कोल्हापूर: मिरवणूकीत डॉल्बीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Dolby Sound system
Dolby Sound system

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी लावण्यास बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी (ता. 4) सकाळी सात ते बुधवारी (ता. 6) रात्री 12 पर्यंत हा आदेश लागू केला आहे. बंदी आदेश असताना डॉल्बी लावणाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 143 नूसार कारवाई केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील गणेश विसर्जन डॉल्बीमुक्त व्हीवी यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या सामाजिक आणि आरोग्याचा विचार करून जिल्हाचे पालकमंत्री, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाने डॉल्बीमुक्ती नारा लगावला आहे. दरम्यान, डॉल्बी लावणारच अशी काही भूमिका घेणाऱ्यांची समजूत काढली जात आहे. दरम्यान, विसर्जनावेळी कोणताही संघर्ष होवू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनीक्षेपक लावण्यासाठी बंदी आदेश जाहीर केला आहे. 

या आवाजात ध्वनीक्षेपक लावल्यामुळे त्याचे दुष्परिणाम अनेकांना भोगावे लागले आहेत. तसेच, यातून मंडळा-मंडळांमधूनही तंटे झालेली पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन डॉल्बीमुक्तीसाठी विविध पातळीवर मंडळांची समजून काढून प्रबोधन करत आहेत. डॉल्बी लावण्यापासून परावृत्त करण्यासाठी सलोख्याचा मार्ग अवलंबला जात आहे. यातच काहींनी डॉल्बी लावण्याबाबत प्रयत्न करत आहेत. त्यांना कायद्याने बंदी घातली आहे. 

जिल्ह्यात व शहरात असे अनेक मंडळे आहेत, त्यांनी डॉल्बीला फाटा देवून पारंपारिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक यशस्वी केली आहे. मात्र, अशा अनेक तरूण मंडळाचा आर्दश इतर मंडळांनीही घ्यावा यासाठी, यावर्षीही डॉल्बीमुक्‍त गणेशोत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मंडळाने दोन टॉप, दोन बेस लावण्यास परवानगी द्यावी, अशी काही मंडळांची भूमिका आहे. तर जिल्हा प्रशासन व पोलीस काहीही झाले तरी डॉल्बी लावू देणार नाही, अशी भूमिका घेत आहेत. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत शहरातील प्रत्येक मोठ्या मंडळाच्या सदस्यांची भेटी घेवून डॉल्बी न लावण्याविषयी आवाहन केले आहे. पालकमंत्री आणि पोलिसांच्या आवाहन हे दडपशाहीचे आहे, असा आरोप करून शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढला होता. डॉल्बी नसेना का पण दोन बेस, दोन टॉप अशी साऊंड सिस्टीम लावण्यास परवानगी आहे, त्यानुसार ती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत थेट डॉल्बी मालक-चालक यांच्यावरच कलम 144 नुसार कारवाई करण्याचा इशारा दिला होता. डॉल्बीचालक मालकांनी आपली डॉल्बी सिस्टीम सीलबंद करण्याचा आवाहनही पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने केले होते. आता मात्र याची अमलबजावणी सुरू केली असून जिल्हाधिकारी अविशना सुभेदार यांनी डॉल्बी बंदी आदेश लागू केला आहे. यामुळे अनेकांनी धसका घेतला आहे. जिल्ह्यातील डॉल्बी चालक, मालकांकडे असलेली डॉल्बी सिस्टीम वापरण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील कलम 144 नुसार बंदी घालण्यात आली आहे. सोमवार (ता. 4) ते बुधवारी (ता. 6) या दरम्यान डॉल्बी मशिन व यंत्रसामुग्री मालकांनी स्वत:च्या ताब्यात शिलबंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

यासाठी, न्यायालयानेही वेळोवेळी आदेश देऊन, ध्वनिप्रदूषण (नियंत्रण व नियमन) अधिनियम, 2000 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम, 1986 मधील तरतुदींनुसार ध्वनिप्रदूषणाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी आदेश लागू केले आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होतो. या अनुषंगाने या वर्षी गणेश आगमन मिरवणुकीवेळी ध्वनिप्रदूषण अंमलबजावणी करतेवेळी, घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने 13 जणांविरुद्ध पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

तसेच मागील काही वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीचे आवाजाने व त्याचे आवाजाचे कंपनामुळे महाद्वार रोड, कोल्हापूर येथे भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी झाली होती. तसेच डॉल्बीच्या आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व सामान्य नागरिक यांच्या कानास, हृदयास, आरोग्यास तसेच जीवितास धोका होण्याची शक्‍यता असून त्यांच्या मालमत्तेसही हानी पोहोचण्याची शक्‍यता असल्याने या सर्वांमुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्‍यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक, धारक यांच्यावर बंदी घालण्यात आली असल्याचेही या आदेशाद्वारे कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com