कोल्‍हापूरकरांनी अनुभवला थरार...

कोल्‍हापूरकरांनी अनुभवला थरार...

कोल्हापूर - वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करीत ‘टफ कोल्हापूर ऑबस्टॅकल’ रेसचा स्पर्धकांनी थरार अनुभवला. रिमझीम पावसात सुरू झालेल्या रेसमध्ये स्पर्धकांची चांगलीच दमछाक झाली. इच्छाशक्तीच्या जोरावर ‘टफ’ रेसमध्ये ‘बेस्ट’ परफॉर्मन्स करीत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. थ्री लिंक स्पोर्टसतर्फे आयोजित आणि ‘सकाळ’ माध्यम समूहप्रस्तुत ही रेस कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर  झाली.

शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या रेसमध्ये सुमारे चारशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी सहालाच त्यांची हजेरी होती. झुंबा डान्स केल्यानंतर रेसला सुरवात झाली. काही अंतर धावल्यानंतर जमिनीवर सरपटण्याचा अडथळा पूर्ण करीत स्पर्धक धावू लागले. पहिल्या अथडळ्यानंतर क्‍लायंबिंगचा दुसरा अडथळा पार करताना अनेकांची दमछाक झाली. लाकडावरून चालताना तर स्पर्धकांची त्रेधातिरपीट उडाली. बुटाला लागलेल्या चिखलाने काही जण लाकडावरून घसरलेदेखील. दोरीवरून चालताना अनेकांची स्वत:चा बॅलन्स सांभाळताना पुरेवाट झाली. टायरचा अडथळा पार करून खड्ड्यांतील पाण्यातून स्पर्धक नळाच्या दिशेने धावले. 

दहा फुटांच्या नळातून चालत बाहेर पडल्यानंतर गुडघाभर चिखल पाहून पुन्हा त्यांचे डोळे भिरभिरले. चिखलाने माखलेला बूट हातात घेतच काही जणांनी पुढे कूच केली. त्यांच्या पायाचा वेगही हळूहळू मंदावला. एक छोटी चढण ओलांडल्यानंतर वाऱ्याची झुळूक त्यांच्या अंगावर आली. पुन्हा ताजेतवाने होऊन लाकडी ओंडका पार करण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू झाली. ओंडक्‍यावरून चालताना काहींचे पाय पुन्हा चिखलात गेले.

टेकडीची चढण अनेकांसाठी सत्त्वपरीक्षाच ठरली. बांबूच्या त्रिकोणातून जाण्याचा अडथळा सहजरीत्या पार केल्यानंतर पुन्हा मंकी वॉकच्या अडथळ्यासमोर अनेकांनी हातच टेकले. काही स्पर्धकांनी जलदगतीने हा अडथळा पूर्ण करत अनेकांना अचंबित केले. टायरमधून चालण्याचा अनुभव घेतल्यानंतर स्पर्धकांनी लाकडी भिंत व दगडांचा अडथळा पूर्ण केला. वजन उचलण्याचा शेवटचा अडथळा होता. तो सहज पूर्ण करत फिनिशिंग पॉइंट गाठण्यासाठी त्यांच्यातील चढाओढ पाहण्याजोगी होती. ठिकठिकाणी स्पर्धकांचे चेस नंबर घेण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते. स्पर्धेनंतर जादूचे प्रयोग दाखवून उपस्थितांचे मनोरंजन झाले. बक्षीस वितरण सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण व ‘सकाळ’चे उप सरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते झाले. थ्री लिंकचे दिग्विजय पाटील, संदीप पाटील, दीपेश शेरे, विनोद शेरे यांनी संयोजन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com