अधिकाऱ्यांनी झटकले गांभीर्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

कोल्हापूर - उमा टॉकीजशेजारी काल झालेल्या एसटी अपघातातील एसटी ही स्वारगेट येथे संतोष माने याने चार वर्षांपूर्वी १३ वाहनांना धडक देत अपघात केलेली बस आहे की नाही ? या विषयी एसटीच्या येथील विभाग नियंत्रकांनी घूमजाव केले. येथे झालेल्या अपघातातील चालकांकडून यापूर्वी अपघात घडला आहे काय, याची माहिती उद्यापर्यंत देतो, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघातातील गाडीची तपासणी केली आहे का, त्यांचा अभिप्राय काय आहे, तर अजून माहिती आलेली नाही, अशी मोघम उत्तरे देत एसटीच्या अधिकाऱ्यांनी अपघाताचे गांभीर्य झटकण्याचा प्रयत्न केला.   

शहरातील मध्यवर्ती भागात बुधवारी झालेल्या एसटी अपघातात दोघांचे बळी गेले तर ९ जण जखमी झाले. एवढी मोठी घटना घडली आहे. त्याची माहिती घेण्यासाठी पत्रकार एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात गेले. येथे विभाग नियंत्रक नवनीत भानप बाहेर गेले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पत्रकारांनी श्री. भानप यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी विभागीय वाहतूक अधिकारी बी. डी. कदम यांच्याकडून माहिती घ्या,असे सांगितले.

पत्रकारांनी श्री. कदम यांना विचारले असता त्यांनी नियमित माहिती दिली, पण महत्त्वाच्या प्रश्‍नाची उत्तर देताना ‘बघून सांगतो’ एवढेच सांगितले.
कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार चालकांची वर्षातून एकदा वैद्यकीय तपासणी केली जाते. यंदा जानेवारी महिन्यात वैद्यकीय तपासणी केली आहे. मात्र अपघात घडला त्या बसचे चालक रमेश कांबळे यांना कोणतीही आजार असल्याची बाब पुढे आलेली नाही. काल त्यांनी रंकाळा - हुपरी मार्गावर दोन फेऱ्या केल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या फेरीला अपघात झाला. अपघातानंतर परिवहन अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली आहे. ती माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही. या बसचा क्रमांक व पुणे येथे गंभीर अपघात झालेल्या बसचा क्रमांक एकच आहे. त्यामुळे पुणे येथून तीच अपघाती बस कोल्हापुरात पाठविण्यात आली असे समजते. तुमचे मत काय, असे विचारताच श्री. कदम यांनी कालच्या अपघातातील ही बस सातारा डेपोकडून कोल्हापूरला २०१३मध्ये पाठविण्यात आल्याचे सांगितले. मात्र पुणे अपघातातील ही बस होती का, याचे उत्तर त्यांनी स्पष्ट दिले नाही.  

यानंतर कामगार अधिकारी प्रवीण पाटील यांच्याकडे पत्रकार गेले. तेथे चालकाकडून यापूर्वी अपघात घडले आहेत का, असा प्रश्‍न केला असता वरिष्ठांना विचारून उद्या माहिती देऊ, असे सांगत वेळ मारून नेली.

विभाग नियंत्रक भानप यांचे घूमजाव 
विभाग नियंत्रकांनी कोल्हापुरात झालेल्या अपघातातील बस व पुणे येथे चार वर्षांपूर्वी संतोष माने या चालकाने केलेल्या अपघातातील बस वेगवेगळी असल्याचे काल ठामपणे सांगितले होते. मात्र आज पुणे येथील अपघात झालेली बस व कोल्हापुरात अपघात झालेली बस एकच असल्याचे सोशल मीडियावरील छायाचित्राचे संदर्भ देत भानप यांना पत्रकारांनी विचारले असता, मी कोल्हापुरात रुजू होण्यापूर्वी ही अपघाती बस कोल्हापुरात आली आहे. त्यामुळे नक्की माहिती नाही, असे उत्तर दिले. तेव्हा काल तसे का सांगितले नाही, असे विचारताच चौकशी करून सांगतो, असे म्हणत त्यांनी जास्त बोलणे टाळले.

Web Title: kolhapur news officials jerked seriousness