे बरोबर नाही. तुम्ही सर्वांना विनंती करा, पारंपरिक वाद्यांनुसार मिरवणूक सुरू करा, बाप्पा आमचेही आहेत,'' अशी सौम्य भूमिका अमृतकर यांनी घेत डॉल्बीला विरोध कायम ठेवला. अखेर देवणे यांनी चौकात तरुणांना डॉल्बी लावण्यास सांगितली. त्यानंतर काही काळ डॉल्बीचा दणदणाट झाला. तरुणाई ठेक्‍यावर ताल धरणार तोच अमृतकर यांनी थेट फौजफाट्यासह डॉल्बी यंत्रणा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र येथे उरसाल आणि देवणे, पवार यांनी मध्यथी केली. "कोणत्याही कार्यकर्त्याला मारहाण करू नका,' असे सांगितले. या वेळी उरसाल आणि अमृतकर यांच्यात "तू तू मै मै' झाले. सर्वच ठिकाणी पोलिसांची ही भूमिका घ्यावी, केवळ गणेशोत्सवातच नको, असेही उरसाल यांनी सांगितले. येथे देवणे यांनी पोलिसांनी कोणतेही वाद्य वाजवायचे नाही अशी भूमिका जाहीर करावी, असा आग्रह धरला. अखेर पोलिस निरीक्षक साळुंखे यांनी डॉल्बी यंत्रणा वाजवायची नाही, असे जाहीर केले. निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्यासह काही पोलिसांचा फौजफाटा जनता बझार चौकात कायम ठेवला. जनता बझार चौकात रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा फौजफाटा कायम होता. 

सतेज पाटील, क्षीरसागर यांचे आगमन 
मंडळांनी "जै से थे' राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे जनता बझार चौकात सहापासून थांबलेली मंडळे रात्री साडेनऊपर्यंत थांबून राहिली. दोन मंडळांनी त्यांची डॉल्बी सिस्टीम उतरवून घेतली. त्यानंतर आमदार पाटील यांनी एका हॉटेलमध्ये उपअधीक्षक अमृतकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार "डॉल्बी यंत्रणा बंद' राहणार अशीच भूमिका कायम ठेवली. त्यानंतर आमदार पाटील यांनी पोलिस अधीक्षक संजय मोहिते, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही डॉल्बी यंत्रणा सुरू करणार नसल्याची भूमिका कायम ठेवली. याचवेळी आमदार क्षीरसागर आले. आमदार पाटील आणि क्षीरसागर यांच्यात चर्चा झाली. आमदार क्षीरसागर यांनीही अधीक्षक मोहिते आणि श्री. नांगरे-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही डॉल्बी बंदच राहणार असल्याची भूमिका घेतली. अखेर पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी भेटीसाठी बोलविले. हा निर्णय हॉटेल मधून बाहेर येऊन दोन्ही आमदारांनी सुमारे हजार कार्यकर्त्यांसमोर सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. दहा वाजता वाद्ये बंद करणार असल्याचे पोलिस सांगत आहेत. आता कोणालाही विनंती करू नका. तुम्ही आमच्यात सहभागी व्हा, तुमच्या हस्ते महाआरती करू. मंडळाचे ट्रॅक्‍टर, गणपती मूर्ती, वाद्ये येथेच ठेवून जावू पोलिसांना जे करायचे ते करू द्या, अशी भूमिका मंडळांच्या कार्यकर्त्यांनी घेतली. तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी "जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणा करीत गणपती बाप्पा मोरयाऽऽचा गजर सुरू केला. दोन्ही आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या स्थितीत कार्यकर्ते नव्हते. तरीही त्यांनी काही कार्यकर्त्यांची मते आजमाविण्याचा घेण्याचा प्रयत्न केला. दहा मिनिटे थांबा, आम्ही पोलिस अधीक्षकांचे भेट घेवून येतो असे दोन्ही आमदारांनी सांगूनही कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. अखेर दोन्ही आमदार पोलिस अधीक्षकांच्या भेटीसाठी गेले. 

अमृतकर एकाकी... 
उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांनी आज कडक भूमिका घेतली. ते स्वतः डॉक्‍टर आहेत. डॉल्बीमुळे होणाऱ्या तोट्यांची त्यांना माहिती असते. ही माहिती त्यांनी आमदारांनाही सांगितली. शिवसेनेचे पदाधिकारी, दोन्ही आमदार यांच्यासह कार्यकर्त्यांना डॉ. अमृतकर सामोरे जात होते. त्यांनी डॉल्बी लावू दिला नाही. दरम्यान पत्रकारांशी बोलताना डॉ. अमृतकर म्हणाले, ""डॉल्बी न लावण्याबाबत यापूर्वी आठ ते दहा वेळा मंडळांसोबत बैठका घेतल्या आहेत, काही मंडळांना नोटिसा बजावल्या आहेत. तरीही डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तो लावू न देण्याची पोलिसांची भूमिका कायम आहे.'' 

आमदार राजेश क्षीरसागर व सतेज पाटील, उपमहापौर अर्जुन माने यांच्यासह काही नेते माझ्याकडे आले होते त्यांनीही न्यायालयाने ठरवून दिलेल्या निकषांत तरी वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला; मात्र आम्ही डॉल्बी लावण्यास परवानगी दिली नाही. 
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक 

Web Title: Kolhapur news no dolby sound system in Kolhapur