पोलिस अधीक्षक शिंदेंसह उपअधीक्षक काळेंना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - सांगलीत पोलिस कोठडीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्या प्रकरणी सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ही कारवाई केली असून, दोघांकडून विविध मुद्यांवर खुलासा मागविला आहे.

कोल्हापूर - सांगलीत पोलिस कोठडीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्या प्रकरणी सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी ही कारवाई केली असून, दोघांकडून विविध मुद्यांवर खुलासा मागविला आहे.  

दरम्यान, दोन दिवसांत या प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येण्याचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या अनिकेत कोथळेचा पोलिस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली येथे नेऊन पेटवून टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पोलिस हवालदार व झिरो पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाची जबाबदारी म्हणून सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक दीपाली काळे यांची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात सांगली शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख पोलिस निरीक्षक रजेवर गेले असताना त्यांचा कार्यभार उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे का दिला, इथपासून अनेक कारणांसाठी त्यांच्याकडून खुलासे मागविले आहेत. त्यांच्याकडून खुलासे आल्यानंतर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर काय कारवाई करता येईल, याचा विचार होईल. विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. नांगरे-पाटील यांच्याकडून ही कारवाई सुरू आहे.

या प्रकरणात निलंबित केलेले पोलिस उपनिरीक्षक कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसिरुद्दीन मुल्ला, चालक राहुल शिंगटे, झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांचे निलंबन झालेले असले, तरी त्यांच्यावर कलम ३११ नुसार बडतर्फीची कारवाई करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. तसेच, कामटेच्या मालमत्तेचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

 

Web Title: Kolhapur News notice to police officer shinde and kale